बनावट नोटा तयार करणारे दोघे संशयीत जाळ्यात; आडगांव पोलीसांची कामगीरी; 6 बनावट नोटा जप्त

0

पंचवटी । दि. 7 प्रतिनिधी
2 हजार रुपयांच्या बनावट नोटा स्कॅनरप्रिंटर तयार करून या चलनात आणणार्‍या दोघा संशयीतांस आडगांव पोलीसांनी माडसांगवी परिसरांतून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून स्कॅनरप्रिंटर व 2 हजार रुपयांच्या 6 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान या दोघां संशयीतांनी यापुर्वी देखील बनावट नोटा तयार करून ग्रामिण भागात चलनात आणल्या असल्याचा पोलीसांना संशय असून आडगांव पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.
आडगांव पोलीस ठाण्यात या प्रकरणी मांडसांगवी येथील हॉटेलमालक चंद्रभान नारायण गोडसे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आकाश भारत भावसार(वय.23 रा.ध्रुवनगर, गंगापुररोड), संतोष भिका तामखने(वय.20 रा.तामखने टॉवर्स, गंगापुररोड) या संशयीतांस अटक केली आहे. चंद्रभान गोडसे यांनी आडगांव पोलीसांना आय-20 या कारमधून एक व्यक्ती येवून 100 रुपये किंमतीच्या वस्तू घेवून त्या बदल्यात 2 हजार रुपयांची बनावट नोट देतो. व उर्वरित 1 हजार 900 रुपये परत घेतो अशी माहिती दिली होती. अश्या प्रकारे गत आठवड्यात माडसांगवी येथील कटरली दुकानदार विजय पेखळे यांना देखील 2 हजार रुपयांची बनावट या संशयीताने दिली. तसेच पानटपरी चालक मंदाबाई गंगाराम साळवे यांना देखील 2 हजार रुपयांची नोट देवून त्यांच्याकडून 70 रुपयांचे सिगारेटचे पाकीट घेतले. यावेळी मंदाबाई साळवे यांनी 2 हजार रुपयांची नोट हॉटेल चालक चंद्रभान गोडसे यांना दिली. मात्र ही नोट दुसर्‍या नोटे बरोबर लावून बघीतला असता ही नोट बनावट असल्याचे लक्षात आले. तसेच गत आठवड्यात विजय पेखळे यांना ज्या व्यक्तीने 2 हजार रुपयांची बनावट नोट दिली तोच हा व्यक्ती असल्याचा संशय आल्याने त्यांनी आडगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक सुनिल पुजारी यांना माहिती दिली. या नंतर पोलीसांनी माडसांगवी येथे जावून संशयीत आकाश भारत भावसार यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता संतोष भिका तामखने हा देखील बनावट नोटा छापत असल्याचे उघड झाले. यानंतर पोलीसांनी त्यांच्याकडून स्कॅनरप्रिंटर व 2 हजार रुपयांच्या 6 बनावट नोटा जप्त केल्या आहे.

LEAVE A REPLY

*