Marathi Sahitya Parishad
Marathi Sahitya Parishad|उपक्रमशील मराठी साहित्य परिषद : रवींद्र मालुंजकर
फीचर्स

उपक्रमशील मराठी साहित्य परिषद : रवींद्र मालुंजकर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

- रवींद्र मालुंजकर

(लेखक मसाप नाशिकरोड शाखेचे कार्यवाह आहेत)

साहित्य चळवळीची समृद्ध परंपरा नाशिकरोड परिसराला लाभली आहे. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या या भूमीने आजही ही परंपरा जपली आहे. मध्यंतरीच्या काळात जुन्या व नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले नाही. त्यांना आपल्या साहित्य सादरीकरणाकरता नाशिक किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणी जावे लागायचे. ही उणीव भरून काढण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेची नाशिकरोड शाखा इमानेइतबारे करत आहे.

साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो. समाजात घडणार्‍या विविध घटनांचे प्रतिबिंब साहित्यात उत्कटपणे उतरत असते. अशी समृद्ध परंपरा नाशिकरोड परिसरालाही लाभली आहे. क्रांतिकारकांचे मेरुमणी भगूरपुत्र स्वा.सावरकर, सामाजिक क्रांतीचे अग्रणी विहितगावचे बाबूराव बागुल, ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत वर्तक, वा. श्री. पुरोहित, नीळकंठ नांदूरकर, संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांच्या या भूमीने आजही ही परंपरा जपली आहे.

मात्र मध्यंतरीच्या काळात जुन्यांसह नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले नाही. त्यांना आपल्या साहित्याच्या सादरीकरणाकरता नाशिक किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणी जावे लागायचे. नाही म्हणायला थोडेफार कार्यक्रम नाशिकरोडसह परिसरामध्ये व्हायचे; परंतु त्यात सातत्य नव्हते.

ही उणीव भरून काढण्याचे सर्वतोपरी कार्य 27 एप्रिल 2015 रोजी स्थापन झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेने इमानेइतबारे केले. मराठी सारस्वतांचा आणि रसिकांचा सर्वात मोठा कुंभमेळा म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! शाखेच्या स्थापनेपूर्वी पंजाबमध्ये संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी शाखेच्या वतीने 35 रसिकांची नोंदणी केली आणि तेथून सुरू झाला या शाखेचा ध्येयवादी प्रवास! आज शाखेची सदस्य संख्या चारशेपेक्षा अधिक आहे.

विशेष म्हणजे महिलांच्या माध्यमातून परिसराला साहित्यिक दृष्टिकोन देण्यासाठी शाखेच्या कार्यात महिलांचा 50 टक्के सहभाग असतोच. प्रत्येक महिन्याला एक पुष्प गुंफणार्‍या ‘संवाद सृजनाशी’ या मालेत साहित्य निर्मितीतील लेखक, प्रकाशक, मुद्रक आणि वितरक यांच्या एकूण साहित्य प्रवासाबद्दल मुक्त संवाद साधला जातो. त्यातून सभासद-रसिकांना आपली जडणघडण कशी झाली याची माहिती साहित्यिकांकडून मिळते. ‘रंग अक्षरांचे’ या उपक्रमाअंतर्गत दर तीन महिन्यांतून एक असे प्रत्येकी तीन कवींचे काव्यवाचन घेतले जाते.

विशेष म्हणजे घुमानच्या साहित्य संमेलनापासून शाखेने सुरू केलेल्या ‘साहित्य संमेलन : एक अनुभव’ या उपक्रमातून संमेलनात सहभागी झालेल्या रसिकांच्या अनुभवांचे सादरीकरण करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातून आपली साहित्य संमेलनाबद्दलची आठवण सहभागी झालेले रसिक सादर करतात. त्यातूनही साहित्यविषयक जाणिवा समृद्ध होतात.

शाखेचा आगळावेगळा उपक्रम म्हणजे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी साजर्‍या होणार्‍या ‘वाचन प्रेरणादिन’ कार्यक्रमात शाखेच्या वतीने दरवर्षी परिसरातील 60 शाळांमधील दहावी परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते.

सर्व शाळांमधून सर्वात जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचाही सत्कार केला जातो. हा सत्कार करताना आणि प्रत्येक कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ग्रंथ भेट दिली जाते. त्यातून समृद्ध वाचक घडवले जातात. यामुळे परिसरातून उद्याचे साहित्यिक घडतील, असा हेतू शाखेचा आहे.

