Type to search

नंदुरबार

बाहेरील कारखान्यांना ऊस पुरवणार्‍या त्याची नोंद पुढील हंगामात करणार नाही: सातपुडा कारखान्याचा ठराव

Share

शहादा | ता.प्र.- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने पुढील हंगामाकरीता ऊसाची लागवड सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात वाढणार आहे. त्यामुळे बाहेरील कोणताही कारखाना पुढील वर्षी आपल्या भागात ऊस घेण्याकरीता येणार नाही. म्हणून यावर्षी जे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सातपुडा कारखान्यास नोंद केलेला ऊस किंवा बिगर नोंद ऊस सातपुडा कारखान्यास दिल्यास त्यांचाच ऊस पुढील हंगामात गाळपासाठी घेतला जाईल. जे ऊस उत्पादक सभासद ऊस बाहेरील कारखान्यांना देतील, त्यांची नोंद व ऊस तोड पुढच्या हंगामात सातपुडा कारखाना करणार नाही, असा ठराव सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत पारीत करण्यात आला.

सातपुडा कारखाना हा नेहमीच शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतो. त्यामुळे शेतकर्‍यांचा विश्वास कायम टिकून आहे आणि या विश्वासावरच कारखान्याची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. त्यामुळे तुमची दिशाभूल करून यावर्षी काही कारखाने ऊस खरेदी करण्यासाठी येतील, त्यांना ऊस देऊ नये म्हणून संचालक मंडळाने निर्णय घेतला. कारखान्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गुजराथ व मध्यप्रदेश या तीन राज्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत. यावर्षी सुदैवाने उशिरा का होईना पर्जन्यमान सर्वच भागात चांगले झाले आहे. याशिवाय कार्यक्षेत्रातील उपसा जलसिंचन योजनांची चाचणी सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चालू हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होईल. म्हणून पुढील हंगामात बाहेरील कारखाने ऊस घ्यायला येणार नाहीत. दोन वर्षापूर्वी गुजराथ राज्यातील व नगरमधील सहकारी कारखान्यांनी तसेच महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी सभासदांना जास्तीचा ऊस दर अदा करू व पुढील १० वर्षासाठी ऊस गाळपास घेण्याबाबतची हमी देण्याचे आमिष दाखवून ऊस गाळपास नेला.

परंतु काही कारखान्यांनी अद्याप ऊसाचे पेमेंट दिलेले नाही. अशाप्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून ऊस उत्पादक सभासदांनी याबाबत दक्षता घ्यावी.  बिगर नोंद क्षेत्र गाळपास घेण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी सातपुडा कारखान्याकडे अर्ज केले. त्यानुसार कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील व संचालक मंडळाने सभासदांचे हित जोपासण्यासाठी संपूर्ण बिगर नोंदीचा ऊस गाळपास घेण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने येत्या गा.हं.२०१९-२० मध्ये संपूर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करावे व जे सभासद येत्या हंगामात आपला नोंद ऊस गाळपास देणार नाहीत, त्यांचा लागवड | उपलब्ध होणारा खोडवा ऊसाची नोंद कारखाना करणार नसल्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजुरीने पारीत करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!