'काठी'चे टीमवर्क !

'काठी'चे टीमवर्क !

बऱ्याचशा तथाकथित 'सुशिक्षित' शहरी बाबूंना टीमवर्कसाठी वा टीम लीड करण्यासाठी मेंटॉर, जनरल मॅनेजर, मॅनेजर, सुपर वायझर, साहेबाची गरज भासते. मात्र लौकिक अर्थाने शिक्षित नसलेले, शहरी चकाचौंद पासून कोसो दूर असलेल्या आदिवासी बांधवांची काठीची होळी (ता.अक्कलकुवा, जि. नंदुरबार) टीमवर्कचे आदर्श उदाहरण ठरावे.

-हेमंत अलोने , जळगाव.

ठराविक वेळात दिवस-रात्र एक करून गुजरात मधून होळीचा दांडा आणला जातो, कोणतेही आमंत्रण कोणीच देत नाही, पण हज्जारो आदिवासी बांधव रात्र जागवत सजून धजून काठीत येतात. आपला आपण आनंद लुटतात, आनंद घेतांना दुसऱ्यांना अडथळा होईल, काही आगळीक होईल याची शक्यता शून्य टक्के! येणारा प्रत्येक जण मूठ मूठ माती काढून होळीचा भला मोठ्ठा खड्डा तयार करतात. रात्रभर आनंदाला उधाण येते... पहाटे पूर्वेला तांबडे फुटत असताना लगबग वाढते.... जवळच ठेवलेला होळीचा शंभरेक फुटाचा दांडा खड्ड्यात आणला जातो... मोठी लाकडं, लहान लाकडं, गवताच्या पेंढ्या दांड्याभोवती रचल्या जातात... होळी पेटते, होळीभोवती फेर धरून होळीची राख मस्तकाला लावून आदीवासी बांधव घराकडे परततात. एवढे सारे होते पण लीडर कोणीच नाही, सूचना कोणाच्याच नाहीत.... सारे काही अनामिक ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडते. टीमवर्क वेगळे काय असते?

काठी संस्थान मध्ये सध्या राजाचे वंशज कोणी नाही. सी. के. दादा पाडवी हे प्रजेचे वंशज आहेत. होळीसाठी आलेले आदिवासी बांधव आवर्जून सी. के. दादांच्या घरी भेट देतात. पूर्वी म्हणजे अलीकडच्या काही वर्षातदेखील मान म्हणून पाडवींच्या घरात विडी दिली जायची. आलेले आदिवासी बांधव घरातच विडी शिलगावून धूर सोडत बाहेर पडत. राजाने विडी दिली याचा त्यांना अत्यानंद असायचा. पण आता ही प्रथा बंद झालेली दिसली.

होळी पाहण्यासाठी दूर वरून आलेल्यांसाठी सी. के. दादांच्या घराचे दरवाजे सताड उघडे असतात. काठीतल्या कोणाच्याही घरात रात्रभरासाठी हमखास निवासाची सोय होऊ शकते. काठीची होळी यापूर्वीही चार पाच वेळा अनुभवली आहे पण प्रत्येक वेळी काठीची अनुभूती वेगवेगळीच येते. यावेळी जैन उद्योग समूहाचे मीडिया उपाध्यक्ष सन्मित्र अनिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, ऍग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण आम्ही सारे सहपरिवार होतो त्यामुळे अर्थातच आनंद द्विगुणित झाला होता. आदिवासी बांधवाचे आदिरातिथ्य एकदा अनुभवावेच!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com