अस्वस्थ करणारे दोन राजकीय बळी

अस्वस्थ करणारे दोन राजकीय बळी

भारताचे परममित्र आणि पाठीराखे असलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुसरीकडे गेल्या महिन्यात राजकीय जीवदान मिळालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना मात्र सेक्स स्कँडलमुळे राजीनामा द्यावा लागला. दोन्ही नेत्यांचे भारताशी राजकीय संबंध चांगले होते. यापुढील काळात परराष्ट्रसंबंधात सातत्य राखत त्या- त्या देशांबरोबर नव्याने संबंध जोपासावे लागणार आहेत.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. सर्वात सुरक्षित देशाचे पंतप्रधान राहिलेल्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या होते, यावरून जागतिक स्तरावर हिंसा करणार्‍या शक्ती किती प्रबळ आहेत, याचा अंदाज येतो. शिंजो आबे एका जाहीर सभेला संबोधित करत असताना गोळ्या झाडण्यात आल्या. आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याने आणि त्यांच्या सुरक्षेबाबत फारशी दक्षता नसल्याने मारेकरी आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाल्याचे दिसते.

वस्तूत: जपान हा सर्वात सुरक्षित आणि शांतताप्रिय देश मानला जातो. मारामारी आणि तणावाच्या वातावरणातही इथल्या नागरिकांमध्ये एक विशेष प्रकारची सहनशक्ती दिसून येते. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून विकसित होऊनही इथले लोक अत्यंत साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. अशा प्रकारचे जीवन इथल्या संस्कृतीशी निगडीत आहे. या देशात बंदुका बाळगण्याबाबत कायदा अतिशय कडक आहे. आबे यांची हत्या हाताने बनवलेल्या बंदुकीने करण्यात आली आहे. जपानमध्ये बंदुकीचा परवाना सहजासहजी मिळत नाही. तरीही हे सारे घडले. यावरून बदलत्या जाणिवांची नव्याने प्रचिती येते.

असाच एक बळी अलीकडेच ब्रिटेनमध्येही गेला. इथले पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना स्वपक्षियांनीच विविध आरोप केल्याने पायउतार व्हावे लागले. ही घटनाही अवघ्या जगाला हादरवून गेली.

आधी जपानमधल्या दुर्दैवी घडामोडींचा मागोवा घेऊ. जपानच्या कायद्यानुसार हाताने तयार केलेली बंदूक बाळगणे बेकायदेशीर आहे. जपानमध्ये फक्त एअर रायफल आणि शॉटगन विकण्याची परवानगी आहे. त्यांचा परवाना मिळवण्यासाठीही लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते आणि परवाना मिळाल्यानंतरही दर तीन वर्षांनी ही परीक्षा द्यावी लागते. शूटिंग रेंजमध्ये 95 टक्के अचूकतेसह शूटिंग चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींबरोबरच परवाना घेणार्‍या व्यक्तीची मानसिक स्थिती, ड्रग्ज टेस्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जाते. पोलीस पडताळणी दरवर्षी केली जाते.

परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. जपानमध्ये खासगी बंदुकांची संख्या फारच कमी आहे. संघटित गुन्ह्यात बंदूक वापरल्याबद्दल 15 वर्षे तुरुंगवास होतो. एकापेक्षा जास्त बंदूक बाळगणेही बेकायदेशीर आहे. सार्वजनिक ठिकाणी बंदूक चालवल्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होते. या पार्श्वभूमीवर शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने जगाला धक्का बसला. जपानमध्ये दर चारशे लोकांमागे एका व्यक्तीला बंदुकीचा परवाना मिळतो. 2018 मध्ये जपानमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील आकडेवारी पाहिली तर गोळीबारात 39,740 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अमेरिकेत तर लोकसंख्येपेक्षा जास्त परवाने वितरीत केले गेले आहेत.

जपानमध्ये यापूर्वी 2007 मध्ये नागासाकीचे महापौर इटो इचो यांची हत्या झाली होती. त्यापूर्वी राष्ट्रीय पोलीस एजन्सीचे तत्कालीन आयुक्त कुनिमात्सू ताकाजी यांना 1995 मध्ये टोकियो इथल्या निवासस्थानासमोर गोळ्या घालून गंभीर जखमी करण्यात आले होते. 1994 मध्ये माजी पंतप्रधान होसोकावा मोरिहिरो यांना टोकियोमधल्या एका हॉटेलमध्ये उजव्या विचारसरणीच्या एका माजी सदस्याने गोळ्या घातल्या होत्या.

अर्थात, त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती. 1992 मध्ये देशाच्या कोचिगी प्रांतात लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे तत्कालीन उपाध्यक्ष कानेमारू शिन यांच्यावर उजव्या विचारसरणीच्या बंदुकधारी व्यक्तीने गोळीबार केला. कानेमारू मात्र या हल्ल्यात जखमी झाले नाहीत. जपानमध्ये रायफलरी क्लब आहेत आणि पोलीसही सशस्त्र आहेत. बहुतेक जपानी लोक बंदूक दूर ठेवतात. 12 कोटी 50 लाख लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये गेल्यावर्षी केवळ दहा गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये एक ठार आणि चार जखमी झाले. या दहा गुन्ह्यांपैकी आठ गुन्हे टोळ्यांशी संबंधित होते. त्याचवर्षी टोकियोमध्ये 61 बंदुका जप्त करण्यात आल्या.