नाशिकरोडच्या वैचारिक जाणिवेत भर टाकणार्‍या वसंत व्याख्यानमालेत व्यापारी बँकेबरोबर सहआयोजक म्हणून शाखेने गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय सहभाग घेतला आहे. या व्याख्यानमालेतील एक उपक्रम म्हणजे ‘रंग अक्षरांचे’! यात निमंत्रित कवींमध्ये शाखेच्या सभासद कवींनाही काव्यवाचन करण्याची संधी मिळते. त्यातून परिसराच्या साहित्य परंपरेला उजागर करण्याचे कार्यही परिसरातील सुजाण रसिकांसमोर केले जात आहे.

नाशिकरोडमध्ये कवी, लेखक तयार व्हावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे त्याचबरोबर भारतीय स्तरावर होणार्‍या साहित्य संमेलनांत निमंत्रित म्हणून त्यांचा सहभाग वाढावा यासाठी शाखेच्या माध्यमातून दरवर्षी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर साहित्य संमेलनांत गाजलेल्या ‘कवी कट्टा’ या उपक्रमात दरवर्षी शाखेच्या दहा सभासद कवींना कविता सादर करण्याचा सन्मान मिळतो.

शाखेच्या विविधांगी उपक्रमांचा महाराष्ट्र साहित्य परिषद या मातृ संस्थेने गेल्याच वर्षी गौरव केला आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे पुरस्कृत मसापचा पहिला ‘बाबूराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण मसाप शाखा पुरस्कार’ शाखेला मिळाला आहे. हा पुरस्कार शाखेच्या महिला सभासदांनी स्वीकारल्याने कार्यक्रमात त्यांचे विशेष कौतुक झाले. घुमानच्या साहित्य संमेलनानंतर झालेल्या साहित्य संमेलनांचे नियोजित अध्यक्ष घोषित झाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार नाशिककरांच्या वतीने करण्याचा मान शाखेने मिळवला आहे.

नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, साहित्य व सांस्कृतिक कार्य करणार्‍या अन्य संस्थांना सोबत घेऊन हा नागरी सत्कार नाशिकरोड परिसरातच घेऊन एक नवा पायंडा शाखेने पाडला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यपाल महोदयांपर्यंत शाखेचे शिष्टमंडळ गेले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सर्व माध्यमांच्या आणि भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याच्या अधिनियमासंदर्भात शाखेने मविप्र संस्थेबरोबर चर्चासत्राचे आयोजन केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद-शाखा नाशिकरोडच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात सुरू करण्यात आलेला ‘व्हर्च्युअल ग्रंथालय’ हा उपक्रम अतिशय अनोखा आहे. वाचकांना दर्जेदार आणि समृद्ध ग्रंथांकडे नेण्यासाठी उपयुक्त असा उपक्रम आहे. या उपक्रमातून आजपर्यंत शंभरपेक्षा अधिक ग्रंथ आणि लघुकथा मसाप शाखेच्या सभासदांबरोबरच अन्य वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. जुन्या आणि मौलिक ग्रंथांसह नव्याने प्रकाशित झालेल्या अनेक ग्रंथांमुळे वाचकांना चौफेर ज्ञान मिळत आहे. यातून वाचनसंस्कृती निश्चितच विकसित होईल, असा विश्वास आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 117 वर्षांच्या इतिहासात एखाद्या शाखेने अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवावा ही मसापच्या देदीप्यमान वाटचालीतील निश्चितच भूषणावह बाब आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद आणि शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी आणि शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य हे प्रत्येक उपक्रम यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

शाखेच्या प्रत्येक कार्यक्रमातील निवेदनापासून तर आभार आणि पसायदान सादर करण्यापर्यंत वेगवेगळ्या सभासदांना काम देऊन त्यांच्यात सभा धीटपणा निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. मराठी भाषा आणि साहित्य टिकवून ठेवून नाशिकरोडला साहित्यिक चेहरा देण्यासाठी नाशिकरोड मसाप शाखेचे विविधांगी उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना रसिक म्हणून उपस्थित राहण्याची आणि सढळ हस्ते मदत करण्याची नितांत गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com