Sindhi Panchayat
Sindhi Panchayat|विकासाभिमुख सिंधी पंचायत
फीचर्स

विकासाभिमुख सिंधी पंचायत : रतन चावला

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

देवळाली कॅम्प येथे सिंधी समाज बांधवांनी एकत्रित येऊन सन 1949 मध्ये पूज्य सिंधी पंचायत सामाजिक संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या विविध अध्यक्षांनी आपापल्या कारकिर्दीत संस्थेला समाजाभिमुख बनवण्यावर भर दिला. समाजातील लोकांना एकत्र केले. समाजबांधवांना एकत्र करून ‘वसुधैव कुटुंबकम’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन संस्था कार्य करीत आहे. पारंपरिक कार्यासोबतच सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण करणारी ही संस्था भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

सन 1947 भारत-पाक विभाजनानंतर सिंध प्रांतातून सिंधी समाज स्थलांतरित होऊन देवळाली साऊथ या ठिकाणी अस्थायिक होते. विभाजनाच्या परिस्थितीत भारत सरकारकडून सिंधी समाजासाठी भारतात कोणत्याही प्रांतात रहिवास व व्यवसाय करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीचा पास देण्यात आला. त्याप्रमाणे आपल्या आवडी व सोयीनुसार सिंधी समाजबांधव भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत व शहरांत स्थायिक झाले.

सन 1949 मध्ये देवळाली कॅम्प येथे सिंधी समाज बांधवांनी एकत्रित येऊन पूज्य सिंधी पंचायत सामाजिक संस्थेची स्थापना केली. संस्थेचे प्रथम अध्यक्ष म्हणून 1949 ते 1950 या कालखंडात समाजाची बांधणी करण्याचे कार्य झामनदास के. कुकरेजा यांनी केले. त्यांनी समाज एकत्रीकरण आणि समाजाच्या स्थैर्यासाठी विशेष मेहनत घेतली.

पाकिस्तानातील निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी समाजाला त्याकाळी फक्त सिंधी भाषा अवगत होती. त्यानंतर या समाजाने मराठी, हिंदी व स्थानिक प्रचलित भाषांचा अंगिकार केला. ज्ञान संपादन करून समाज संघटनेचे आवश्यक कार्य हाती घेण्यात आले.

उद्देश एवढाच होता की, सर्व समाजातील लोकांना एकत्रित करणे, पाकिस्तानातील सोडून आलेल्या संपत्तीचे दावे दाखल करुन त्या संदर्भात न्यायप्राप्तीचे तंत्र समाजाकडून अवलंबले गेले. या कार्यात समाजातील कितीतरी समाज बांधवांनी हातभार लावला. शेकडो दानशूर लोकांनी एकत्रित येऊन समाजातील अडीअडचणी सोडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

पूज्य सिंधी पंचायत देवळाली या संस्थेच्या अध्यक्षांची विस्तृत परंपरा राहिली आहे. ती खालीलप्रमाणे:

1) भगवानदास नरसिंघानी 2) परशराम चावला 3) कवरराम नेहलानी 4) सेवाराम कटारिया 5) मोहनदास झुंबरानी 6) टिकमदास कटारिया 7) कृपालदास कुकरेजा 8) नारायणदास चावला 9) वासुदेव श्रॉफ 10) शीतलदास बालानी 11) उद्धवदास बोधानी 12) रतन चावला.

वरील सर्व अध्यक्षांनी संस्थेचे सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचे वहन करीत या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केले. संस्थेची वास्तू तयार करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. आज सिंधी समाजातील या संस्थेद्वारा विविध क्षेत्रांत कार्यरत सिंधी बांधवांना एकत्रित केले जाते. दहावी, बारावी, पदवी, पदवीत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी व उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा परिचय जिल्हास्तरापर्यंत करून देण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.

छोट्या समजल्या जाणार्‍या या समाजातील कितीतरी समाजसेवक इंजिनियर, डॉक्टर, विधिज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट व विविध क्षेत्रातील समाज बांधवांचा परिचय व प्रसिद्धी करून त्यांना समाजापर्यंत व समाजाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्था करीत आहे.

नावलौकिक व्यक्तींकडून समाजातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी ही संस्था यथायोग्य सहकार्य करते. हे सर्व करताना समाजातील कितीतरी सन्माननीय बांधवांचा हातभार लागला आहे. समाजातील शेकडो दानशूरांनी या संस्थेस योगदान दिले आहे.

समाजातील सर्व परंपरांचे पालन व सामाजिक सामूहिक कार्यक्रम व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पूज्य सिंधी पंचायत या संस्थेने बहुमोल सहकार्य केले आहे. समाजाची आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण देण्याचे कार्य, मुलींना शिक्षण देण्याचे कार्य, गरीब मुलींचे विवाह करण्याचे कार्य व अन्य समाजासाठी येणार्‍या अडचणींमध्ये ही संस्था अग्रभागी असते.

आज मितीस ही संस्था आपल्या उद्दिष्टाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. पूर्वजांचा इतिहास आम्हाला धडपड करण्यासाठी प्रेरणा देत आहे, असे या संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव म्हणतात. सर्व समाजबांधवांना एकत्रित करून ‘वसुधैव कुटुंबकम’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन संस्था तत्परतेने कार्य करीत आहे. पारंपरिक कार्य आणि सामाजिक कार्याचा आदर्श पुढे ठेवणारी ही संस्था भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com