भंडारदरा धरणाची एटीएसकडून तपासणी

0

भिंतीवरून प्रवेश बंद

 

भंडारदरा (वार्ताहर) – नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाची अहमदनगर जिल्हा प्रशासन व दहशतवाद विरोधी पथकाने एकाचवेळी अचानक अचानक पाहणी केली. तसेच या धरणाच्या सुरक्षेविषयी शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांना सुचना दिल्या.

 
या धरणाच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून धरणाच्या दोनही प्रवेशद्वारावर एकूण चार रायफलधारी पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे या भंडारदरा धरणाच्या भितींवरून अतिमहत्वाच्या व्यक्ति वा धरण कर्मचारी वगळता इतरांना ये -जा करण्यासाठी आता प्रवेश नाकारला जाणार आहे.

 

या धरणावरुन गुहीरे, भंडारदरा (गाव), मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी या भागात जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. तसा रहदारीचा रस्ता हा भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजुने खुला आहे. या अगोदर हा रस्ता एक माणसुकीचा भाग या नात्याने काही प्रमाणात खुला ठेवण्यात आला होता. परंतु आता या भंडारदरा धरणाच्या सुरक्षेविषयी जिल्हा पोलिस प्रशासन अहमदनगर व एटीएस पथकाने अतिशय कडक सुचना दिल्या आहेत.

 

या धरणावर असणार्‍या जलसंपदा विभागाच्या शिपाई, चौकीदार व सुरक्षा कर्मचारी वर्गाला गणवेश व ओळखपत्र नाही. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत व धरण सुरक्षेचे संबंधित विभागाला गांभिर्य नसल्याचे अतिरेकी विरोधी पथक व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. आजूबाजुच्या नागरिकांना व भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पूर्व परवानगी शिवाय प्रवेश करता येणार नसल्याची माहीती धरण शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांनी दिली.

 

राजुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनीही भंडारदरा परिसरातील ग्रामस्थांकडून सहकार्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे .

 
भंडारदरा धरण हे आता येथून पुढे पायी तसेच रहदारीस कायम स्वरुपात बंद राहणार असल्याच्या वृत्ताला कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

*