कोरोना विषाणू नव्या लक्षणांसह उत्परिवर्तन (म्युटेशन) होत आहे ?
फीचर्स

कोरोना विषाणू नव्या लक्षणांसह उत्परिवर्तन (म्युटेशन) होत आहे ?

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शिंक, खोकला, कफ आणि बोलण्याच्या माध्यमातून पसरू शकतो व हा विषाणू हवेतून पसरत नाही, असा दावा मार्च 2020 पासून जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) करीत होती. परंतु, नुकतेच 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांच्या संशोधनातून अशी भीती व्यक्त झाली आहे की, कोरोना विषाणूचे छोटेछोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होत आहे. शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओस याबाबत सर्व पुरावेही दिलेत व यास न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापलेल्या एका रिपोर्टमधून दुजोरा मिळाला आहे.

जगात कोरोना विषाणूचा प्रकोप दिवसागणिक वाढतच चालला आहे. वैश्विकस्तरावर आतापर्यंत 1 कोटी 20 लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून 5 लाख 50 हजार कोविड-19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 5 हजाराच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 19 हजार 800 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. जागतिक कोरोना संक्रमणाच्या यादीत भारत तिसर्‍या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.

अशातच हवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या दाव्यामुळे चिंता वाढली आहे.आतापर्यंत ताप, श्वास घेण्यात अडचण, कोरडा खोकला आणि थकवा यासारखे शारीरिक बदल कोरोना विषाणूची लक्षणे मानली जात होती. परंतु, आता त्याची नवीन लक्षणेही समोर येत आहेत. कोरोना संसर्गावर काम करणार्‍या अमेरिकन सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (सीडीसी) अँड प्रिव्हेन्शन या वैद्यकीय संस्थेने कोरोना विषाणूच्या संभाव्य नव्या लक्षणांची माहिती दिली आहे. जर एखाद्या व्यक्तीचे नाक सतत वाहत असेल आणि त्याला आतून अस्वस्थता जाणवून वारंवार असामान्य वाटत असेल, अशा व्यक्तीने ताप नसला तरीही कोरोनाची तपासणी करायला हवी. त्यातही जर उलटी किंवा मळमळ होत असेल व सोबतच अतिसारासारखी किंवा तत्सम लक्षणे दिसून येत असतील तर त्यानं तातडीनं चाचणी करून घेण्याची गरज आहे. .

सार्स-कोविड 2 हा कोरोनाचा विषाणू वातावरण बदलानुसार स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणेसाठी उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवून जणुकांत व पर्यायाने संरचनेत बदल करीत आहेत का, याकडे वैज्ञानिक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत. लसनिर्मितीत आणि औषधनिर्मितीत त्याने फरक पडेल काय, हा प्रश्न त्यांना कायम सतावीत आहे. जेव्हा कोरोना विषाणू मानव किंवा इतर प्राण्यांचा पेशींत प्रवेश मिळवून स्वतःचे पुनरुत्पादन करतो, तेव्हा तो आपल्या ‘आरएनए डिपेंडण्ड आरएनए पॉलिमरेज’ नावाचा एन्झाइम वापरतो. हा एन्झाइम कामात पुरेसा अचूक नसल्याने नव्याने तयार होणार्‍या विषाणूच्या जणुकांत बदल होतो. यालाच जीवशास्त्रात उत्परिवर्तन (म्युटेशन) असे म्हणतात. याचा परिणाम विषाणूच्या संरचनेत होऊन संसर्ग झालेल्या व्यक्तीत नव्या लक्षणांची भर पडते व त्यामुळे औषध उपाययोजनेत अडचणी येतात.

काही विषाणूंच्या बाबतीत अशी उत्परिवर्तने त्या विषाणूला मानवी पेशींमध्ये जगायला अक्षम बनवून आणि त्यांचा नायनाट होऊ शकतो, तर काही विषाणू उत्परिवर्तन झाल्याने अधिक घातक (व्हायरुलंट) बनतात. दक्षिण आशिया खंडात व नुकतेच खान्देशात (प्रामुख्याने धुळे व जळगाव जिल्ह्यात) कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ व जास्तीचा मृत्यूदर हे उत्परिवर्तीत कोरोना विषाणूच्या व्हायरुलंट स्ट्रेनमुळे होत आहे का, यासंदर्भात पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूमुळे दगावण्याचा धोका कमी झाला आहे, असे मृत्यूदरावरून लक्षात येते. अजूनही कोविड-19 च्या रुग्णांसाठी सुरक्षित, कार्यक्षम व कमी किमतीची लस उपलब्ध नसल्याने संसर्ग कमी व्हावा, यासाठी संयशिस्त व प्राशसकीय नियमांचे पालन करणे अगत्याचे ठरते.

(लेखक हे चोपडा महाविद्यालयात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक तथा विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Deshdoot
www.deshdoot.com