सौंदर्याची मिथके मोडून काढा!

सौंदर्याची मिथके मोडून काढा!

दक्षिण कोरियातील शेकडो तरुणींनी सौंदर्याचे हे खोटे आवरण फेकून दिले आहे. त्यांनी आपल्याकडील सौंदर्य प्रसाधने नष्ट करायला सुरुवात केली आहे आणि मेकअपशिवाय कामावर जात आहेत. सौंदर्याची मिथके स्त्रियांना स्वतःच अशा प्रकारे तोडून-मोडून फेकून द्यावी लागतील. आपण जसे आहोत, तसेच खूप चांगले आहोत; सर्वश्रेष्ठ आहोत असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे.

यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले, त्यावर अनेकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक म्हणाले, की विल स्मिथने ख्रिस रॅकला थप्पड मारणे हिंसक होते. काही प्रमाणात हे खरे आहे आणि याच कारणास्तव विल स्मिथला पुढील दहा वर्षांसाठी कोणत्याही ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे, लोक असाही प्रश्न उपस्थित करत आहेत की, विलची पत्नी जाडा पिकेटच्या केसांची खिल्ली उडवणे आणि नंतर तिथे उपस्थित लोकांनी हसणे हा मानसिक छळ नव्हता का?

या हसण्यानंतर जाडाच्या चेहर्‍यावरील हावभाव हा चर्चेचा विषय का बनला नाही? त्यावेळी जाडाच्या चेहर्‍यावर उमटलेल्या वेदनेच्या रेषा कुणाला का दिसल्या नाहीत? जाडाची चेष्टा हा फक्त ख्रिसचा विनोद नव्हता. जर एखादी स्त्री एखाद्याच्या सौंदर्याच्या निकषात बसत नसेल, तर ती व्यंग करण्याची वस्तू बनते का? कोणत्याही स्त्रीच्या कोणत्याही शारीरिक दोषाची खिल्ली उडवली जाते तेव्हा समाज त्या व्यंगावर हसतो. त्यावेळी स्त्री ही सौंदर्याची मूर्ती बनण्यासाठीच जन्माला आलेली आहे, यावरच समाज शिक्कामोर्तबच करत नाही का?

ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळ्यात घडलेल्या या घटनेने जगभरातील मुलींना जाणीवपूर्वक किंवा नकळत एक संदेश दिला आहे तो असा, की जर त्या सौंदर्याच्या तथाकथित सामाजिक निकषांनुसार नसतील तर त्याही जाडासारख्याच थट्टेचा विषय बनू शकतात.

हे दडपण खूप भीतीदायक आहे; पण या मानसिकतेला आवर घालताना कुणी दिसत नाही. कारण शतकानुशतके स्त्रीला केवळ एक शरीर म्हणूनच अधिक स्वीकारले गेले आहे. शरीराबाबतच्या या दबावामुळे महिलांच्या आत्मविश्वासाला तडा जात आहे. द रिअल ट्रुथ अबाउट ब्यूटी ः रिव्हिजिटेड या अलीकडील संशोधनाच्या अहवालात असे दिसून आले आहे की, जगातील 72 टक्के मुलींना सुंदर होण्याचा प्रचंड ताण जाणवतो आणि हे नैसर्गिकच आहे. कारण एखादी व्यक्ती सामाजिक नापसंती स्वीकारू शकत नाही. म्हणूनच व्यक्ती सतत आपले कौतुक होईल, असा प्रयत्न करते. पितृसत्ताक व्यवस्थेत स्त्री कितीही प्रतिभावान आणि सद्गुणी असली तरी तिच्या शारीरिक स्वरूपाचेच मोजमाप आधी केले जाते, ही वस्तुस्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही.

