बर्थ सर्टिफिकेट; महापालिकेत डिजीटल सेवेचा जन्म

0

पालकांची परवड थांबणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- बाळाच्या जन्माच्या दाखल्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज आता नगरकरांना भासणार नाही. काही क्षणात बाळाच्या जन्माचा दाखला आता नागरिकांच्या हाती मिळणार आहे. महापालिकेने पुढचे पाऊल टाकत या सिस्टीमचे डिजीटलायझेशन केले आहे. 1992 ते 2017 या दरम्यानचे 5 लाख दाखल्यांची नोंद महापालिकेने संगणकावर केली आहे.

महापालिका हद्दीतील जन्म-मृत्युची नोंद महापालिकेच्या दप्तरी झाल्यानंतर संबंधिताचा दाखला दिला जात होता. त्यावर आरोग्य अधिकार्‍याची सही असल्याने अनेकांना वेटींग करावी लागत असे. शिवाय हाताने लिखापढी असल्याने जन्माचा किंवा मृत्युचा दाखला काढताना नागरिकांना रांगेत उभे रहावे लागत होते. आता ती वेळच येणार नाही. कारण महापालिकेने दाखले देण्याची जुनी पध्दतच बदलून टाकली आहे. संगणकावरील दाखला काही क्षणात नागरिकांच्या हाती पडणार आहे. जानेवारी 2016 पासून महापालिकेच्या आरोग्य विभागात दाखल्यांची नोंद संगणकावर करण्यास सुरूवात झाली. गत आठवड्यात ही नोंद संपली. 1992 ते 2017 या कालावधीतील किमान पाच लाख नोंदी संगणकावर करण्यात आल्या आहेत. दाखल्यांचे डिजीटीलाईझेशन झाल्यानंतर जुन्या महापालिका कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. 20 रुपये भरून अर्जंट दाखला नागरिकांना मिळण्यास सुरूवात झाली आहे.
जन्माचा पहिला दाखला हा नागरिकांना महापालिकेकडून मोफत दिला जातो. आरोग्य अधिकारी असो किंवा नसो दाखला तत्काळ नागरिकांच्या हाती पडणार आहे. कोणाच्या सहीसाठी किंवा कोणत्या लिखापढीसाठी आता थांबण्याची गरज नाही.

बोगस नोंदींना बसणार आळा
पूर्वीच्या पध्दतीत हाताने लिखापढी होत असल्याने चुकीच्या पध्दतीने नोंदी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा होत असे. आता जुनी सिस्टीम बंद करून नव्याने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने नोंद होणार नाही. शिवाय आरोग्य विभागातील कर्मचर्‍यांमधील समन्वयाचा अभाव असल्याच्या तक्रारीचेही अपोआपच निराकरण झाले आहे.

पूर्वीची पध्दत बंद करून नव्याने डिजीटीलाईझेशन पध्दत सुरू करण्यात आली आहे. दाखल्यासाठी आता कोणाला थांबण्याची गरज नाही. तत्काळ दाखला हाती पडत आहे. फार जुने दाखले मात्र मी स्वत: हाताने लिहून देणार आहे.
– डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी.

5 लाख दाखल्यांची संगणकावर नोंद
गत 25 वर्षातील कागदपत्रांवरील नोंद आता संगणकात करण्यात आली आहे. 1992 पासूनचे सुमारे 5 लाख दाखले संगणकावर नोंदण्यात आले आहेत. 1935 व त्यापूर्वीचे रेकॉर्ड महापालिकेत उपलब्ध आहे. त्याचेही टप्प्याटप्प्याने संगणकीकरण केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*