LOADING

Type to search

बंद गर्भनलिका

आरोग्यदूत

बंद गर्भनलिका

Share
कोणत्याही कारणाने गर्भाशयात जंतू शिरले की, ते गर्भनलिकांमध्येही जाण्याचा प्रयत्न करतात. जंतू गर्भनलिकात शिरले की ते गर्भनलिकांना इजा पोहोचवू लागतात. जंतू भराभर वाढतात आणि विषारी टॉक्सीन्स बनू लागतात. त्यामुळे गर्भनलिकेला सूज येऊ लागते.

गर्भनलिकेच्या आतल्या बाजूला जखमा होऊ अतिसूक्ष्म रक्तस्त्राव सुरू होतो. जंतूंचा प्रादुर्भाव शरीराच्या प्रतिबंधक शक्तींनी, अण्टीबायोटिक्सनी व सूज कमी करणार्‍या औषधांनी नष्ट केला तर या गर्भनलिका जवळजवळ नॉर्मल होतात. नाहीतर वर सांगितलेल्या प्रकारांनी गर्भनलिकांना कायमची इजा पोहोचते. गर्भनलिकांमध्ये वाटेत पडद्यासारखे अडथळे निर्माण होतात. नळीचा आकार कमी अधिक जाड बारीक होऊन मध्येच गर्भनलिका फुग्यासारख्या मोठ्या होतात आणि मध्येच नळी चेपली जाऊन बंद पडतात.

गर्भाशयाशी गर्भनलिका जोडली जाणारा कॉर्नू हा सर्वात अरुंद भाग असल्याने तो लगेच बंद होतो.काही वेळा गर्भनलिका एकाच ठिकाणी बंद असते तर काही वेळा अनेक ठिकाणी बंद असते.गर्भनलिकेचा मधला भाग मण्याप्रमाणे कमी जास्त जाड होऊन तेथे वेगवेगळे अडथळे तयार होतात. वेगवेगळ्या ठिकाणी गर्भनलिका बंद पडते.

काही वेळा, पिसार्‍यासारखा असणारा ‘फिंब्रियल एंड’ हा टोकाचा भाग, तेथे सूज आल्याने एकमेकांना चिकटला जातो. आणि त्याचे टोक आत येऊन वरुन पाकळ्यांप्रमाणे भाग येऊन येथे गर्भनलिका बंद होते. त्या मानाने हा गर्भनलिकेचा भाग बराच रुंद असतो. पण तो बंद झाल्यावर त्यात सूज येऊन पाण्याप्रमाणे द्रवपदार्थ साठत जातो आणि गर्भनलिका या टोकाशी फुग्याप्रमाणे फुगू लागते. ताणली जाऊ लागते. याला ‘हायड्रोसाल्पिंग्ज’ म्हणतात. काही वेळा जंतूंच्या प्रादुर्भावाने येथे पाण्याऐवजी ‘पू’ साठत जातो किंवा जखमातून रक्त (सूक्ष्म) साठते. गर्भनलिका ताणली जाऊन, फुग्यासारखी झाली की तिच्या सर्व अस्तरांना इजा पोहोचते. फ्रिब्रियल एंड हा स्त्रीबीज पकडणारा अति संवेदनाक्षम भाग असल्याने त्याचे काम महत्त्वाचे असते. पण त्याचा अशाप्रकारे जंतू ‘बट्ट्याबोळ’ करतात.

काही वेळा जंतूंचा अ‍ॅटॅक संपल्यावर गर्भनलिका वरून ठाकठीक दिसतात. त्यांची पोकळीही मोकळी असते. पण त्यांची लवचिकता, स्त्री बीज नेण्याची शक्ती नाहीशीच झालेली असते. अशावेळी या गर्भनलिका मोकळ्या असूनही गर्भधारणेसाठी त्यांचा शून्य उपयोग असतो.

एकदा दोन्हीही गर्भनलिका खराब होऊन बंद झाल्या की गर्भधारणा होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आणि चुकून गर्भधारणा झालीच तर एक्टॉपीक प्रेग्नन्सी यासारखा अतिशय गंभीर, जीवाला धोका असणारा प्रकार घडू शकतो.