या वास्तवाची ओळख मुलींना त्यांच्या लहानपणापासूनच होऊ लागते, कारण त्यांची उंची आणि रंगरूप हा चर्चेचा किंवा चिंतेचा विषय बनतो. सौंदर्याच्या या संकल्पना मुलींच्या मनावर इतक्या खोलवर बिंबवल्या जातात की, जीवनातील इतर महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करणे हे त्यांच्यासाठी तितकेसे महत्त्वाचे राहतच नाही. या सौंदर्याच्या प्रतिमा निर्माण करण्यात केवळ कुटुंबाचीच भूमिका असते की त्यासाठी काही आणखी घटक जबाबदार असतात? नाओमी वुल्फने तिच्या द ब्युटी मिथः हाऊ इमेजेस ऑफ ब्यूटी आर यूज्ड अगेन्स्ट विमेन या पुस्तकात सौंदर्याच्या अर्थशास्त्राकडे लक्ष वेधले आहे. जगभरात या अर्थशास्त्राचे जाळे विस्तारत चालले आहे. नाओमीने ग्लॅमर, सौंदर्य आणि सुडौल देहयष्टीच्या निर्मितीचे जे अर्थकारण तयार झाले आहे, त्याचा संदर्भ देऊन त्यातील आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांवर हल्ला चढविला आहे. हे हितसंबंधच महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास कारणीभूत ठरतात.

औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा स्त्रियांनी भौतिक जगात हस्तक्षेप केला आणि स्वावलंबनाचा मार्ग निवडला, तेव्हा सौंदर्याची मिथहे आधुनिक स्वरूपात दृढ झाली. सौंदर्याचे निकष निश्चित करणे हा स्त्रियांचा आत्मविश्वास कमी करण्याचा सर्वांत सोपा मार्ग होता. या प्रयत्नांतर्गत मासिकांच्या कव्हरपेजवर दिसणार्‍या उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेल्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी सामान्य महिलांना त्यांच्यासारखे बनण्यासाठी प्रोत्साहित केले आणि या मोहिमेला मदत केली. परिणामी, जगातील महिलांना त्यांच्या शारीरिक सौंदर्याची चिंता वाटू लागली. इटालियन चित्रपट निर्मात्या अलिना रासिनी यांनी सात वर्षे आठ देशांचा प्रवास केला आणि त्यांच्या द इल्युजनिस्ट या माहितीपटात सौंदर्याच्या बाजारपेठेतील गुंतागुंत आणि त्यामधील महिलांचे आत्मभान यांचे विश्लेषण केले. रासिनी यांना असे आढळून आले की, स्त्रियांच्या शरीरविषयक चिंतेचा एक प्रकारचा असंतोष महामारीसारखा जगभर पसरत आहे. जपानमध्ये 20 वर्षांच्या 30 टक्के मुलींचे वजन कमी असल्याचे आढळून आले तर भारतात गेल्या दशकतात एनोरेक्सिया नोव्हारेसा (वजन वाढण्याच्या भीतीने उपाशी राहण्याची प्रवृत्ती) या आजाराने ग्रस्त महिलांची संख्या पाच ते दहापटींनी वाढली आहे. त्याचबरोबर स्वतःला सुंदर बनविण्यासाठी महिलांमध्ये प्लास्टिक सर्जरीचीही क्रेझही सातत्याने वाढत आहे.

कोरोना महामारीच्या काळात लेबनॉनमध्ये आर्थिक संकट गंभीर झालेले असतानाही प्लास्टिक सर्जरी करणार्‍यांच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नव्हता. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जरीच्या अहवालात असे म्हटले आहे की, दक्षिण कोरियात जगातील दरडोई प्लास्टिक सर्जनचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे पाहून असा प्रश्न निर्माण होतो की, भविष्यात सौंदर्याचाच दर्जा वाढतच जाणार की काय? आणि स्त्रिया कधी उपाशी राहून तर कधी प्लास्टिक सर्जरी करून स्वतःचे हाल करून घेत राहणार का? सौंदर्याची ही मिथके कधी संपुष्टात येणार?

आनंदाची बातमी अशी की, दक्षिण कोरियातील शेकडो तरुणींनी सौंदर्याचे हे खोटे आवरण फेकून दिले आहे. त्यांनी आपल्याकडील सौंदर्य प्रसाधने नष्ट करायला सुरुवात केली आहे आणि मेकअपशिवाय कामावर जात आहेत. सौंदर्याची मिथके स्त्रियांना स्वतःच अशा प्रकारे तोडून-मोडून फेकून द्यावी लागतील. आपण जसे आहोत, तसेच खूप चांगले आहोत; सर्वश्रेष्ठ आहोत असा आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. ज्या दिवशी स्त्रिया हे करतील, तेव्हा सौंदर्याची सर्व मिथके उद्ध्वस्त होण्यास सुरुवात होईल.

Related Stories

No stories found.