Deolali Railway camp
Deolali Railway camp|एक निरागस स्टेशन
फीचर्स

एक निरागस स्टेशन : डॉ.अरूण स्वादी

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

- डॉ.अरूण स्वादी

जुलै-ऑगस्टमध्ये, पावसाळ्यात स्टेशनवर, नुकताच पाऊस पडून गेल्यावर हवीहवीशी वाटणारी कुंद हवा असायची किंवा लकी असलो तर भुरभुरणारा पाऊस भेटायचा. आजूबाजूला दाट वनराई असायची. पावसानं न्हाऊन गेलेलं स्टेशनाचं ओलेतं सौंदर्य विशेष खुलून यायचं.

त्यावेळी म्हणजे बहात्तर साली सकाळी दहाच्या सुमारास नागपूरहून सेवाग्राम एक्सप्रेस यायची. आम्ही सगळे जण आवर्जून गाडीतून उत्तरायचो आणि दोन मिनिटांत पावसाचा शिडकावा अंगावर झेलत प्लॅटफॉर्म फिरून यायचो. शिट्टी वाजली की पळत-पळत गाडी पकडायचो. आजही पावसातलं देवळाली स्टेशन हे पर्यटन स्थळ ठरावं.

प्रत्येक गावाला स्वतःचा चेहरा असतोच असे नाही. उलट बहुतेक गावांना तो नसतो आणि स्टेशनांना तर तो नसतोच नसतो. ट्रेनमधून डोकं बाहेर काढून पाहिलं तरी भुसावळ आलं की इटारसी ते नीट कळत नाही. मुंबईच्या लोकल स्टेशनच्या पाट्या काढून टाका, कल्याण-दादरसारखी थ्रू स्टेशन सोडली तर सगळी स्टेशनं एकसारखी दिसतील. गेल्या काही वर्षांत मोठ्या स्टेशनांचा चेहरा-मोहरा बदलू लागला आहे. ती झगमगू लागली आहेत.

जाहिरातींनी व्यापली आहेत. त्यांचा एअरपोर्ट होऊ लागला आहे, पण या बदलातही आता तोचतोचपणा दिसू लागला आहे. देवळालीचे स्टेशन मात्र याला अपवाद ठरावं. सौंदर्यदृष्टी असलेल्या ब्रिटिशांनी या स्टेशनची उभारणी केली हे ऐतिहासिक सत्य आहे.

या स्टेशनकडे एक नजर जरी टाकली तरी त्याचे पितृत्व कोणाकडे याचा अंदाज येतो. अर्थात आता ते सोनेरी जुनेपण बरंचसं लयाला जाऊ लागलंय हे मात्र कटू सत्य आहे. तरीही आज ते जसे आहे त्यातूनही त्याचं ठळक वैशिष्ट्य दिसतं. ते कसं हटके होतं हे आधी सांगतो.

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी आमची पिढी इंग्लिश चित्रपट पाहायची दोन गोष्टींसाठी! एक म्हणजे त्यांच्या सिनेमातली ती नरम-गरम, रोमँटिक दृश्य पाहणे हे आमच्यासाठी पहिले आकर्षण असायचे. खरं सांगतो, ताकाला जायचं आणि भांड कशाला लपवायचं? दुसरे म्हणजे त्यातल्या त्या हाणामार्‍या पाहायला आम्हाला फार आवडायचं.

त्या फाटलेल्या जीन्स, ते जॅकेटस, त्या फेल्ट हॅट्स, छोटी पिस्तुले आणि या हाणामार्‍या व्हायच्या कुठे तर डाउनटाऊन किंवा कंट्रीसाइड स्टेशनवर! ती काऊबॉय स्टेशन्स कशी असायची तसं होतं देवळाली स्टेशन ऐंशी सालापूर्वी! होतं छोटंच.. गिनके दोन प्लॅटफॉर्म, तिसरा अडी-अडचणीला... मला आठवतंय, स्टेशनची फ्रेमही लाकडी होती.

डिझायनिंग पक्कं आंग्ल, उंच आणि निमुळते छप्पर, त्यावर कौलं, छप्पर प्लॅटफॉर्मवर इतकं खाली यायचं की वाटायचं कपाळमोक्ष होईल. भिंती पण दगडाच्या होत्या .त्यावेळी बांधलेला फ्लाय ओव्हरब्रीज अजून काम करतोय... आता तो मोडकळीला आलाय. पर्यायी पुलाचे कामही सुरू झालंय, पण मला वाटतं हा पूल गत वैभवाची साक्ष आहे. स्टेशनवरच्या रूम्स पण कौलारू असायच्या. रंग बहुतेक पिवळाच असायचा.

