बॅन्ड-बाजा-बारात अन् वधुपिता बाराच्या भावात…

0

वावर गेल तरी चालीन, पण पावर जायले नको…! अशी ग्रामीण भागातील प्रचलीत म्हण आहे. या म्हणीनुसार लग्न सोहळे पार पाडणारी कित्येक कुटुंब देशोधडीला लागली आहेत. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ते धुमधडाक्यात मुलांची लग्ने करतात. आमच्याजवळ पैसा आहे, आम्हाला पाहिजे तसे लग्न करु… तुमचे काय बिघडते…? हा धनदांडग्यांचा प्रश्न वरवर योग्य वाटतो. परंतु यातून त्या गावातील- जातीतील गरीब कुटुंबावर एक वेगळ्या पध्दतीचा परिणाम होतो. आपणसुध्दा किमान तोलामोलाच लग्न पार पाडलं पाहिजे, असा तणाव निर्माण होतो आणि याच तणावातून त्यांच्या नशिबी कर्जबाजारीपणा येतो.

लग्नखर्चामुळे होणारा कर्जबाजारीपणा आणि त्यातूनच मग आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. शेतकरी आत्महत्येचा हा सुध्दा एक धागा आहे. काही ठिकाणी तर, आपल्या वडिलांना हुंडा अन लग्नाचा खर्च परवडणार नाही म्हणून उपवर मुलींनी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचीही उदाहरणे महाराष्ट्रात कमी नाही. अशा पध्दतीने लग्न सोहळ्यांवर अनावश्यक-अनाठायी खर्च होत असल्याने वधु पिता मात्र बाराच्या भावात जात असल्याचे भिषण वास्तव आज समाजात दिसून येत आहे.

डॉ. तुपकरांचा आदर्श विवाह
एकीकडे लोकापवादाच्या भयाने किंवा समाज बिराजदरीच्या भ्रामक दडपणातून उरली-सुरली इस्टेट विकून लग्नसमारंभ करणारी मंडळी असली तरी दुसरीकडे अल्पखर्चात आदर्श विवाह उरकणारीही मंडळी आहेतच. 5 फेब्रुवारी 2019 रोजी कोल्हापुरात असाच एक आदर्श विवाह करण्यात आला. या विवाहाचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. डॉ. सौरभ तुपकर हे स्वतः एम.बी.बी.एस. पदवी घेऊन उच्चशिक्षित आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन आजमितीस ते राधानगरी कोल्हापूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती अगदी उत्तम आहे. करोडो रुपये खर्चुन शाही पध्दतीने विवाह सोहळा करु शकले असते पण आपल्या समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण व्हावा, ही त्यांची मनस्वी इच्छा होती. आपली ही ईच्छा डॉ. सौरभ यांनी आपल्या घरातील मंडळींना बोलून दाखविली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील अ‍ॅड. तात्यासाहेब सोळंके यांची कन्या डॉ. रोहिणी हीसुध्दा एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेतलेली. स्पर्धा परिक्षेनंतर त्या पोलीस सेवेत आल्या. आजमितीस डॉ. रोहिणी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील पोलीस उपअधिक्षक आहेत. डॉ. रोहिणी आणि डॉ. सौरभ यांच्या विवाहाचा संकल्प निश्चित झाला आणि लग्न अगदी साधेपणाने आणि कमी खर्चात करण्याचा निर्णय दोघांनी घेतला. निर्णयानुसार नोंदणी कार्यालयामध्ये 5 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह संपन्न झाला.

विवाहाला एकूण खर्च 2 हजार 500 रुपये आला. हा खर्चसुध्दा वधु-वरांच्या मित्रमंडळींनी केला. कोल्हापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी शिवश्री सुंदर जाधव यांनी उभयतांना विवाह प्रमाणपत्र दिले आणि पुस्तकरुपी भेटवस्तू आहेर देऊन दोघांना आशिर्वाद दिले. विवाह समारंभ पार पाडल्यानंतर सर्वांनी जेवणावळीचा आग्रह धरला. नोंदणी विवाह पध्दतीमध्ये विवाह करतांना डॉ. सौरभ यांचे सोबत 7 तर डॉ. रोहिणी यांचेसमवेत 5 मित्रमैत्रिणी होत्या. अशी ही 14 जणांचे वर्‍हाड मग एका शुध्द शाकाहारी भोजनालयात दाखल झाले. त्या ठिकाणी जेवणावळीचा खर्च 1800 रुपये झाला. त्याआधी वर-वधुंचे हार, बुके, पेढे आदींसाठी 700 रूपये खर्च झाला. हा सर्व एकुण 2500 रूपयांचा खर्च वर-वधु यांनी केला नाही. दोघांच्या मित्रमैत्रिणींना हा अडीच हजाराचा खर्च केला. कोणताही आहेेर नाही, भेटवस्तू नाही, बॅन्ड वाजा बारात नाही. नवरदेवाचा कोट नाही. नवरीचा शालू नाही, नवरीचा मेकअप करणारी ब्युटीशिअन नाही, शुटींग व फोटोसाठीचा ड्रोन कॅमेरा नाही, संगीत रजनी, ऑर्केस्ट्रा नाही, बुफे नाही. जेवणावळी नाही, मानपान आहेर नाही, वाजंत्री-डीजे नाही, लग्नापूर्वीचे प्री-वेंडींग फोटोसेशन नाही, पत्रिका नाही, हुंडा नाही, भटजी नाही अन् मंगलाष्टकेही नाहीत. आहे त्याच नेहमीच्या कपड्यांवर या आदर्श जोडप्याने नोंदणी पध्दतीने विवाह लाऊन घेतला. आणि मोठा आदर्श समाजासमोर ठेवला.

