Type to search

ब्लॉग

बालगंधर्व आणि जळगाव

Share

रंगभूमीवरील आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत नाट्यप्रेमींना आपल्या मोहात पडणार्‍या या नटसम्राटाचा जन्म 26 जून 1888 ला पुण्यात झाला. त्याचे आजोबा कृष्णाजीपंत यांना पाच अपत्य होती. त्याचे मुळगाव नागोठाणे, सातारा हे होय. श्रीपादरावांचा विवाह अन्नपूर्णाबाई यांच्याशी झाल्यानंतर त्यांना पुढे सात अपत्य झाली पण ती अल्पायुषी ठरली असल्याने नारायण रावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील चिंताग्रस्त होते. श्रीपादराव हे स्वतः सतारवादक होते. शिवाय सरकारी खात्यात नोकरीला असल्यामुळे घरची परिस्थिती संपन्न होती. त्या काळात नाटकाचा बोलबाला असल्याने बालपणीच नारायणवर संगीत कलेचे संस्कार रुजले. आपली भावंडे शंकर, वेणू, व व्यंकटेश झोपी गेली असतानाही नारायण मात्र नाटक संपेपर्यंत विस्फारलेल्या नजरेने बघत असत. वडिलांनी त्यास शिक्षणासाठी जळगाव येथे पाठवले. जळगाव हे त्यांचे आजोळ. जळगाव नगरीचे पहिले नगराध्यक्ष राहिलेले अ‍ॅडव्होकेट आबाजी राघो म्हाळस हे बालगंधर्वांचे मामा. त्यांच्याच बळीरामपेठेतल्या घरी सन 1895 ते 1905 अशी सुमारे 10 वर्षे बालगंधर्वांची गेली. या काळात त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडेही इथेच घेतले. पुढे जळगावात प्लेगची साथ आली आणि म्हाळस कुटुंबाने नारायणची रवानगी पुण्याला केली. याच स्मृतींना अजरामर करण्यासाठी जळगाव नगरपालिकेने 1960 मध्ये आपल्या खुल्या रंगमंदिराला बालगंधर्वांचे नाव दिले आहे. याच काळात काका यशवंत यांच्याकडे सहज म्हणून पुण्याला फिरण्यासाठी गेले असता केसरी या वर्तमानपत्राकडून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. काका वर्तमानपत्रात काम करत असल्याने नारायणास तिथे जाण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात गायलेल्या ‘हरवा मोरा देव बंधवा’, ‘ना तर मै गारी दुंगी, ना रहुंगी तुम्हीसो बलमा’ हे गीत गायल्यानंतर लोकमान्यांनी त्यास बालगंधर्व ही पदवी बहाल केली. केसरीच्या पहिल्या पानावर झळकत नारायण संपूर्ण महाराष्ट्रभर बालगंधर्व नावाने प्रसिद्ध झाले.

अ‍ॅड. आबासाहेब म्हाळस हे जळगाव नगरपालिकेचे सदस्य होते ते पुढे नगरपालिकेचे अध्यक्षही झाले. ते अपत्यहीन होते. नारायणावर त्याचं मन जडलं होते. त्याला दत्तक घेण्याचाच त्यांचा विचार होता मात्र नारायणाच्या मातापित्यांनी रुकार न दिल्याने तसं घडलं नाही. पुढं त्यांनी आपल्या पुतण्यालाच मांडीवर घेतलं. तेच पुढे जिल्ह्यातील प्रसिध्द डॉक्टर म्हणून नावारुपास आले. म्हाळस त्याकाळातील जळगावातील एक सधन व प्रतिष्ठीत असामी होते. त्यांनी आपल्या दत्तक पुत्राची व नारायणाची मुंज जळगावला एकत्रच लावली. ज्या शाळेत नारायण राजहंसांनी श्रीगणेशाय नमः ही धूळ अक्षर प्रथम लिहिली ती जूनी शाळा पाडून नगरपालिकेने त्या जागेवर नवीन शाळा बांधली आहे. महात्मा गांधी मार्केटसमोर असलेल्या या शाळेपासून काही अंतरावरच शनिपेठेत म्हाळसांचे अलिशान घर होते. बालगंधर्वांच्या काळात पक्क्या विटांनी बांधलेली कौलारु इमारतीत लोकांचा राबता असायचा. म्हाळस वकील आपल्या अपत्यांकडे जातीने लक्ष ठेवून असायचे. नारायणाच्या शिक्षणातील प्रगतीकडेही त्यांनी लक्ष दिले. पण नारायणाला शिकण्यात रस नाही हे त्यांच्या लक्षात आलं होते. नारायणाच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या प्रगतीबद्दल साधारण असा शेरा मारला होता. शिक्षणाची नसली तरी नारायणाला संगीताची आवड आहे व गोड गळाही आहे हे म्हाळसांच्या लक्षात आले होते. आबासाहेब स्वतः संगीताचे जाणकार होते. त्यांनी नारायणाच्या आईवडीलांना विचारून शाळेच्या शिक्षणाबरोबरच नारायणाला शास्त्रीय संगीताचं शिक्षण देण्याचं ठरवलं. त्यावेळी जळगावात दिल्लीहून आलेले उस्ताद मेहबूब खान हे सर्वात चांगले संगीत शिक्षक समजले जात. नारायणाला शिकविण्यासाठी म्हणून आबासाहेबांनी त्यांचीच नियुक्ती केली. मेहबूब खान उस्तादांची मालमत्ता किंवा वारस याचा मात्र जळगावात आता मागमूस उरला नाही. 1860 मध्ये किर्लोस्कर नाटक कंपनीत नशीब अजमावण्यास गेलेल्या बालगंधर्वास अपयश आले. त्यानंतर ताहराबादकर गुरुजी व कोल्हापूरचे अपय्यबुवाकडे संगीतकलेचे ज्ञान संपादन केले. पारगावच्या लक्ष्मीबाई हिच्याशी 1907 साली विवाह केला. त्यानंतर पुढील काळात लक्ष्मीबाईला इंदू नावाची मुलगी झाली.परंतु ती आजाराने दगावली असतानाही या नटसम्राटाने नारायणाची झळ मनापनातील भामिनीला का? म्हणून त्यांनी खेळ बंद न करता भामिनीची भूमिका करून नाटकाप्रती आपली निष्ठा जपली.

