बहिष्काराचा पळपुटेपणा नको!

0
साहित्य संमेलनावर बहिष्कार नको, अशी भूमिका काही साहित्यिकांनी घेतली. ती साहित्यिकांवर पळपुटेपणाचा आक्षेप आणणारीच ठरेल. यासाठी साहित्यिकांनी संमेलनाला हजर राहायला हवे, असे आवाहन काही ज्येष्ठ साहित्यिकांनी केले आहे.

आवाहन करणार्‍या ज्येष्ठांत मधू मंगेश कर्णिक, शेषराव मोरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. गो. बं. देगलूरकर, जयराज साळगावकर, डॉ. स्नेहलता देशमुख, मंगला गोडबोले, द. मा. मिरासदार, ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर आदींचा समावेश आहे. दीर्घकाळानंतर यंदा एका साहित्यिकेला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्या निवडीचे सर्व स्तरातून उत्तम स्वागत झाले. मात्र संमेलनावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेणार्‍यांवर पुरुषप्रधान मानसिकतेतून निर्वाचित अध्यक्षांचा अवमान केल्याचा आक्षेप घेतला जाईल.

श्रीमती सहगल यांना दिलेले आमंत्रण परत घेऊन महामंडळाने एक मोठी चूक केली. निर्वाचित महिला अध्यक्षांचा अवमान करणारी भूमिका घेतली गेली तर त्याहून मोठी घोडचूक केल्याचा दोष अकारण पत्करावा लागेल. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणार्‍या भूमिकेशी समान असा हा दृष्टिकोन साहित्यिकांनी स्वीकारावा का? अशीही शंका कदाचित ज्येष्ठ साहित्यिकांच्या सूचनेमागे असू शकते. ती उपेक्षणीय नाही. नयनताराजी यांच्या अवहेलनेचा निषेध व्हायलाच हवा; पण संमेलनावर बहिष्कार टाकून तो कसा सिद्ध होणार?

मराठी साहित्य क्षेत्राची ‘न भूतो न भविष्यती’ अशी नामुष्की संमेलनावर बहिष्कार टाकणार्‍या मराठी साहित्यिकांना पत्करावी लागेल. आवाहन करणार्‍या साहित्यिकांचे मराठी सारस्वतांच्या दरबारातील स्थान मोठे आहे. संमेलनाला हजर राहून आयोजकांना त्यांच्या प्रमादाचा जाब विचारणे अधिक संयुक्तिक व श्रेयस्कर ठरेल. झालेली वा केलेली चूक नेमकी कोणाची, याचा शोध घेऊन तो गुन्हा संबंधितांच्या माथी मारता येईल.

यंदाच्या संमेलन अध्यक्षपदासाठी अविरोध निवड केलेल्या अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षपदाचा योग्य मान राखल्याचे श्रेय साहित्यिकांना मिळू शकेल. अन्यथा महिलाविरोधी दृष्टिकोन स्वीकारल्याचा दोष बहिष्कार टाकणारे कोणत्यारितीने नाकारू शकतील? निदान मराठी सारस्वतांच्या दरबारात स्त्री-पुरुष भेदाला स्थान नाही हे कृतीने दाखवून देण्याची जबाबदारी सर्व साहित्यिकांनी स्वीकारली पाहिजे.

तोंडाने महिला सबलीकरणाचा रात्रंदिवस जप करणार्‍या नेतेमंडळींकडून राज्य व केंद्राच्या विधिमंडळांतून महिलांची संख्या घटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहे. समाजाला पुरोगामी दृष्टिकोन साहित्यातून मिळतो. तो देणार्‍या साहित्यिकांनी तरी अनावधानानेसुद्धा नेत्यांच्या त्या प्रयत्नाला पाठबळ मिळेल असे वर्तन करू नये,

असाच ज्येष्ठ साहित्यिकांच्या आवाहनाचा मतितार्थ असावा. त्या आवाहनाचा मान ठेऊन साहित्य संमेलन यशस्वी करावे, हेच साहित्यिकांना श्रेयस्कर ठरेल.

LEAVE A REPLY

*