फुले मार्केटच्या जागेप्रकरणी मनपाला नोटीस

0

जळगाव |  प्रतिनिधी :  महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलाची जागा वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तातरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची किंवा शासनाची पुर्व परवानगी घेतलेली नसून अटी-शर्तीचे भंग केले. त्यामुळे ही जागा सरकार जमा का करण्यात येवू नये, यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून महापालिकेला प्राप्त झाली आहे.

मनपा मालकीच्या २९ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली होती. गाळे कराराने देण्यबाबत महासभेने १३५ क्रमांकाचा ठराव केला होता. परंतु काही व्यापार्‍यांनी या ठरावाबाबत हरकत घेवून शासनाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री ना.रणजीत पाटील यांच्याकडे सुनावणी झाली. सुनावतीअंती १८ व्यापारी संकुलांपैकी महात्मा फुले व्यापारी संकुल, सेंट्रल फुले व्यापारी संकुलासह चार व्यापारी संकुलाची जागा महसूलची असल्यामुळे याबाबत शासन निर्णय घेईल.

तर उर्वरित १४ व्यापारी संकुलाची जागा महापालिकेची असून याबाबत मनपाने निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार चार व्यापारी संकुलाबाबतचा निर्णय शासनाकडे प्रलंबित होता. दरम्यान, महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलाची जागा ही सत्ता ब प्रकाराची आहे.

ही जागा दैनंदिन बाजार व आठवडे बाजार या प्रयोजनासाठी देण्यात आली होती. परंतु तत्कालीन जळगाव नपाने जमिन वापराच्या प्रयोजनात बदल करण्यासाठी व गाळे हस्तातरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची किंवा शासनाची पुर्व परवानगी घेतलेली नसून अटी-शर्तीचे भंग केले.

त्यामुळे ही जागा सरकार जमा का करण्यात येवू नये, यासाठी महानगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावावी, असे आदेश शासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी महानगरपालिकेला ७ दिवसात म्हणणे मांडावे, अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

नोटीसचे उत्तर देणार – आयुक्त

महात्मा फुले, सेंट्रल फुले व्यापारी संकुलाची जागा सरकार जमा का करण्यात येवू नये? अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकार्‍यांनी बजावली आहे. येत्या सात दिवसात नोटीसचे उत्तर जिल्हाधिकार्‍यांना देणार असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले.

उच्च न्यायालयात जाणार – महापौर

महात्मा फुले व सेंट्रल फुले व्यापारी संकुलाची जागा महसुलची नाही तर मनपाची आहे. १९१८ मध्ये सिटी सर्व्हेअर, ब्रिटीश अधिकारी अंडरसन यांनी शहरातील संपूर्ण गावठाणाची जागा नगरपालिकेचे असल्याचे पत्र दिले होते. हे सर्व पत्र आणि सनद देखील मनपाकडे उपलब्ध आहे.

जागा मनपा मालकीची असल्याचे शासनाकडे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु व्यापार्‍यांच्या फेडरेशनला मालकी हक्काने जागा देण्यासाठी शासनाकडून मनपाची कोंडी केली जात असेल तर या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर नितीन लढ्ढा यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*