बालकवी स्मारकाची उपेक्षा स्मृती शताब्दी वर्षात दूर व्हावी!

0

प्रा.बी एन चौधरी / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे……., हिरवे हिरवे गार गालिचे, हरीत तृणांच्या मखमालीचे………., श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे……….., ऐल तटावर पैल तटावर, हिरवाळी लेवून………., या आणि अश्या अनेक निसर्ग कवितांनी अवघ्या महाराष्ट्राला निसर्ग सौंदर्याच्या मोहात पाडणारे कवी त्र्यंबक बापूजी ठोमरे तथा बालकवी यांची जिल्ह्यातील दोन्ही स्मारके जन्म शताब्दी होवून 27 वर्ष झाली तरी अपूर्णावस्थेत, उपेक्षा झेलत उभी आहेत.

ही स्मारके स्मृती-शताब्दी-वर्षाततरी पुर्णत्वास जावीत अशी अपेक्षा जिल्ह्यातील साहित्यिक-रसिक करीत आहेत.

यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, साहित्यिक आणि रसिक यांनी एकत्र येवून लोकचळवळ उभी करायला हवी. आपल्या जिल्ह्याची गौरवशाली साहित्य परंपरा जपायला हवी.

नस्ता कवीचा व्यापार,
तरी कैसा अस्ता जगोध्दार?
म्हणोनी कवी हे आधार,
सकळ सृष्टीचे………
असं समर्थ रामदासांनी म्हटले आहे.

कवीने स्वप्न पाहिली नसती, त्याच्या कवी कल्पना केल्या नसत्या, वास्तवाला शब्द देवून त्याला डोळस केलं नसतं तर जगाचे व्यवहार इतरांना कसे कळले असते. प्रत्येकाला अनुभव असू शकतो मात्र सार्वजनिक होईल अश्या शब्दात तो मांडता येत नाही. ते काम कवी करतो. म्हणून कवी हे सकल सृष्टीचेच आधार आहेत, असं समर्थ म्हणतात. असा एक लोकमान्य कवी आपल्या जिल्ह्यात होवून गेला. मग त्यांचं भव्य दिव्य स्मारक त्यांच्या जन्मगांवी, निर्वाणगांवी नको कां व्हायला ?

खरे तर लेखक-कवींची स्मारके ही त्यांनी लिहून ठेवलेली साहित्य संपदाच असते. शतकानंतरही मराठी वाचक अश्या अनेक लेखक-कवींना विसरला नाही यातच त्यांचे साहित्यिक मोठेपण दडलेलं आहे.

असं असलं तरी असे महान कवी-लेखक कुठे जन्मले? कुठे रहात होते ? कुठे निर्वाण पावले? त्यांच्या विहाराची स्थळं, त्यांची साहित्य लेखनाची जागा, त्यांच्या साहित्यात आलेली स्थळं, त्यांची समग्र साहित्य संपदा, त्यावरील अभ्यासकांची समिक्षा या बद्दल रसिकांना कमालीची उत्सुकता असते.

ती कमी करण्यासाठी, भागविण्यासाठी स्मारकं आवश्यक असतात. या निमित्ताने त्यांचे स्मरण होते. त्यांच्या भावविश्वात डोकावता येते. अभ्यासकांना त्यांचे साहित्य एकाच ठिकाणी अभ्यासता येते. काही साहित्यिक उपक्रम राबविता येतात आणि त्यांच्या प्रती ऋणही व्यक्त करता येते.

यातून प्रेरणा घेवून उद्याचे साहित्यिक उभे राहू शकतात. म्हणूनही सगूण-साकार स्वरुपात स्मारकं असावेत. अशी स्मारकं दीपस्तंभ असतात नव्या पिढीसाठी.

1907 मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले होते. यात त्र्यंबक बापूजी ठोमरे ह्या अवघ्या 17 वर्ष वयाच्या बालकाने संमेलनस्थळी स्वतः उत्स्फूर्तपणे रचलेला पटका सादर केला.

त्याच्या या विलक्षण प्रतिभा, विद्वत्तेने आणि कवनातील भावोत्कटतेने रसिकांना मोहून टाकले होते. त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. सभागृह टाळ्यांनी गुंजून गेले. संमेलनाचे अध्यक्ष कवी डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी रेव्हरंट टिळक, कवी विनायक यांच्या उपस्थितीत या बालकाला बालकवी ही पदवी दिली.

तेव्हापासून हा त्र्यंबक अवघ्या महाराष्ट्राचा बालकवी झाला. याच नावाने त्यांनी निसर्ग कविता लिहल्या. त्यांची असंख्य पारायणं झाली.

साहित्य विश्वाने त्यांना आयुष्यभर डोक्यावर घेतले. 5 मे 1918 रोजी रेल्वेच्या एका विचित्र आणि दुर्दैवी अपघातात हा बालकवी मराठी साहित्य पोरकं करुन निघून गेला. बालकवींची साहित्यिक कारकीर्द उणीपुरी अकरा वर्षांची होती.

