मला आठवते, डॉ. वसंतराव पवार यांचे यशवंत मंडईत क्लिनिक होते आणि माझे श्रीजी चेंबर्समध्ये क्लिनिक होते. त्यावेळेपासून आमची मैत्री होती. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळी बोटावर मोजता येतील इतकेच डॉक्टर बहुजन समाजातील होते.

डॉ. वसंत पवार, डॉ. डी. एस आहेर, डॉ. डी. एस. पाटील आणि मी डॉ.शशिकांत गायकवाड अशा काही डॉक्टर मंडळींनी नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रात नव्या दमाने कामाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी डॉ. वसंतराव पवारांकडे पहिली फियाट गाडी होती.

तरी अनेकदा वेळ प्रसंगी मी आणि डॉ. वसंतराव पवार माझ्या मोटर सायकलवर बसून कामानिमित्त फिरत असू. भौतिक सुख-सुविधांना आम्ही फारसे महत्त्व देत नसू. डॉ. वसंतराव पवार, डॉ. डी. एस. आहेर ही मंडळी पुढे आपल्या कार्यकर्तृत्वाने इतकी मोठी होतील, असे तेव्हा वाटलेही नव्हते. त्यावेळी आमच्या साध्या सरळ मैत्रीचे असे घट्ट नाते होते.

रंगपंचमीनिमित्ताने डॉ. वसंत पवार, डॉ. डी. एस. आहेर, डॉ. डी. एस. पाटील ही मंडळी नवीन डॉक्टर लोकांना रंगपंचमीनिमित्त एकत्र बोलवून स्नेहमेळावा घडवून आणत. त्यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,संघटित होऊन समाजासाठी चांगले कार्य करू या, असे प्रोत्साहन कायमच ही मंडळी नवीन डॉक्टरांना देत असत.

आमचा कौटुंबिक स्नेहसंबंध कायम होता. डॉ. वसंतराव पवार आणि माझ्या वैवाहिक जीवनाची नाळ कोपरगावमधील! दोघांच्याही सुविद्य पत्नी या कोपरगावच्या दोन सुसंस्कृत घराण्यातल्या! आतापर्यंत व्यावसायिक कार्यात आम्ही कधीच वैयक्तिक हितसंबंध, स्वार्थ आणला नाही. म्हणूनच आमच्या मैत्रीत कायम स्वाभिमान टिकून राहिला.

वसंत पवारांच्या कुटुंबवत्सल परिवारात गेल्यावर नीलिमाताईंना कायम वाटायचे की ही सर्व आपली माणसे आपली असावीत. एकमेकांना सहकार्य करावे, सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखाचे वाटेकरी व्हावे.परंतु वसंतराव पवार त्या बाबतीत माझ्यासमोर कधी जास्त उघडले नाहीत. प्रसंगी कठोर निर्णय क्षमता हा राजकारणात कधी सद्गुण ठरतो तर कधी समाजाकरता दुर्गणही ठरतो.

डॉ. पवारांना कामाची आवड तर होतीच, परंतु आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी समाजातील जास्तीत जास्त तरुण शिक्षित व्हावे यासाठी आपण लोकांच्या उपयोगी पडावे, असा विचार होता. या समान विचारातूनच आमची मैत्री झाली व वैद्यकीय क्षेत्रात राहून लोकांची सेवा करताना वैयक्तिक स्वार्थ किंवा पैसा याकडे डॉ. पवार यांना कधीच पाहिले नाही.

समाजासाठी आपले ज्ञान उपयोगी पडावे ही तळमळ त्यांच्यामध्ये कायमच होती. त्यामुळे त्यांचे कार्य उंचावले. वैद्यकीय व्यवसायातून आणि खऱ्या समाजसेवेच्या निष्ठेतून त्यांच्या यशस्वी राजकीय जीवनाची पक्की पायाभरणी झाली.

डॉ. पवार वैद्यकीय क्षेत्रात अगदी निष्णात शल्यविशारद होते. उत्तम चिकित्सक, अतिशय कष्टाळू, वैद्यकीय सेवेत एकरूप झालेले होते. जिल्हा रुग्णालय असो की, स्वतःचे रुग्णालय असो; अगदी झोकून देऊन ते रुग्णसेवा करीत असत. मला आठवते, एकदा संगमनेरच्या दंगलीत गोळी लागलेला तरुण रुग्ण नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. रात्रीच्या राऊंडच्या वेळी हे त्यांना समजले तेव्हा तेवढ्या रात्री त्यांनी त्याचे ऑपरेशन करून ती गोळी काढली.

