ब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी

0
उंबरे (वार्ताहर) – गेल्या 10 वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीच्या वाटपावरून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेख आणि पठाण या दोन कुटुंबांत कडाक्याचे वाद झाले. त्यानंतर पठाण कुटुंबाने बाहेरून 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याला बोलाविले.
या टोळक्याने शेख कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची खबर कळताच राहुरीचे पोलीसही तातडीने घटनास्थळी आल्याने तंग झालेले वातावरण निवळले. ही घटना काल शुक्रवारी (दि. 16) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे 15 हून अधिक दुचाकींची मोडतोड करण्यात आली आहे. ब्राह्मणी येथील शेख व पठाण यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वाटपावरून वाद आहेत.

यात पठाण यांनी आपल्या हिश्श्याची जमीन कनगरे, पठारे, गायकवाड व अन्य काही लोकांना साठे खरेदीखत करून दिली आहे. मात्र, ही जमीन आजतागायत शेख कुटुंबियांच्याच ताब्यात असल्याने त्याच कारणावरून काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेख व पठाण यांच्यात वाद झाले. त्यानंतर पठाण यांनी आपली साठेखत करून दिलेल्या जमीनधारकांना ब्राम्हणीत बोलावून घेतले.

यावेळी 15 ते 20 तरूणांनी ब्राम्हणीत येऊन शेख कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यात शेख कुटुंबियातील चार ते पाचजण जखमी झाले असून बाहेरून आलेल्या तरूणांनाही मारहाण झाल्याने त्यातील काही तरूण जखमी झाले आहेत. या मारहाणीत तलवार, लाकडी दांडके, यासह लोखंडी हत्याराचा वापर करण्यात आला. त्यामुळे ब्राम्हणी गावात वातावरण तंग झाले होते.

मात्र, यावेळी बाहेरून येऊन हे तरूण गावातील कुटुंबियांना मारहाण करीत असल्याचे पाहताच ग्रामस्थ धावून गेल्याने तरूणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, त्या तरूणांच्या दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून ही वाहने राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.

दरम्यान, इस्माईल रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इरस्माई! व त्याचा चुलत भाऊ आलिम यांना काही आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पुन्हा शिवीगाळ करुन तलवार,

लोखंडी पात्याचे धारधार हत्यार, लोखंडी पाईपला चेन साँकेट असलेले हत्यारे व लाकडी दांडे घेऊन दुकानात घुसुन यातील फिर्यादी व साक्षीदार याचे दुकानातील 3500/- रु. चिल्लर, फिर्यादीची मामी शम्मा शेख हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तसेच नजमा शेख यांच्या गळ्यातील पानपोत बळजबरीने काढुन, मारहाण करुन दुकानातील बांगड्या व इतर सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली.

यावरून पोलिसांनी – जाकिर आलम पठाण, शायद हसन पठाण, आलम हसन पठाण, हसन कोंढाजी पठाण,चाँद अब्दुल पठाण, दादा चाँद पठाण, अब्दुलगणी पठाण, नुरा अब्दुलगणी पठाण, रवींद्र बाबासाहेब कणगरे, राजु मच्छिंद्र गायकवाड, तुकाराम भिमराज पटारे, निलेश साहेबराव झावरे, रामदास ऊर्फ लाव्या धनवटे,पूर्ण नाव माहित नाही, श्रीकांत विजय नालकर, सोमनाथ भिमराज भागवत (आरोपी करजगाव, ब्राम्हणी, उंबरे, देवळाली, राहुरी फॅक्टरी, सोनई येथील आहेत. ) यांच्या विरोधात राहुरी पोस्टे गुन्हा रजि. नं. ख 826/2018 भा.दं.वि. कलम 143, 147, 148, 149, 327, 324, 326, 323, 504, 506, 427, 452 आर्मअँक्ट 4/25 मुं पो अँक्ट 1951कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘दंगलवार’
ब्राम्हणीबरोबरच बारागाव नांदूर येथे सय्यद आणि इनामदार गटात जोरदार हाणामारी झाली. यातील अल्लाबक्ष सय्यद यांनी फिर्याद दिली असून इनामदार गटाच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसच राहुरी फॅक्टरी येथेही दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेतही काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे कालचा शुक्रवार हा राहुरी तालुक्याच्या दृष्टीने ‘दंगलवार’ ठरला आहे.

LEAVE A REPLY

*