Type to search

ब्लॉग

बंगालमध्ये कोणाची ‘हवा’?

Share

कम्युनिस्ट पक्षांच्या, लाल बावट्याच्या बालेकिल्ल्यात कधीतरी भाजपचा शिरकाव होईल, असे कोणालाही कधीही वाटले नव्हते. पण तसे झाले खरे. यंदाची निवडणूक त्यात काय रंग भरते ते लवकरच कळेल.

कसभेच्या यावेळच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 42 मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष, डावे पक्ष, काँग्रेस व भाजप एकमेकांविरुद्ध शस्त्रे परजून आहेत. तरी खरी लढत आहे ती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात! भाजप मोदी यांच्या नावावर मते मागतो आहे, तर ममतादीदी तृणमूल काँग्रेसचे हुकूमी पान. त्या उघड उघड मतदारांना सांगतात, ‘मी सर्व 42 मतदारसंघांत निवडणूक लढत आहे.’ तर पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘कमळाला दिलेले प्रत्येक मत मोदीला-मला मिळणार आहे!’

कम्युनिस्ट पक्षांच्या लाल बावट्याच्या बालेकिल्ल्यात कधी भारतीय जनता पक्षाचा शिरकाव होईल, असे कुणाला वाटलेही नव्हते. पण 2014 च्या मोदी लाटेमध्ये भाजपने प. बंगालमध्ये दोन जागा जिंकल्या. तृणमूल काँग्रेस पक्षाने 42 पैकी तब्बल 34 जिंकल्या आणि काँग्रेसला 4 व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी 2019 च्या निवडणुकीत मोदी लाट फारशी दिसत नाही. पंतप्रधान मोदी यांना पराभूत करण्यासाठी तमाम विरोधी पक्षांनी कंबर कसली. मोर्चेबांधणीचाही प्रयत्न झाला. परंतु निवडणुकीपूर्वी त्यांची एकजूट, महाआघाडी मात्र प्रत्यक्षात आली नाही.

निवडणुकीनंतरच्या स्वतःला अपेक्षित संभाव्य स्थितीवर नजर ठेवत राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा महत्त्वाकांक्षी ममता बॅनर्जी यांनी चंग बांधला आहे व त्यासाठी भाजप आणि अन्य पक्षांना रोखण्याकरिता सर्वकाही करण्यास त्या तयार आहेत. राज्यातील मुर्शिदाबाद, जांगीपूर इत्यादी मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये आपल्या मतदारांना मते देण्याची संधी तरी मिळेल का, अशी चिंता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भाजपला सतावत आहे. तर कोणताही झगडा, हिंसाचार न होता निवडणूक निर्विघ्नपणे, सुरळितरीत्या पार पडू दे, अशी प्रार्थना मतदार करताहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव प. बंगालमध्ये निवडणूक ही सात टप्प्यांमध्ये घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी भडकल्या, संतापल्या हे यावरून सहज समजू शकते.

दुसरीकडे उत्तर प्रदेश व अन्य हिंदी भाषिक राज्यांमध्ये होणारे पक्षाचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी मोदी व अमित शहा यांनी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या ना त्या मुद्यावर व कारणांनी भाजपने येथे वातावरण तापत ठेवले. पंतप्रधान मोदी यांनी पाचवेळा पश्चिम बंगालचा दौरा केला. कोलकातामधील ब्रिगेड ग्राऊंडवर लाखोंची जाहीर सभा ही आजवर मार्क्सवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाची मक्तेदारी होती. अलीकडेच येथे झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेला सुमारे 3 लाख लोक उपस्थित होते! गेल्या दोन-तीन वर्षांपासून या राज्यात पाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होत असल्याचे हे लक्षण आहे. खासकरून प. बंगालच्या उत्तर भागात रा. स्व. संघाच्या मदतीने केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याची चर्चा आहे.

प. बंगालच्या 42 जागांपैकी 23 जागा आम्ही जिंकू, असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या काही महिन्यांत वारंवार केला. 23 जरी नाही तरी 2 वरून भाजप 10 वर जरी पोहोचला तरी त्या पक्षासाठी हे मोठे यश, मोठा विजय मानावा लागेल आणि ममता बॅनर्जी यांना नेमके हेच खुपते आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या राज्यात 12 टक्के मते मिळाली. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील भाजपची कामगिरी ही काँग्रेस व मार्क्सवादी पक्षाच्या तुलनेत उजवी होती. यावेळी भाजपला सुमारे 30 टक्के मतांची येथे अपेक्षा आहे.

परंतु एवढी सर्व मते मिळणार कुठून, हा प्रश्न राहतोच. राज्यातील लोकसंख्येत 30 टक्क्यांपेक्षा अधिक संख्येचा मुस्लीम समुदाय आणि हा समुदाय म्हणजे ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची पक्की व्होट बँक! मुस्लिमांच्या लांगून चालनाच्या ममता यांच्या धोरणामुळे राज्यातील उच्चवर्णीय हिंदू ममतांवर नाराज असल्याचे सांगतात. त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधी लाटेत तृणमूल काँग्रेस पक्षाकडे वाहत गेलेले लोक आता ममता बॅनर्जींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपच्या किनार्‍याला येतील, अशी भाजप नेतृत्वाची केवळ अटकळच नव्हे तर त्यांना तसा विश्वास वाटतो.