कारकिर्दीला बहर येत असतांना 1911 साली नानासाहेब जोगळेकरांच्या निधनानंतर कंपनीत शंकरराव व इतर मंडळीत झालेल्या मतभेदातून गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व पंडित या मित्राच्या पुढाकाराने किर्लोस्कर नाटक कंपनीतून बाहेर पडत 19 जुने 1913 साली गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. त्यानंतर 3 सप्टेंबर 1913 साली ममूकनायक म हे नाटक करून गंधर्वयुगाची सुरुवात केली. 1907 मध्ये बालगंधर्वांनी जळगावला भेट दिली होती. जळगावला भरलेल्या पहिल्या कविसंमेलनाला ते गायक म्हणून उपस्थित होते. 1939 मध्ये बालगंधर्वांना पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यावेळी त्यांचा जळगावात जाहीर सत्कार करण्यात आला होता. जळगावच्या ब्राह्मण सभेला बालगंधर्वांनी आपल्या नाटकाच्या उत्पन्नातून आबासाहेब म्हाळस यांच्या स्मृत्यर्थ देणगी दिली होती. 1969 मध्ये जळगावच्या ब्राह्मण सभेत बालगंधर्वांच्या प्रतिमेचे अनावरण करून सभागृहाला त्यांचे नाव दिलं.

काळाच्या बदलानुसार लोकांनी रंगभूमिकडे पाठ फिरवली व सिनेमाकडे त्यांचा कल झुकल्याचे बघून व्ही शांताराम यांच्या आग्रहाने प्रभात कंपनीच्या धर्मात्मा या चित्रपटातील संत एकनाथांच्या सात्विक भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण रंगभूमीवरील स्त्रीच्या भूमिकेतील बालगंधर्वला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही परिणामी चित्रपटाला अपयश आले. त्यामुळे ते पुन्हा रंगभूमीकडे वळले. याच कालावधीत पत्नी लक्ष्मीबाईचे आजाराने निधन झाले. त्यांनतर पुढे त्यांनी नाटकातील जोडीदार गोहर कर्नाटकी या स्त्रीशी कायदेशीर विवाह केला. वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांनी विविध भूमिका केल्या त्यांची शेवटची भूमिका सिंधू ही एकच प्याला या नाटकातील होती. आपल्या अर्धशतकाहूनही अधिक कारकिर्दीत त्यांनी 25 हून अधिक नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. रंगभूमीसाठी आयुष्य घालवणा-या या नट सम्राटाला भारत सरकारने 1955 ला संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच 1964 साली पद्मभूषण व विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती हेमंती बनर्जीनी रंगभूमीवरील बालगधर्वांच्या कार्यांची माहिती देणार्‍या माहितीपटाला 2002 साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 2011 साली नितीन देसाई यांनी बालगंधर्व या उत्कॄष्ट चित्रपटाची निर्मिती केली. नेहमी चेहर्‍यावर शांत भाव व स्मित हास्य असणार्‍या बालगंधर्वाचा अर्धांगवायूच्या झटक्याने वयाच्या 79 व्या वर्षी, 1967 साली निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्यविश्वातील सुवर्णयुगाची अर्थातच गंधर्व युगाची समाप्ती झाली.
आर्ट डिपार्टमेंट हेड, मृदंग इंडिया
– योगेश शुक्ल, मो.9657701792

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!