रेल्वेचा हा अधिकृत कलर असावा. आता मात्र यातलं काही स्ट्रक्चर बदललं आहे. नवीन जमान्यातल्या उंचच, गर्डर टाकलेल्या रुफ टॉपनी, वाढवलेल्या प्लॅटफॉर्मची जागा घेतली आहे. स्टेशनच्या मुख्य इमारतीचे नूतनीकरण होणार असे बर्‍याचदा बोलले जाते तेंव्हा पोटात गोळा येतो, पण अजून तरी मुख्य ढाचा तसाच आहे. मात्र नवे लांबच लांब वाढलेले प्लॅटफॉर्म बदललेल्या युगाची साक्ष देतात. देवळाली हे मुख्यत्वे आर्मी आणि एअरफोर्सच्या बेससाठी महत्वाचे स्थानक! त्यांनी हे अँटिक स्टेशन राहावे यासाठी प्रयत्न करावा. एरवी काही वर्षात ते पाचोरा किंवा चाळीसगाव होऊन जाईल.

स्टेशन मात्र तेव्हाही स्वच्छ असायचं आणि आजही तसंच स्वच्छ आहे. इतकं की वाकून पाहिलं की, आपला चेहरा दिसेल. सध्या लॉकडाउनमुळे स्टेशनवर चिटपाखरूही नसतं, पण फार पूर्वी, विशेषतः रात्री स्टेशन असंच दिसायचं. आता या स्टेशनवरून खूप गाड्या येतात-जातात. बर्‍याच थांबतातही. मिलिटरी बेस आहे ना... अगदी राजधानीसारखी सुपर ट्रेनही आपला रुबाब दाखवत क्षणार्धात लुप्त होते, पण पूर्वी मात्र खूप कमी गाड्या असायच्या.

त्यातली पंजाब मेल आणि अमृतसर एक्सप्रेस मिलिटरीची मुख्य रक्तवाहिनी! त्यांचा एखादा बडा ऑफिसर बदली झाल्यावर निघाला की, त्याला ‘सी ऑफ’ करायला पूर्ण मिलिटरी बेस हजर असायचा. जेव्हा स्वागत व्हायचं तेव्हा रेड कार्पेट अंथरलं जायचं. आता ही मोठी माणसं नाशिक किंवा मुंबईहून विमानाने वा हेलिकॉप्टरने जात असावीत. जेव्हा पूर्ण युनिट बदली होऊन निघतं तेंव्हा त्यांची स्पेशल ट्रेन असते.

खरं तर देवळाली स्टेशनची खुमारी मिलिटरीमुळेच आहे. नंतर आली पंचवटी! नाशिककर प्रवाशांची जान...! अशा गाड्या आल्या की स्टेशन गजबजायचं. गाडी गेली की एकदम सुमसाम व्हायच. ही नीरव शांतता, साम्य असलेल्या इंग्लंडमधल्या डाउनटाऊन स्टेशनवर मी मुद्दाम जाऊन अनुभवली. त्यामुळेच देवळाली स्टेशन मला विम्बल्डनची पूर्वेकडील मावस बहीण वाटायचं.

जुलै-ऑगस्टमध्ये, पावसाळ्यात स्टेशनवर, नुकताच पाऊस पडून गेल्यावर हवीहवीशी वाटणारी कुंद हवा असायची किंवा लकी असलो तर भुरभुरणारा पाऊस भेटायचा. आजूबाजूला दाट वनराई असायची. पावसानं न्हाऊन गेलेलं स्टेशनाचं ओलेतं सौंदर्य विशेष खुलून यायचं. त्यावेळी म्हणजे बहात्तर साली सकाळी दहाच्या सुमारास नागपूरहून सेवाग्राम एक्सप्रेस यायची. आम्ही सगळे जण आवर्जून गाडीतून उत्तरायचो आणि दोन मिनिटांत पावसाचा शिडकावा अंगावर झेलत प्लॅटफॉर्म फिरून यायचो.

