Type to search

ब्लॉग

फिरवले नाही म्हणून..

Share

घोडा का अडला, भाकरी का करपली आणि पान का कुजले? या तीनही प्रश्नांचे उत्तर बिरबलाने दिले तसे एकच उत्तर आताही द्यावे लागेल. फिरवले नाही म्हणून! लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध सगळे हा जो नवा प्रयत्न होता त्यात ‘सगळे’ पराभूत का झाले, याचेही हेच उत्तर द्यावे लागते!

पक्षीय आढ्या मनात ठेवून केलेल्या आघाड्या, सवतेसुभे आणि हाती काहीच नसताना केलेल्या मोठ्या वल्गना यांचे माप विरोधकांच्या पदरी पडले आहे. भाजप आणि त्यांच्या धुरीण नेत्यांनी धूर्तपणाने विरोधकांच्या त्याच त्या पठडीबाज वागण्याचा अभ्यास केला. त्यांच्या कमजोरीवर आपल्या यशाचा मनोरा उभारला आणि राजकारणात आणखी पाच वर्षांचा काळ निश्चित करून घेतला.

दांभिकतेच्या मानसिकतेमधून आणि काँग्रेस म्हणजे समुद्र आहे, या जुन्या भावनिकतेमधून खडबडून जागे झालेल्यांना आता चार खडे बोल सारेच सुनावतील, पण ही शर्यत सुरू झाली त्यावेळी एकमेकांच्या पायात पाय घालून धावण्याचा प्रयत्न करणार्‍या राजकीय कडबोळ्यांना याची मनातून जाणीव होतीच. मात्र, त्यांच्यात परस्पर हेवेदावे असल्याने ते एकजिनसीपणा दाखव शकले नाहीत.

या निवडणुकीत फार मोठ्या विश्लेषणांचा किस गेल्या काही तासांत पडला आणि तो आता पुढच्या काही महिन्यांपर्यंत पडत राहणार आहे. सामान्य मतदारांना आणि मोदी आणि कंपनीला सामोरे जाताना समर्थ पर्याय कोण, हे शेवटपर्यंत सांगितले गेले नाही. ते न सांगताच वावदूक टीका करत राहिल्याचा हा परिपाक म्हणावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले तसे मोदी, मोदी आणि फक्त मोदीजीच असे म्हणत भारतीय मतदारांना जो उपलब्ध प्राप्त पर्याय दिसला. त्याला स्वीकारणे भाग पडले आहे! मुख्यमंत्री म्हणाले तसे, देश आणि देशातील जनता कुणाच्या बाजूने होती आणि आहे, हे निकालांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. एक अकारण धुराळा या निवडणुकीत उडविला गेला, नाना शंका उपस्थित केल्या गेल्या. दोन्ही बाजूनी अतिशय हीन पातळीवर जाऊन प्रचार केला गेला. पण, देशाच्या मनात मोदी नाही तर कोण? या प्रश्नाचे उत्तर समर्थपणे सांगता येईल असा चेहरा उभा करण्यात विरोधक अपयशी ठरले, यावर या निकालांनी शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासाचा मुद्दा भाजपने तसा काहीसा बाजूला ठेवला होता आणि अस्मितेच्या लढाईचे जुनेच शस्त्र बाहेर काढत त्यांनी शेवटपर्यंत विरोधकांना गाफिल ठेवले आणि रेंगाळत गेलेल्या मतदानात नवनवीन मुद्दे काढत विरोधकांची त्या प्रचारामागे फरफट केली. हे प्रचार तंत्र भाजपने 2014 मध्येही समूह माध्यमांना सोबत घेऊन राबविले होते.

यावेळी तर तेच सत्ताधारी होते त्यामुळे पूर्वीपेक्षा प्रभावी आणि जोरकसपणे ठसठशीत यश त्यांना मिळाल्याचे दिसले आहे. मोदी यांच्या नेतृत्त्वावर ही विश्वसनीयतेची मोहोर आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी मोदी विरुद्ध गांधी म्हणजे वेगळ्या शब्दात दोन अशा प्रतिमा ज्यांची तुलना होणार नाही, तेच मतदारांसमोर ठसवले गेले. त्यामुळे मोदी लाट नसतानाही त्यांनाच स्वीकारण्याशिवाय देशातील मतदारांसमोर कोणताही प्रत्यय राहिला नाही. गेली पाच वर्षे स्वत:ला प्रधानसेवक, चौकीदार या नात्याने ‘देशसेवेत झोकून देणार्‍या मोदीजींनी एकही दिवस विश्रांती घेतली नाही.’ इत्यादी बाबींचा जनमानसावर नवमतदार आणि महिलांवर प्रभाव टाकण्याचे प्रचारतंत्र यशस्वी झाले आहे. थोडक्यात नवा इतिहास घडला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना अहोरात्र परिश्रम करायला लावले. लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तेव्हा पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार नाही, हाच कयास बांधला गेला. त्याला प्रतिवाद म्हणून ‘फिर एक बार मोदी सरकार’, एवढेच नव्हे तर ‘बार बार-मोदी सरकार’ हा नारा भाजपने दिला. जेव्हा चौकीदार म्हणून खिल्ली उडविली गेली, मात्र सामान्य माणूस हाच भाजपचा जनाधार आहे,

हे समजून घेण्यात विरोधकांना अपयश आले. त्यांनी या संकल्पनांना व्यक्तिगत प्रचार समजून ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा चिकटवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्या नंतर कसा अंगलट आला आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन कशी माफी मागावी लागली, या गोष्टींचा प्रभाव मतदानावर पडला आहेच. तेव्हा संपूर्ण देश चौकीदार म्हणून मोदीजींच्या पाठिशी उभा राहिला. विरोधकांकडून जुन्याच पद्धतीने जाती-पातीचे समीकरण मांडले गेले. पण, भाजपने त्यांनाच तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर झुंजविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. वंचित बहुजन आघाडीने त्यामुळेच इतका जोर मारला की काँग्रेस राष्ट्रवादीला त्यांच्या पारंपरिक मतापासून आणि पर्यायाने सत्तेपासून वंचित ठेवले आहे. भिमा कोरेगावप्रकरणी भाजप सरकारची कोंडी करणार्‍या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सर्व 48 मतदारसंघात आतापर्यंत मिळालेली मते पाहिली तर सगळीकडे त्यानी किमान 50 हजार ते कमाल 1 लाख 60 हजारापर्यंत मते पळवली आहेत. त्यामुळे वंचितने एकूण 38,05575 मते पळवून विरोधकांच्या शिडातील उरली सुरली हवाच काढून घेतली आहे. प्रस्थापित विरोधी लाट यावेळी नव्हती असे सांगण्यात येत असले तरीही भाजप-सेनेला तसे म्हणता येत नाही. कारण अमरावती, चंद्रपूर, औरंगाबादेत आणि रायगडात जे काही दिग्गज हारले आहेत त्यातून ते दिसले आहे. मात्र विरोधकांच्या बेकीचा फायदा घेत भाजपने मुसंडी मारली आहे, हे नाकारता येत नाहीच!
किशोर आपटे, मो. 9869397255

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!