पण एव्हढ्या लहान कालखंडालाही त्यांनी आपल्या अलौकीक प्रतिभेने महान करुन टाकले. किती थोर लेखन घडले त्यांच्या हातून. अश्या या महान कवीच्या स्मृतीची आज शताब्दी सुरु होत आहे.

जळगाव जिल्ह्याचे सुदैव हे की त्यांचा जन्म धरणगावी (13 ऑगष्ट 1890) झाला. आणि दुर्दैव हे की त्यांचा अपघाती मृत्यू भादली येथे (5 मे 1918) झाला. या दोन्ही ठिकाणी त्यांचे नाममात्र स्मारक असून ते ही अनास्थेचे बळी ठरु पहात आहेत.

धरणगावी तात्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या कार्यकाळात शासनाने स्मारकासाठी जागा दिली. सभोवताली कंपाऊंड वॉल केले. स्मारकाचा संकल्पित आराखडा केला. तो मंजूरीसाठी पाठविला आहे. मात्र, तो दप्तर दिरंगाईत अडकून पडला आहे. नविन वर्षात हे काम सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी मार्गी लावावे अशी मागणी साहित्य कला मंच व मराठी काव्य रसिकांनी केली आहे.

भादली येथे रेल्वे स्टेशन परीसरात बालकवींच्या स्मृतीनिमित्त एक संगमरवरी स्तंभ उभारुन त्यावर निर्झरास ही कविता कोरली आहे. वर निर्झराचं-बालकवींचं चित्र, त्यावर छानशी शेड केली आहे. हेच त्यांचे जुजबी स्मारक. मात्र, हे स्मारकही रेल्वेच्या नविन विस्तारीकरणात अडथळा ठरत असल्याने विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे.
रेल्वे मंत्री ना.सुरेश प्रभू यांच्यापर्यंत ही बातमी पोहचली तशी त्यांनी तडकाफडकी दखल घेतली. रेल्वेतर्फे हे स्मारक संरक्षित करु अथवा नव्या जागेत आकर्षक स्वरुपात उभारु, असे अश्वासन दिले आहे. त्यांची कार्यकुशलता व दिलेला शब्द पूर्ण करण्याची विश्वासार्हता पाहता ते स्मारक वाचवतील हे निश्चित. मात्र, हे अश्वासन बालकवींच्या स्मृती शताब्दी वर्षात पूर्ण व्हावे अशी अपेक्षा बालकवी प्रेमी व रसिक करत आहेत.

बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नव्हता, निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार होते. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भाव-भावना दिसत असाव्यात.

बालकवींची कविता ही स्वसंवेदी कविता असल्याचे प्रदिप गोखले यांनी नमूद केले आहे.

माणूस जाणिवेतून, कल्पनाशक्तीतून ज्या विविध रचना सादर करतो तसाच तो आपल्या कवितेकडे अंतर्मुखतेने, स्वसंवेदीपणे पाहू शकतो असे ते म्हणतात. म्हणून बालकवींच्या कवितेत त्यांच्या स्वसंवेदी कवितांना अधिक महत्व आहे.

बालकवींची कविता निसर्गाशी तादात्म पावणारी असली तरी तिच्यात एकप्रकारची सल आहे. कधी ती सहज आनंदी वाटते तर कधी काळोखाच्या खोल डोहात गुडूप होवून गुढतेकडे जाते.

कधी ती बालसुलभ भावभावनांना अवखळपणे व्यक्त करते तर कधी साक्षात मरणाच्या स्वप्नांही शब्दबध्द करते. अत्यल्प आयुष्यातही त्यांनी जीवनाच्या आणि निसर्गाच्या विविध रंगछटा, त्यांची अनाकलनीय गुढता, जगण्यावरचं परखड भाष्य ज्या पध्दतीने मांडले ते विलक्षण आहे.

त्यांना अजून आयुष्य लाभले असते तर त्यांनी निसर्गाची व जगण्याची असख्य कोडे उलगडून दाखविली असती. परंतू नियतीला हे मान्य नसावे. तिने फुलूपाहणारे हे सुकमार फूल अवचित खूडून नेले. हे कटू असलं तरी सत्य आहे. आणि आपण शंभर वर्ष झाली तरी ते स्विकारु शकत नाही. कसं स्विकारणार ? ते आपल्याशी एक जीव झाले आहेत. त्यांना आपल्यातून वगळताच येणार नाही.

अश्या कवींबद्दल केशवसूत म्हणतात. आम्ही कोण म्हणून काय पुसता ? आम्ही असू देवाचे लाडके ! आम्हाला वगळा, झणी गतप्रभ होतील तारांगणे.

आम्हाला वगळा, विकेल कवडी मोल हे जीणे ! …….खरंच नाही कां हे ? कसं वगळू शकतो आपण अश्या महान साहित्यिकांना आपल्या जगण्यातून. त्यांचा कोणता धर्म, जात, पंथ नसतो. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. म्हणून कां होत असेल त्यांच्या स्मारकांची उपेक्षा ? हा प्रश्न मला, तुम्हाला, सर्वांनाच पडायला हवा.

LEAVE A REPLY

*