बहिष्कार टाळणे बरे!

0
लग्नहसोहळ्यातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा निर्णय नाशिक जिल्ह्यातील गिरणारे ग्रामस्थांनी घेतला आहे. हळदीचा कार्यक्रम फक्त घरगुती असावा, नवरदेवाच्या वरातीत मोठी गर्दी टाळावी, जागरण व गोंधळात गावजेवणे बंद करावीत, लग्नात फेटे बांधण्याची तसेच अन्य धार्मिक विधीत टॉवेल-टोपी देण्याची प्रथा बंद करावी, डामडौलावर मोठा खर्च करणार्‍या लग्नावर बहिष्कार टाकावा, असे काही ठराव नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत संमत करण्यात आले.

वाढत्या महागाईमुळे सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट झाली आहे; पण लग्नसमारंभातील पोकळ डामडौल व विविध कार्यक्रमांचा खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. श्रीमंतांची लग्ने शाही थाटात पार पडतात. त्याचे अनुकरण इतरांनी करण्याचे कारण नाही. समाजातील ‘नाही रे’ वर्गावर या थाटामाटाचा अकारण प्रभाव पडतो. गाजावाजाने होणार्‍या लग्नसमारंभांमुळे हा वर्ग आर्थिक आरिष्टाला आमंत्रण देत आहे.

हुंड्याची पद्धत बंद व्हावी म्हणून सरकारने कायदा केला; पण या कायद्याची अनेकदा उघडपणे पायमल्ली होत असलेली पाहावी लागते. लग्नसोहळ्यातील देणेघेणे आणि मानपान याचा ताण असह्य होऊन काही तरुणींनी जीवन संपवण्याच्या दुर्दैवी घटनादेखील अलीकडे कुठे ना कुठे घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गिरणारे ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. समाजाला सुसंस्कारीत करू पाहणारा आहे. म्हणून अनुकरणीय आहे.

तथापि त्यातील बहिष्काराचे कलम टाळलेले बरे! बहिष्कार टाकण्याऐवजी संबंधितांच्या मतपरिवर्तनावर भर दिला जावा. बहिष्कारामुळे समाजात द्वेष निर्माण होतो व तेढ वाढते. त्याचे परिणाम पिढ्या न् पिढ्या भोगावे लागतात. समाजातील वातावरण गढूळते व परस्पर दुरावा वाढतो. समाजातील रुढी-परंपरांचा पगडा कमी होण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते.

तथापि परिवर्तन होऊ शकते हे गिरणारेकरांनी केलेल्या ठरावांनी स्पष्ट होत नाही का? हा बदल म्हणजे शिक्षणाचा सुपरिणाम आहे. शिकलेल्या मुलीदेखील आत्मविश्‍वासाने धाडसी निर्णय घेऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यात एक खेड्यातील तरुणीने हुंडा मागणार्‍या स्थळाला ठाम नकार देण्याचे धाडस दाखवले. इतके नव्हे तर समविचारी मुलींना एकत्र करून तिने हुंडा निर्बंध यात्रासुद्धा काढली. समाज बदलतो आहे याचे हे ढळढळीत उदाहरण नव्हे का? म्हणूनच गिरणारे ग्रामस्थांनी केलेल्या ठरावांबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले पाहिजे; पण त्यातील बहिष्कार तेवढा टाळलेला बरा!

LEAVE A REPLY

*