प. बंगालमध्ये भाजपच्या वाढत्या उपस्थितीत चिंतीत ममतादीदी आता राज्यातच झंझावाती प्रचार करीत आहेत. प्रत्येक मतदारसंघात दोन ते तीन वेळा अशा मिळून 80 पेक्षा अधिक प्रचार सभांचा धडाका त्यांनी लावला आहे. तृणमूल काँग्रेसची मदार मुस्लीम मतदारांवर आहे. काही मतदारसंघात 50 टक्क्यांपेक्षा अधिक अल्पसंख्याक आहेत. भाजपची भिस्त ही ममता बॅनर्जींवर नाराज मतदारांबरोबरच पूर्व उत्तर प्रदेश व बिहारमधून येथे आलेल्या स्थलांतरीतांवरही आहे. ‘विकासाच्या मार्गावर ममता या स्पीडब्रेकर असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी करतात. तर प. बंगाल राज्यासाठी भाजप धोकादायक असल्याचा इशारा ममता बॅनर्जी जाहीर सभांमधून सांगताहेत. 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सत्ता गाजवलेल्या डाव्या पक्षांची त्यांच्याच या किल्ल्यात आज दयनीय अवस्था झाली आहे.’ मतांची झोळी भरण्यासाठी मतांच्या ध्रुवीकरणापासून ते मतदारांच्या अनुनयापर्यंत राजकीय पक्षांनी प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. 42 मतदारसंघांपैकी बहेरामपूर, रायगंज, बालूरघाट, जांगीपूर, दार्जिलिंग, असनसोल, मालदा उत्तर, डमडम, मुर्शिदाबाद येथील लढती चुरशीच्या असतील.

रायगंजमध्ये मार्क्सवादी पक्षाचे विद्यमान खासदार सलीम अहमद यांनी यावेळी निवडणूक जिंकणे सोपे नाही. दीदी दासमुन्शी (काँग्रेस), कन्हैयालाल अगरवाल (तृणमूल काँ.) व देवश्री चौधरी (भाजप) यांना टक्कर देत आहेत. सुमारे 53 टक्के मुस्लीम मतदार असलेल्या रायगंजमधील चौरंगी सामन्यात मुस्लीम मतांचे विभाजन आणि हिंदू मतांचे ध्रुवीकरण हे समीकरण भाजपला फायद्याचे ठरेल?

जांगीपूरमध्ये अभिजित मुखर्जी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव. अलीकडच्या काळात रा. स्व. संघ आणि नरेंद्र मोदी यांच्याबरोबर प्रणवदांचे स्नेहसंबंध, अभिजितची संसदेची वाट सुकर करू शकतात. बहरामपूर हा काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांचा गड. पाचव्यांदा ते निवडणूक लढवीत असून आमदार अपूर्व सरकार (तृणमूल काँ.) त्यांना टक्कर देत आहेत. परंतु डाव्या आघाडीने येथे काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याने अधिरंजन चौधरी ही जागा स्वतःकडे राखू शकतील.

मालदा उत्तर हादेखील काँग्रेसचा बालेकिल्ला. माजी रेल्वेमंत्री अब्दुल गनी खान चौधरी यांच्या प्रदेशात, अब्दुल हसन खान चौधरी (काँ), श्रीरूपा मित्रा (भाजप) व मोअज्जम हुसेन (तृणमूल) यांच्यात त्रिकोणी लढत आहे. सुमारे 65 टक्के मुस्लीम मतदारांच्या या मालदामध्ये 2014 मध्ये भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता. खासदार अभिषेक बंडोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांचे पुतणे. त्यांचे स्वत:चे प्रभावी व्यक्तिमत्त्व नाही. पण केवळ ममता यांचे पुतणे म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांचा दबदबा. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमुळे तृणमूल काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत.

डायमंड हार्बर या मतदारसंघातही नाराजी अभिषेक बंडोपाध्याय यांना काही प्रमाणात अडचण निर्माण करू शकते. दार्जिलिंग निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 2014 मध्ये भाजपचे एस. एस. अहलुवालिया येथून जिंकले. पण मतदारसंघात ते पुन्हा फिरकलेच नाहीत. भाजपने यावेळी राजू सिंग बिष्ट यांना तिकीट दिले. गोरखा लॅण्ड न्व्हे तर गोरखा समुदायाच्या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाय शोधण्याचे आश्वासन भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिले असल्याने आजही गोरखा लोक भाजपच्या बाजूने आहेत.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची पत्रकारांबरोबर बातचीत झाली होती. बंगालमध्ये भाजपकडे ना नेतृत्व, ना चेहरा, ना मजबूत पक्षसंघटना अशा स्थितीत कशाच्या आधारावर तुम्ही 23 जागा जिंकण्याची अपेक्षा ठेवता? असे एका पत्रकाराने त्यांना विचारले. त्यावर ‘हम हवा पे चुनाव लडेंगे, भाजप की लहर होगी, बंगाल के लोग देशके प्रधानमंत्री को व्होट देंगे’, असा दावा शहा यांनी केला होता. निवडणुकीच्या घोडामैदानावर घोडे तर धावू लागले आहेत… पाहू या.. बंगालमध्ये काय हवा असेल ते.
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!