बंद नळ्या उघडण्यासाठी ऑपरेशनशिवाय आज तरी योग्य मार्ग नाही. आणि या ट्युबोप्लास्टी नावाच्या विविध ऑपरेशनमध्ये बंद गर्भनलिका मोकळी केली गेली तरी दिवस राहण्याची शक्यता फारच कमी असते. कारण कोणी कितीही बढाया मारल्या तरी फार तर बंद गर्भनलिका मोकळ्या होतील पण जळून गेलेल्या गर्भनलिकेच्या आतल्या अस्तराचे काम सुरू होणे फार अवघड असते आणि त्याशिवाय चांगली गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते! मायक्रोस्कोपीक सर्जरी, केसांसारखे सात झिरो, आठ झिरो, दहा झिरो इत्यादी शिवण्याचे विविध धागे यांनी गर्भनलिका मोकळी होऊन जोडलेले भाग नीटस दिसतील, पण गर्भनलिकेचे नैसर्गिक काम चालू होणे ही दैवाची खैर!

अर्थात याचा अर्थ गर्भनलिका बंद असतील तर दैवावर हवाला ठेवावा असा बिलकूल नाही. गर्भनलिका कायम बंद राहिल्या तर गर्भ राहण्याचा संभव शून्यच! या उलट ऑपरेशननंत गर्भनलिका मोकळ्या झाल्यास दिवस राहण्याचा चान्स नक्कीच वाढेल. पण ट्युबोप्लास्टी केली की आपल्याला दिवस राहतीलच हा गैरसमज काढून टाकावा! त्यातूनही या ऑपरेशनला खर्चही खूप येऊ शकतो. (सध्याच्या परिस्थितीत दहा ते वीस हजार यांच्या दरम्यान (अंदाजे) यात खूप कमी जास्त फरक पडू शकेल.

गर्भनलिका बंद असल्यावरची ऑपरेशन यांनाच बर्‍याच वेळा ट्युबोप्लास्टी ऑपरेशन असे संबोधले जाते.यामध्ये गर्भनलिकेचा जेवढा भाग बंद झालेला असेल तो कापून, काढून टाकतात आणि उरलेली चांगली गर्भनलिका एकमेकांना शिवून पुन: नळी चांगली करतात. ही सोपी वाटली तरी अतिशय किचकट, मायक्रोस्कोपीक व वेळ घेणारी ऑपरेशनची पद्धत आहे. ‘फिंब्रीयोप्लास्टी’ या ऑपरेशनमध्ये गर्भनलिकेची टोकाची ‘बॅडमिंटनच्या शटलची’ प्रत्येक पिसाची जाळी सुटी करून त्या जाळ्या एकमेकांना शिवतात.

1) कॉर्नूअल ब्लॉक : गर्भनलिका गर्भाशयाशी बंद असेल तर तेथे बंद भाग कापतात, गर्भनलिका गर्भाशयात मार्ग करून घालतात व शिवतात.

2) गर्भनलिका मधल्या भागात बंद असेल तर तो भाग कापून, गर्भनळीला नळी जोडतात.

3) टोकाचा भाग बंद असल्यास वरील फिंब्रीयोप्लास्टी करतात.

4) टोकाचा भाग खराब असल्यास तेथे फुलासारखा भाग तयार करतात.

5) अ‍ॅढीजीनोलायसीस : गर्भनलिकेला चिकटलेले पडदे कापून, गर्भनलिका (वरून) मोकळी करतात.

शिवाय ट्युबोप्लास्टी हे ऑपरेशन एकदाच करण्यात फायदा असतो.

डॉ. रविराज खैरनार डॉ. सौ. अर्चना खैरनार
स्त्रीरोग, प्रसूती तज्ज्ञ (एम.डी.डी.जी.ओ.)
मोबा. 9822025836

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

Next Up

error: Content is protected !!