बहिणीकडे आलेल्या भावाची संशयास्पद निर्घृण हत्त्या

0

अकोले (प्रतिनिधी)- बहिणीकडे आलेल्या भावाची संशयास्पद निर्घृण हत्त्या करण्यात आली असल्याची घटना गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गर्दनी (ता.अकोले) येथे घडली आहे. धोंडीबा नारायण वाकचौरे (वय 70, रा.परखतपूर, ता. अकोले) असे या घटनेत ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

 

 

दरम्यान याप्रकरणी अज्ञात दोघा जणांविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गर्दनी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर दशरथ पंढरीनाथ नाईकवाडी हे विरगाव -गर्दनी रस्त्यावरील रुईके दरा येथे राहतात. त्यांचे मेव्हणे म्हणजेच पत्नीचे भाऊ धोंडीबा नारायण वाकचौरे हे गुरुवारी गर्दनी येथे आपल्या बहिणीकडे मुक्कामी आले होते. बाकीचे लोक आतमध्ये घरात झोपले होते. तर मयत वाकचौरे हे घराच्या पडवीत झोपले होते. गुरुवारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान पडवीत झोपलेल्या धोंडीबा वाकचौरे यांचा आई ग मेलो, मला वाचवा, अशा मोठमोठ्याने आरोळ्या घरातील लोकांनी ऐकल्या. तेव्हा मेव्हणे दशरथ नाईकवाडी यांनी खिडकी उघडली तेव्हा दोन जण मोटारसायकलवर पळून जाताना नाईकवाडी यांनी पाहिले.

 

वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम आरोटे हे आपल्या सहकार्‍यांसह तेथे पोहचले. तव्हा मयत वाकचौरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होते. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. डॉ. आरोटे यांनी त्यांना तपासले व त्यांना मृत घोषित केले.

 
घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, सरपंच किसन नाईकवाडी, पोलीस पाटील संतोष अभंग, माजी उपसरपंच रामनाथ मुतडक आदींनी पोलिसांना कळविली. घटनेनंतर पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पो.निरीक्षक महेंद्रकुमार अहिरे, उपनिरीक्षक नितीन बेंद्रे आदींनी गर्दनी गावात जाऊन घटना स्थळी पाहणी केली. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी भेट दिली व ग्रामस्थांना दिलासा दिला. या घटनेतील गुन्हेगारांना दोन दिवसांत पकडू, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी ग्रामस्थांना दिली.

 

 
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात दशरथ नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीअकोले पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये दोघा अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*