आबे यांच्यावर हल्ला झाला, त्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. त्यामुळे तिथे सुरक्षा राखणे आव्हानात्मक होते. या घटनेमुळे शिंजो आबे यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांना गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. आबे यांच्या हत्येच्या विश्लेषणात दहशतवाद आणि गुन्हेगारीचा कोन सोडला तर देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. आबे यांना जगात होत असलेल्या गुंतागुंतीच्या आणि विविध बदलांचे सखोल ज्ञान होते.

राजकारण, समाज, अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी त्यांच्या ठायी काळाच्या पुढे राहण्याची दृष्टी, त्यासाठी आवश्यक असलेले पर्याय जाणून घेण्याचे ज्ञान होते. परंपरेला न जुमानता स्पष्ट आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वतःच्या देशवासीयांना आणि जगातल्या लोकांना सोबत घेण्याचीही दुर्मिळ क्षमता होती. त्याच्या दूरगामी धोरणांनी (आबेनोमिक्स) जपानी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले आणि नागरिकांमध्ये नवकल्पना आणि उद्योजकतेची भावना पुन्हा प्रज्वलित केली होती.

दरम्यान, इंग्लंडमध्ये गेलेल्या पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या राजकीय बळीनेही जगभरात तरंग उमटवले आहेत. एका सेक्स स्कँडलमुळे ब्रिटीश राजकारण हादरले. यानंतर झालेल्या मंत्र्यांच्या बंडानंतर पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्राला संबोधित करताना जॉन्सन यांनी आपला राजीनामा जाहीर केला आणि हुजूर पक्ष लवकरच नवीन नेता निवडेल, असे म्हटले. सुमारे 40 मंत्री आणि वरिष्ठांच्या राजीनाम्यामुळे असा दबाव निर्माण झाला की, जॉन्सन यांच्याकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

खरे तर जॉन्सन या सेक्स स्कँडलमध्ये थेट सहभागी नव्हते; परंतु कथित लैंगिक गैरवर्तन प्रकरणात गुंतलेल्या आपल्या पक्षाच्या एका खासदाराला वाचवण्याचाच नव्हे तर त्याचा राजकीय दर्जाही वाढवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा निर्णय गंभीर आणि अनैतिक मानला गेला आणि त्यांच्याच पक्षाच्या मंत्री आणि खासदारांव्यतिरिक्त विरोधकांनीही त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी जोरदार दबाव टाकला.

खासदार ख्रिस पिंचर यांची उपमुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती झाल्यापासून या प्रकरणाला सुरुवात झाली. जॉन्सन यांनी पिंचर यांना सरकारी जबाबदारी दिल्याबद्दल माफीही मागितली होती; परंतु मंत्री आणि खासदारांनी ते मान्य केले नाही.

प्रकरण गंभीर बनले तेव्हा जॉन्सन यांनी पिंचर यांना डेप्युटी चीफ व्हिप म्हणून नियुक्त करून आपण मोठी चूक केली होती, हे कबूल केले. लंडनमधल्या एका खासगी क्लबमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाचे खासदार ख्रिस पिंचर यांनी दोन पुरुषांना आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. हे कथित लैंगिक गैरवर्तनाचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले. अलीकडच्या वर्षांमध्ये पिंचर यांच्या कथित लैंगिक गैरवर्तनाची किमान सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना हुजूर पक्षातूनही निलंबित करण्यात आले होते. त्यांनी माफी मागितली असून तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. जॉन्सन यांना पिंचरवरील आरोपांची माहिती असूनही त्यांनी त्यांची नियुक्ती केली. ब्रिटनमध्ये 2024 मध्ये निवडणूक होणार आहे. आता पंतप्रधानपदी येणार्‍या पंतप्रधानांना उणापुरा एक-दीड वर्षांचा कालावधी मिळेल.

मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी हुजूर पक्षाला पराभवाचा धक्का बसला होता. युरोपिय महासंघातून बाहेर पडून ब्रिटनला सुवर्णयुगात नेण्याचे जॉन्सन यांनी दाखवलेले स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाकाळात गर्दी जमवायला विरोध केला होता; परंतु जॉन्सन यांनी एक पार्टी आयोजित करून अनेकांना करोनाचा प्रसाद दिला.

त्यामुळेही त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही त्यांना धारेवर धरले होते. जॉन्सन यांच्या राजीनाम्यामुळे जगाला फारसा फरक पडणार नाही; परंतु आबे यांच्या हत्येमुळे एका पुरोगामी विचाराच्या आणि चीनविरोधी आघाडी मजबूत करणार्‍या नेत्याला जग मुकले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com