भंडारदरा, शिर्डी, नगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातील वातावरणात उकाडा निर्माण झालेला आहे. ढगाळ हवामानामुळे त्यात आणखी भर पडली आहे. जिल्ह्यातील अकोले, भंडारदारा, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर तालुक्यांतील काही भागात शनिवारी रिमझिम पाऊस झाला.
तर नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, जामखेड, कर्जत, श्रीगोंद्यात ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडला नाही. वातावणणात अचानक होणार्‍या बदलांमुळे पडणार्‍या या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांत ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी अवस्था आहे. कांदा तसेच इतर पिके आणि फळबागांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी देखील झालेल्या पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. पुणे वेधशाळेने देखील पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
नगर शहर आणि परिसारात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ थोडावेळ झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, त्यानंतर दिवसभर उकाडा आणि उन्हाचा चटका कायम होता.
नगर शहर आणि परिसारात सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला अवघ्या दहा मिनिटभर झालेल्या या पावसाने रस्ते ओलेचिंब झाले़ शहरासह लगत असणारी उपनगरे, शेंडी, डोंगरगण, एमआयडीसी, बोल्हेगाव फाटा या परिसारात काही प्रमाणात हा पाऊस झाला. यापावसामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला. मात्र, त्यांनतर दिवसभर असाह्य उकाड्याने नगरकर चांगलेच हैराण झाले.
जिल्ह्याच्या अनेक भागात अशीच स्थिती होती. उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे सरकला आहे़ दरम्यान, शनिवारी वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिक घामाघूम झाले होते. जवळपास निम्मा मे महिना संपत आला आहे. वातावरणात बदल होण्यास सुरूवात झाली झाली असून दिवसभर कडक उन्ह आणि उकाड्यानंतर अनेक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याचा वारा आणि आभाळ भरून येत आहे. यंदाचा उन्हाळा चांगलाच कडक गेल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून कधी एकदा पावसाला सुरूवात होते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिर्डी प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 3 वाजेच्या समारास अचानक वरुणराजाने शिर्डी परिसरात हजेरी लावली. 30 मिनिटे हालक्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गत महिनाभरापासून सूर्य प्रचंड आग ओकत असल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. सकाळी 10 वाजेच्या नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत होती. मात्र काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. या पावसातच अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला. पाऊस उघडल्यानंतर शिर्डीतील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
भंडारदरा वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, भंडारदरा व परिसरात शनिवारी सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक आलेल्या या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसभर भंडारदरा व परिसरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण झाले व पावणे सहा वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास हलक्याशा सरी कोसळल्या. या पावसामूळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे. बाल चिमुरड्यांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

 

LEAVE A REPLY

*