विवाहाचे राजकीयीकरण
आपल्या समाजामध्ये थाटामाटात लग्न लावण्याच्या हव्यासापोटी होणारा करोडो रुपयांचा चुराडा आणि त्या अनुषंगाने गरीब वधुपित्यांची होणारी आर्थिक दिवाळखोरी यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी डॉ.सौरभ आणि डॉ.रोहिणी यांच्यापासून आपण आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या आदर्श जोडप्यापासून प्रेरीत होवून किती लोक प्रेरणा घेतील, हे येणारा काळच ठरवेल. परंतू अलिकडच्या विवाह समारंभामध्ये आणखी एका नवीन अन् कंटाळवाण्या ट्रेण्डचा शिरकाव झाला आहे. या नव्या ट्रेन्डचे नाव आहे विवाहाचे राजकीयीकरण…!

आपल्या परिसरातील राजकीय नेते, आमदार, खासदार आणि मंत्री-संत्री आपल्या कुटूंबातील लग्नसोहळ्यात आले म्हणून वर-वधूकडील माय-बाप या मंडळींना साकडे घालतात आणि आमच्या समाजाचीही आजकाल अशी काही मानसिकता झाली आहे की, एकवेळ तुम्ही आमच्या गावचा रस्ता नाही केला तरी चालेल, पिण्याच्या पाण्याची सोय नाही केली तरी चालेल, गावातील पोरांना उद्योगधंद्याला नाही लावले तरी चालेल… पण तुम्ही फक्त आमच्या मुलाच्या, मुलीच्या लग्नाला आले पाहिजेत आणि आमची प्रतिष्ठेची फुटपट्टी वाढविली पाहिजे.

बोदवड तालुक्यातील एका आदर्श गावातील दोन वर्षांपूर्वीचा एक किस्सा या अनुषंगाने सांगावासा वाटतो. वरपित्याने लग्नपत्रिकेत आपल्या पक्षाच्या बड्या नेत्याचे अनमोल आशिर्वाद म्हणून नाव छापले होते. भाऊंनीही, ‘मी लग्नाला येईल!’ म्हणून शब्द दिला होता. लग्नसमारंभाचा दिवस उजाडला. नवरदेव-नवरी बोहल्यावर चढली, विवाह मंडप वर्‍हाडी व पाहुण्या मंडळींनी खचाखच भरलेला घटीका संपण्याची वेळ झाली. भटजीबुवांनी मंगलाष्टके म्हणण्यासाठी माईक हाती घेतला. अन् तेवढ्यात वरपिता असलेल्या कट्टर पक्षीय कार्यकर्त्याने भटजींच्या हातातील माईक घेऊन घोषणा केली. जोपर्यंत भाऊ येणार नाहीत …. वधु-वरांना आर्शिवाद देणार नाहीत… तो पर्यंत लग्न लागणार नाही…! आता खुद्द वरपित्यानेच अशी घोषणा केल्यामुळे बोलणार कोण? 12 – 1 – 2 आणि तीन वाजले तरी भाऊंचे आगमन झाले नाही. बरीच मंडळी विवाहमंडपातून वधू-वरांना आशिर्वाद देऊन उपाशीपोटी निघून गेली.. अखेर सायंकाळी चार वाजेदरम्यान भाऊंच आगमन झाले. आणि मगच मंगलाष्टके झालीत व विवाह सोहळा संपन्न झाला. खरे म्हणजे विवाह हा आपल्या कुटूंबाचा खाजगी सोहळा असतो.

आपल्या नियोजनानुसार आलेल्या पाहुण्यांची सरबराई करून आनंद उत्सव पार पाडला पाहिजे. पण या खाजगी उत्सवाची मदार राजकारणी लोकांवर ठेवण्याची प्रथा आजकाल मोठ्या प्रमाणात बळावली आहे.

आपल्या कौटुंबिक लग्नसोहळ्यांमध्ये राजकारणी लोकांचा वावर आपणच वाढू दिल्यामुळे विवाह समारंभाचे राजकीयीकरण झाल्याचे चित्र दिसत आहे. कुठे-कुठे तर हा प्रकार इतका पराकोटीला जातो की, मंगलाष्टके सुरू असतांना जर का, बड्या राजकीय नेत्यांचे आगमन झाले तर, ती मंगलाष्टके मध्येच थांबवून, राजकारण्यांची भाषणे आणि सत्कार घडवून आणली जातात. सोहळ्यासाठी आलेल्या सामान्य पाहुण्यांचा यावेळी विचार केला जात नाही. या सर्व अनाठायी फोफावणार्‍या प्रथांना फाटा देण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजा समाजामध्ये, गावागावामध्ये सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले पाहिजे. साध्या-पध्दतीने चहापानावर लग्नसोहळे उरकले पाहिजेत. लग्नात होणारी पैशांची उधळपट्टी थांबवून आदर्श संकल्पनेतून विवाह पार पडले पाहिजेत. हीच या माध्यमातून माफक अपेक्षा!
पुरूषोत्तम गड्डम
भ्रमणध्वनी – 9545465455

LEAVE A REPLY

*