बीजगणिताच्या पेपरला १४ कॉपी केसेस

0

नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- दहावीच्या परीक्षेत मंगळवारी झालेल्या बीजगणिताच्या पेपरला नाशिक विभागात एकूण १४ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कॉपी केसेस करण्यात आल्या. सर्वात जास्त ८ कॉपीबहाद्दर जळगाव जिल्ह्यात जाळ्यात आले असून नंदुरबारला एकही कॉपी केस झाली नसल्याची माहिती विभागीय मंडळाकडून देण्यात आली.

यात नाशिक जिल्ह्यातील नगरसूल येथे एक तर तळेगाव अंजनेरी येथे प्रत्येकी एक-एक कॉपी केस करण्यात आली. धुळे जिल्ह्यात नगाव येथे २ तर नरडाणा केंद्रावर एक कॉपी केस करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ८ कॉपी केसेस करण्यात आल्या. त्यात नालंगा येथे २, सोनवद येथे ५ तर भुसावळ येथे एक कॉपी केस करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांवर आता नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

बारावीचे तसेच दहावीचे काही पेपर वारंवार व्हॉटस्‌ऍप व इतर सोशल मीडियावरून व्हायरल झालेले असताना परीक्षा मंडळाकडून दहावीच्या परीक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली. त्यात मगच्या सोमवारी रात्री मंडळाने एक परिपत्रक काढून दहावीच्या परीक्षा केंद्रांवर विशेष पोलीस सुरक्षा पोहोचवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांना केले होते. या परिपत्रकाची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून दहावीच्या परीक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली.

त्यानुसार संपूर्ण विभागात असलेल्या संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळेही कॉपी केसेसला अटकाव होण्यास मदत झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. इंग्रजी, बीजगणित, भूमिती या पेपरला होणारी कॉपी केस लक्षात घेता मंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. त्यानुसार इंग्रजी व गणिताच्या पेपरला कॉपीवर नियंत्रण मिळवण्यात परीक्षा विभागाला बर्‍यापैकी यश मिळाले.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी विभागातून २ लाख १२ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. त्यात नाशिकमधील १८८ केंद्रांवर ९६ हजार ७३० तर धुळे येथील ६२ केंद्रांवर २९ हजार ९५०, जळगावला १२७ केंद्रांतून ६४ हजार ४८७, नंदुरबारमधून ४० केंद्रांतून २१ हजार ४०९ असे एकूण ४१७ केंद्रातून २ लाख १२ हजार ५७६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये १३९ दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

*