बागल, सानप, चेडे,वानखेडेसह सात हॉस्पिटलवर कारवाईची मलमपट्टी!

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- खंडपीठाने खडेबोल सुनावत महापालिकेच्या मानेवर कारवाईची सुरी ठेवताच मान मोकळी करण्यासाठी हॉस्पिटलचे अतिक्रमण हटविण्याचे सोपस्कार प्रशासनाने सुरू केला आहे. हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकण्याचे ऑपरेशन महापालिका करणार होती, मात्र केवळ मलमपट्टी करून दिखावा केला. चार-दोन फरशा काढणे म्हणजेच अतिक्रमण काढले, असा अभास महापालिका निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पार्किंगच्या जागी बांधकाम करून कमाई करणार्‍या हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने शनिवारपासून कारवाई सुरू केली आहे. आज सोमवारी तारकपूर परिसरातील बागल, सानप व चेडे हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकला. दरम्यान महापालिकेची ही कारवाई म्हणजे केवळ दिखावा असल्याचे चित्र कारवाईनंतर पहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते शाकीर शेख यांनीही सुरू असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात असलेल्या 334 हॉस्पिटल व 150 क्लिनीक असले तरी त्यातील केवळ 2 हॉस्पिटल हे कायदेशीर आहेत. उर्वरित हॉस्पिटलचे बांधकाम हे अनधिकृत आहे. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून खंडपीठाने महापालिकेला फैलावर घेत 10 ऑगस्ट रोजी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट मागविला आहे.
त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शनिवारी दुपारपासून कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही सोबत घेतला आहे. शनिवारी तारकपूर परिसरातील वानखेडे, सिटीकेअर आणि जाधव अशा तीन हॉस्पिटलच्या पार्किंगवर महापालिकेने हातोडा टाकला. मात्र या कारवाईत पार्किंगच्या जागेतील केवळ पाच-दहा फारशा काढून टाकण्यात आल्या. डॉक्टरांनी विनंती केल्यानंतर महापालिकेचे पथक दुसर्‍या हॉस्पिटलकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.
सोमवारी सकाळी बागल, चेडे व सानप या तीन हॉस्पिटलवर महापालिकेच्या जेसीबीने हातोडा टाकला. ही कारवाई म्हणजे केवळ दिखावा असल्याचे चित्र होते. खंडपीठात काय कारवाई केली याचा रिपोर्ट महापालिकेला द्यायचा आहे. त्यासाठीच हा दाखावा केल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील 52 हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. सोमवारी दिवसभरात दहा हॉस्पिटलच्या पार्किंग रिकामी करण्यात येईल असा प्लॅन तयार करण्यात आला आहे. दुपारपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती.

  • म्हणे तांत्रिक

अडचणम्हणे तांत्रिक अडचण  हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावरील पार्किंग बंद करण्यात आल्याने ती खुली केली जात आहे. मात्र पार्किंग खुली करताना कॉलमला धक्का लागला तर इमारत कोसळण्याचा धोका आहे. ही तांत्रिक अडचण पुढे करत महापालिका हातचा राखून कारवाई करत आहे. मात्र कॉलमला धक्का न लावता पार्किंगच्या जागी असलेले बांधकाम जेसीबी, कर्मचार्‍यांकरवी काढणे शक्य आहे. पण त्यासाठीचे कष्ट महापालिका घ्यायला तयार नाही असेच एकंदरीत चित्र आहे.

  • डॉक्टर जाणार खंडपीठात 

महापालिकेच्या कारवाईविरोधात डॉक्टरांच्या इमा संघटनेने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टांची बाजू ऐकून घ्यावी असे संघटनेचे म्हणणे आहे. कारवाईदरम्यान रुग्णसेवेत अडथळे निर्माण होणार असून कामकाज विस्कळीत होणार आहे. शिवाय महापालिकेच्या रुग्णालयात मिळत असलेल्या सेवेचाही विचार करावा असा सूर इमाच्या बैठकीत निघाला.

LEAVE A REPLY

*