बाबासाहेब वाकळेंची सभापतीसाठी चाचपणी, बंडखोरांसह सेनेच्याही संपर्कात

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- सेनेच्या कोट्यातून स्थायी समितीमध्ये गेलेले भाजपचे नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी सभापती पदासाठी चाचपणी सुरू केली आहे. बंडखोर गटाच्या पाच नगरसेवकांसह सेनेच्या नगरसेवकांशी त्यांनी गुप्त बैठका सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान वाकळे यांना राजीनामा देण्यासंदर्भात दिलेली मुदत संपली असल्याने महापालिकेतील भूमिकेविषयी निर्णय घेण्याकरीता भाजप नगरसेवकांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी आज रात्री पक्ष  कार्यालयात वरबोलविली आहे.
बाबासाहेब वाकळे यांना सेनेच्या कोट्यातून स्थायी समितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. पक्षांतर्गत वादामुळे वाकळे यांना खासदार गांधी यांनी त्या पदाचा राजीनामा देण्याचे सांगितले होते, मात्र वाकळे यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही. उलट भाजपच्या आगरकर गटाचे उषा नलावडे, दत्ता कावरे व बंडखोर गटाचे मुदस्सर शेख, कलावती शेळके यांच्याशी वाकळे यांनी हस्ते परहस्ते निरोप पाठवून चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे वाकळे हे गांधी यांच्या आदेशानुसार स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देणार की सभापती पदासाठी रिंगणात उतरणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान वाकळे यांनी राजीनामा न दिल्यास महापालिकेत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेण्यासाधी गांधी समर्थक नगरसेवकांची बैठक रात्री खासदार गांधी यांनी बोलविली आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

सुवर्णा जाधव यांचा जीव टांगणीला
मनसेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांना सेनेने स्थायी समिती सभापती पदाचा शब्द दिला आहे. त्यानुसार जाधव याच सभापती होतील असे सेनेचे नेते सांगत असले तरी वाकळे यांच्या भूमिकेमुळे जाधव यांचा जीव टांगणीला लागला आहे. वाकळे यांनी निवडणूक लढविली तर त्यांच्या पाठीशी भाजपतील आगरकर गटाचे दोन, बंडखोर दोन स्वत: वाकळे व सेनेचे किमान तिघेतरी वळतील असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे जाधव यांच्याऐवजी वाकळे यांच्याच गळ्यात सभापती पदाची माळ पडेल असे गणित मांडले जात आहे.

LEAVE A REPLY

*