अशा कितीतरी कठीण शस्त्रक्रिया काळ व वेळेचे भान न ठेवता त्यांनी परिश्रमाने आणि कौशल्याने केल्या. सर्जरीही त्यांची आवड होती. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी त्यांचा संपर्क आला. त्यातून समाजाभिमुख होण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली व वैद्यकीय सेवा करताना रुग्ण, त्यांचे नातेवाईक असो की हॉस्पिटलमधील परिचारक; सेवकवर्ग किंवा मोठा वैद्यकीय अधिकारी असो, या सर्वांशी प्रेमाने आणि तेवढ्याच सलोख्याने त्यांचे वागणे असे.

शल्यविशारद म्हणून ते निपूण होतेच, परंतु त्या गुणांचा उपयोग फक्त पैसे कमावण्यासाठी किंवा त्या क्षेत्रात स्वतःचे अधिराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी कधी केला नाही. एखाद्या ठिकाणी तातडीचे ऑपरेशन असेल अशावेळी त्यांना फोन केल्यावर ते पंधरा मिनिटांत येतो म्हटल्यावर बरोबर पंधरा मिनिटांत हजर होत असत. नाही तर आज डॉक्टर अर्धा तासात येतो, अशी कमिटमेंट करूनही दोन-दोन तास येत नाही.

समाजहितासाठी काम करीत असताना त्यांची तळमळ, नेहमी त्यासाठी नवीन-नवीन योजनांची अंमलबजावणी यामुळे समाजामधील ज्येष्ठ प्रस्थापित मंडळींशी त्यांचा संपर्क व सलोखा वाढला. कष्टाळू, होतकरू आणि सामाजिक जाण असलेला हा तरुण डॉक्टर समाजासाठी चांगले कार्य करेल, अशी विश्वासार्हता लोकांमध्ये निर्माण झाल्याने तत्कालीन समाज धुरिणांनी डॉ. वसंत पवारांना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यात ओढून घेतले. नवीन सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करतानाही त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करण्याचा गुण, चिकित्सक म्हणून त्वरित निर्णय घेण्याची वृत्ती, तीव्र बुद्धिमत्ता हे नैसर्गिक गुण असल्यामुळे मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेचा डॉ. वसंत पवार यांनी विकास करीत राज्यातील एक नामांकित शैक्षणिक संस्थेत रूपांतर केले.

त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या झपाट्याने केलेला विकास, त्यामधून लाखो विद्यार्थ्यांना झालेला विकास, हजारो होतकरू गरजू तरुणांना रोजगार, शैक्षणिक विकास ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

समाजकारणी, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रस्थापित राज्यकर्त्यांनी वसंतरावांना राजकीय क्षेत्रात ओढून घेतले. यावेळीही मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी वसंतरावांनी अहोरात्र मेहनत केली. ते खासदार झाले. आमदार झाले तरी या पदांचा उपयोग त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा चौफेर विकास करण्यासाठी केला. राजकारण, समाजकारण करताना अनेकदा त्यांना वैयक्तिक स्तरावर अनेकांचा रोष, अनेकांची नाराजी पत्करावी लागली.

त्यांची सत्ता केंद्रित करून ठेवण्याची वृत्ती कधी सद्गुण ठरला तर कधी दुर्गुण ठरला. काही परिस्थितीत त्यांना स्वतःला वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रियजनांनाही नैराश्य आले. परंतु या परिस्थितीतूनही ते कौशल्याने बाहेर पडले.

अनेक क्षेत्रात अहोरात्र काम करण्याचा झपाटा, राजकारण आणि अतिमहत्वकांक्षा त्यांच्या अंगलट आली. यामुळे एक कष्टाळू, प्रचंड सामर्थ्य असलेला आणि घराघरात पोहोचलेला माझा कौटुंबिक मित्र कायमचा दुरावला.

:डॉ. शशिकांत गायकवाड, नेत्ररोग तज्ज्ञ.