शिट्टी वाजली की पळत-पळत गाडी पकडायचो. आजही पावसातलं देवळाली स्टेशन हे पर्यटन स्थळ ठरावं. या स्टेशनवर फेरफटका मारण्यासाठी सर्व वयोगटाची माणसं यायची. काही महिन्यांपूर्वी अशा जॉगिंग किंवा स्ट्रोलिंग करणार्‍या लोकांविरुद्ध रेल्वेने कडक कारवाई केल्याने भटकंती करणार्‍यांची संख्या आटली होती, पण फुफुसांत पुरेपूर ऑक्सिजन भरून घेण्यासाठी देवळाली स्टेशन एक सुरेख पर्याय होता व आहे.

या स्टेशनवरच नारायण शेट्टींचं कॅन्टीन सार्‍या पंचक्रोशीत फेमस होतं. इथला वडापाव आणि रस्सा बर्‍याच जणांना अमृत वाटायचा. त्यासाठी ते मुद्दाम गावातून यायचे. हे अण्णाही खूप लोकप्रिय होते. एखाद्याने पत्ता विचारला तर त्याला रिक्षातून गावात पोचवायचे. पैशांपेक्षा माणसं जपणारा हा माणूस स्टेशनवरचा सर्वात लोकप्रिय माणूस होता. या माणसाने आपल्याच कँटीनसमोर, पंजाब मेलसमोर उभे राहून आत्महत्या केली तेव्हा इंजिन ड्रायव्हरने हंबरडा फोडला होता.

देवळालीच्या या स्टेशनाने फिल्म इंडस्ट्रीला भुरळ घातली नसती तर ते नवल ठरले असते. फार पूर्वीचा विजय आनंद उर्फ गोल्डीचा जया भादुरीबरोबरचा एक नितांत सुंदर चित्रपट ‘कोरा कागज’ खूप गाजला होता. त्यातला तो क्लायमॅक्स सीन ज्यात हे दोघे परत एकत्र येतात त्या सीनचे शूटिंग फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये झाले होते. त्याचे बरेचसे शूटिंग देवळालीत इतरत्रही झाले होते. ‘तेरे नाम’ हा सलमान खानचा सिनेमा इथे स्टेशनवरच शूट झाला होता.

भूमिका चावला ही देवळालीची असल्याने लोकांनी या शूटिंगसाठी तोबा गर्दी केली होती. रेल्वे यार्डात सल्लूची ट्रेन बरेच दिवस थांबली होती. प्रत्येकाच्या तोंडी ‘तेरे नाम’के सलमान का नाम था.2004 च्या ‘दिवार’चे ज्यात अमिताभजी, अक्षय खन्ना, संजय दत्त होते; त्याचे बरेच शूटिंग या स्टेशनवर झाले आहे. त्यात ते पाकिस्तानचं स्टेशन बनलं होतं म्हणतात. स्टेशनच्या रिक्षाही हिरव्या झाल्या होत्या. फार पूर्वी राजकपूर सायकलवरून स्टेशनला येतानाचे शूटिंग झाल्याचे बुजुर्ग मंडळी सांगतात, पण पुरावा नाही.

सध्याचं स्टेशन सुशोभीकरणामुळे आणखी फुललं आहे. रोटरी आणि इनर व्हील क्लबने बगीचे बनवले आहेत. सौंदर्यदृष्टी असलेल्या स्टाफने, गुप्ताजी किंवा योगेश सुडकेनी जागोजागी फुलांच्या कुंड्या ठेवून ते गार्डन स्टेशन बनवले आहे. हा नजारा पाहण्यासारखा आहे. मात्र देवळाली स्टेशनची ओळख असणारं बिग बेनसारखं मोठं घड्याळ सध्या मिसिंग आहे.

वीस वर्षे स्टेशन मास्तर असलेले आणि सोमाणी गार्डनमध्ये टॉय ट्रेन चालवणारे छुगानी साहेबांच्या म्हणण्यानुसार ते घड्याळ तीन-चार वर्षांपर्यंत तरी होतं. आता ते बंद पडलं असावं आणि बहुतेक दुरुस्त होतं नसावं.

पूर्वी रेल्वेचा एक बडा ऑफिसर व्हिझिटला आला तेंव्हा त्याने ते मुख्य ऑफिसात ठेवायला मागितले होते, पण ‘हेरिटेज स्टेशन’ म्हणून स्टाफने त्यांना चक्क नकार दिला. राहून-राहून एकच भीती वाटते; कधीतरी नूतनीकरणाच्या नावाखाली रेल्वे बोर्डची या खूबसुरत नजार्‍यालाच नजर लागेल आणि त्याला हे सुंदर, सजलेलं, निरागस देवळाली स्टेशन बळी पडेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com