बँक खात्यांचे ‘आधार’ संलग्नीकरण युद्धपातळीवर करा – जिल्हाधिकारी

0

जळगाव |  प्रतिनिधी : लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्याच्या धोरणास अनुसरुन बँक खात्यांचे आधार क्रमांकाशी संलग्निकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत दिले जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक एस. व्ही. दामले, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, नाबार्ड बँकेचे सोमवंशी, सामाजिक उत्थान व प्रशिक्षण केंद्राचे एस.एस. इखारे, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक सुनिल सराते यांच्या सह विविध बँकांचे शाखाप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात आधार सीडींग अर्थात आधार क्रमांकाचे बँक खात्याशी संलग्नीकरण काम येत्या कालावधीत युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक बँकनिहाय आधार क्रमांक संलग्निकरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

तसेच यावेळी पिक कर्ज वितरणाचाही आढावा घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील विविध बँकांतून रब्बी हंगामासाठी ९२ टक्के (१९३ कोटी ७० लाख रुपये) पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर खरीप हंगामासाठी ८४ टक्के (२२३९ कोटी १८ लाख रुपये) पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.

तसेच प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँक खाते सुरु केलेल्या नागरिकांना रुपे कार्ड वापराबाबतचाही आढावा घेण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेत जि.प. सीईओ आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक दामले आदींनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

*