Khandoba Tekdi
Khandoba Tekdi|स्वर्गीय अनुभूती देणारे शहर
फीचर्स

स्वर्गीय अनुभूती देणारे शहर

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

देवळाली कॅम्प सर्वांसाठी सुरक्षित स्थळ आहे. कारण देशातील हा सर्वात मोठा लष्करी परिसर आहे. साहजिकच येथे येणारे पर्यटक पर्यटनाचा सुरक्षित आनंद घेऊ शकतात. येथील निसर्गरम्य खंडोबा टेकडी, रेणुकामाता मंदिर, शांत परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. स्वर्गीय अनुभूती देणारे हे शहर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

बागेत असंख्य फुले असतात. निरनिराळ्या रंगांची, वेगवेगळ्या सुगंधाची, सुंदर व आकर्षक! पण त्यातले एखादेच फूल आपल्याला हवेहवेसे वाटते. आपल्या परिचयाची अनेक माणसे असतात. त्यातील एखादीच व्यक्ती आपल्याला आपली वाटते.

आपण अनेक निसर्गरम्य स्थळे पाहतो, पण त्यातले एखादेच स्थळ आपल्याला आपले वाटते. त्या निसर्गरम्य वातावरणात आपण रमून जातो. आपल्याला ते ठिकाण आपलेसे वाटू लागते. आपण त्या स्थळाचे अंतरंग ओळखायला लागता. असेच एक सुंदर आणि निसर्गमय ठिकाण म्हणजे देवळाली कॅम्पची खंडोबा टेकडी!

देवळाली कॅम्पची खरी ओळख ही खंडोबा टेकडीच! अगदी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक पर्यटन स्थळ म्हणून देवळाली कॅम्पला भेट देतात. आज देवळाली कॅम्पमधूनच नव्हे तर आसपासच्या अनेक ठिकाणाहून लोक भल्या पहाटे खंडेराव टेकडीवर व्यायाम व फिरण्यासाठी येतात. येथील वातावरण स्वर्गीय आनंद देते.

अशा वातावरणात आम्ही राहतो हे आमचे खूप मोठे भाग्य! खंडोबा टेकडीच काय, पण संपूर्ण देवळाली कॅम्प सर्वांसाठी सुरक्षित स्थळ आहे. कारण देशातील हा सर्वात मोठा लष्करी परिसर आहे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

खंडेराव टेकडी सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी देवळालीतील अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्ष काम करतात. त्यात आण्णाज् टेम्पल हिल ग्रुपचे योगदान खूप मोठे आहे. देवळालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेणुका माता मंदिर! देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराला पुरातन व मोठी परंपरा आहे. आजही देवळालीकर ही परंपरा मोठ्या श्रद्धेने जोपासतात.

देवळालीशेजारील भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव! त्यांचा ऐतिहासिक वाडा पाहण्यासाठी देशभरातून नागरिक येत असतात. देवळाली कॅम्पचा इतिहास व परंपरा खूप आदर्शवत आहे. येथे सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ शहराच्या प्रगतीसाठीच धावाधाव करतात.

अनेक जाती-धर्माचे लोक कोणताही भेदभाव न करता एकत्रितपणे आणि गुण्यागोविंदाने राहतात. याचा परिणाम कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी होतो. त्यामुळेच ‘शांतताप्रिय शहर’ म्हणूनही देवळालीचा नावलौकिक आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही कॅन्टोन्मेंट बोर्डाची मराठी प्राथमिक ते हायस्कूल ही सर्वसामान्यांची शाळा आहे. याच शाळेत शिक्षण घेऊन कित्येक जण आपापल्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचले आहेत. याशिवाय देवळाली हायस्कूल, सेंट पॅट्रीक, बार्न्स स्कूल, नूतन हायस्कूल, डॉ. गुजर सुभाष हायस्कूल आदी शाळासुद्धा शहरात आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही देवळाली कॅम्प शहर मागे नाही. देवळालीसह पंचक्रोशीतील रुग्णांना कोणत्याही क्षणी हक्काचे हॉस्पिटल म्हणजे देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल! येथे सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध आहेत.

योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन व गरिबांना परवडणारी माफक फी अशी या हॉस्पिटलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हॉस्पिटलमध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स असून परिचारिका व इतर सेवक रुग्णांची मनोभावे सेवा करतात. शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही उत्तमोत्तम सुविधा पुरवल्या जातात. शहरविकासात येथील पत्रकार बांधवांचेही खूप मोलाचे योगदान आहे.

येथील लेव्हिट मार्केट तयार कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ‘मिनी दुबई’ म्हणूनही या मार्केटची ख्याती दूरवर पसरली आहे. किफायतशीर दर व दर्जेदार वस्तू ही या मार्केटची खरी ओळख आहे. फळे, भाजीपाला, हॉटेल्स आदींमुळे येथील गजबज व व्यापार-उदीम चांगलाच बहरला आहे. स्वर्गीय आनंद लुटण्यासाठी एकदा देवळाली कॅम्प शहराला अवश्य भेट द्यावी.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com