Type to search

ब्लॉग

फायदा नाही अन् नुकसानही!

Share

नचे अध्यक्ष शी जिनपिंग भारत दौर्‍यावर येण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनच्या दौर्‍यावर होते. जिनपिंग यांनी भारतात गेल्यानंतर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करावा, हे सूचित करणे हा इम्रान यांच्या चीन दौर्‍याचा उद्देश होता. मागच्या वेळी जिनपिंग अहमदाबादमध्ये मोदी यांच्यासोबत झुल्यावर झोका घेत होते तेव्हा अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली होती. भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर बंदी घालण्याचा विषय संयुक्त राष्ट्र संघात उपस्थित केला त्या प्रत्येक वेळी चीनने खोडा घातला. ही सर्व परिस्थिती पाहिली तर चीन आणि भारताच्या चर्चेत काश्मीरचा मुद्दा येईल असे वाटले होते, परंतु भारताच्या कूटनीतीमुळे काश्मीरप्रश्नावर चर्चाच होऊ शकली नाही. हे भारताचे यश आहे. अर्थात, अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक व्यापारात चीनला भारताची मोठी गरज आहे. त्यामुळे पाकिस्तानशी मैत्री आणि भारताशी व्यापारी गरज याची तुलना करून चीन पावले टाकत आहे. नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अशा प्रकारच्या अनौपचारिक चर्चा पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. अशा भेटीगाठी होत राहतात. त्याद्वारे चर्चा होत राहते, परंतु आतल्या गाठी दूर होतील तेव्हाच मैत्रीचे नाते निर्माण होईल.

भारत आणि चीन यांच्यात व्यापार, गुंतवणूक आणि सेवा या विषयांवर चर्चा करण्यासाठी एका यंत्रणेची स्थापना करण्यात येणार आहे. कैलास मानसरोवर यात्रेकरुंसाठी चीन सुविधा पुरवणार आहे तसेच भारताने चीनला औषधे आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुढच्या वर्षी दोन्ही देशांच्या मैत्रीला 70 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या अनुषंगाने जिनपिंग यांनी मोदी यांना चीन भेटीचेे निमंत्रण दिले आहे. चीनच्या सत्ताधारी पक्षाच्या स्थापनेला 2022 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी चीनने आतापासून तयारी केली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी होणार्‍या चर्चेतून आणखी काही फलनिष्पत्ती होईल. चीन आणि भारताच्या प्रत्येक बैठकीत दहशतवादावर चर्चा होते. दहशतवादाविरोधात कारवाईचा ठराव होतो आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाईचा मुद्दा जेव्हा पुढे येतो तेव्हा पाकिस्तानची वकिली करायला चीनच सर्वात पुढे असतो.

जिनपिंग यांच्या भारत दौर्‍यापूर्वी चीनने
काश्मीर प्रकरणी महत्त्वाचे वक्तव्य केले होते. काश्मीर मुद्यावर पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळणार्‍या चीनचे सूर बदलले होते. अर्थात, कोणत्याही देशाच्या दौर्‍यावर जाण्यापूर्वी कटुता येणार नाही, हे पाहिले जाते. काश्मीर मुद्दा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला पाहिजे, असे मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने व्यक्त केले. त्याचबरोबर जिनपिंग यांच्या दौर्‍याच्या दोन दिवस अगोदर तिथली माध्यमे भारत-चीन व्यापाराला किती वाव आहे आणि दोन्ही देशातील संबंध चांगले होण्यात दोघांचाही कसा फायदा आहे, हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनमध्ये असताना सांगत होते. त्यावरून जिनपिंग यांचा दौरा किती महत्त्वाचा होता, हे लक्षात यायला हरकत नाही. इम्रान खान हे काश्मीर प्रकरणी दुष्प्रचार करण्यासाठी चीनमध्ये असताना चीनचा प्रवक्ता काश्मीरप्रश्नी असे वक्तव्य करतो, हेच चीनच्या आजवरच्या भूमिकेला छेद देणारे होते. प्रत्यक्ष भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेत दहशतवाद आणि धार्मिक कट्टरवादाविरुद्ध लढा देण्याच्या मुद्यावर सहमती झाली. विशेष म्हणजे जिनपिंग यांनीच इम्रान खान यांच्या चीन दौर्‍याबद्दल मोदी यांना सांगितले.

मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल जिनपिंग यांनी समाधान व्यक्त केले. पुढील वर्षी तिसर्‍या शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना निमंत्रण दिले. सध्या भारत आणि नेपाळ यांच्यात चांगले संबंध नाहीत. चीन आणि नेपाळमध्ये मात्र मधूर संबंध आहेत. भारतातून थेट नेपाळच्या दौर्‍यावर जिनपिंग यांचे जाणे मात्र खटकणारे आहे. मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यापारातील असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला. व्यापार, सेवा व गुंतवणुकीत संतुलन आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावर जिनपिंग यांनी ठोस हमी दिली. द्विपक्षीय व्यापार तोटा कमी करणे, व्यापार, गुंतवणूक व सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय व्यवस्था नेमण्याचा निर्णय झाला. सीमावाद सोडवण्यावर दोन्ही नेते सहमत झाले. यासाठी दोन्ही बाजूंचे विशेष प्रतिनिधी सातत्याने भेटत राहतील. जिनपिंग यांनी अशा विशेष प्रतिनिधींच्या बैठका सुरू ठेवण्यावर भर दिला. पुढील बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल. या बैठकीसाठी भारताच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल विशेष प्रतिनिधी आहेत. दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेविरोधात लढू, असे दोन्ही नेत्यांनी म्हटले. जिनपिंग म्हणाले, समाजाला यापासून सुरक्षित राखण्यासाठी दोघे मिळून काम करू शकतो. इसिसच्या धोक्यावर चर्चा झाली. पाक प्रायोजित दहशतवादावर मात्र चर्चा झाली नाही.

जिनपिंग यांनी रणनीतिक संवाद, संपर्क मजबूत करण्यासाठी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवणे यावर भर दिला. भारत-चीनच्या राजनैतिक संबंधांच्या 70 व्या वर्धापनानिमित्त 70 कार्यक्रम होतील. 35 कार्यक्रम चीनमध्ये तर 35 भारतात होतील. काही वर्षांपासून चीनने भारताला कोंडीत पकडण्यासाठी ‘बकेट’ टेक्निकचाही अवलंब केला. ‘बकेट’ टेक्निक म्हणजे एखाद्या देशाच्या शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारून त्यांना आपल्याकडे खेचत त्या देशाला एकाकी पाडायचे आणि त्याच्या भोवती इतर देशांचे जाळे विणायचे. भारताच्या बाबतीत हे तंत्र वापरताना पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळसारखे देश चीनच्या जाळ्यात आले आहेत. चीनने या देशांच्या विकासाच्या नावाखाली अब्जावधीचे कर्ज देत त्यांना मांडलिक केले आहे. नेपाळच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये भारत दखल देत असल्याचे सांगत नेपाळी लोकांच्या मनात विष कालवण्याचे काम चीन काही वर्षांपासून करतो आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांची भेट दोन्ही देशांच्या जुन्या संबंधांना उजाळा देणारी मानली जात आहे.

1946 मध्ये चीनमध्ये साम्यवादी शासन स्थापन झाले. यानंतर 1954 मध्ये पंचशील तत्त्वांनुसार परस्पर सहकार्याचा करार होऊन दोन्ही देशांच्या संबंधांची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशांच्या संबंधांत अनेक चढ-उतार आले. चीन किंवा भारतात नवीन सरकार स्थापन झाल्यावर दोन्ही देशांनी परस्पर संबंध सुधारण्यावर भर दिला. 2008 पासून भारत आणि चीनमधील व्यापारही सातत्याने वृद्धिंगत होत आहे. 2014 मध्ये चीनने भारतात 116 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. 2017 पर्यंत ती 160 अब्ज डॉलर्सच्या घरात गेली. चालू वर्षात दोन्ही देशांमधला व्यापार 88 अब्ज डॉलर्सवर गेला असून प्रथमच दोन्ही देशांतील व्यापार तूटही 10 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे. गेल्यावर्षी चीनमधील वुहान शहरात दोन्ही देशांमध्ये शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या निमित्तानेही दोन्ही देश जवळ आले आहेत. असे असलेे तरी दोन्ही देशांच्या संबंधांबाबत काही कळीचे मुद्देही आहेत. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. भारत आणि चीन यांच्यातले संबंध सुधारण्याबाबत जिनपिंग यांनी केलेले वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले, एकमेकांचा दृष्टिकोन जाणून घेत प्रामाणिकपणे चर्चा झाली. ही द्विपक्षीय चर्चा अधिक सखोल आणि चांगली झाली. भारत आणि चीन यांच्यातील संबंध विस्तारणे हेच आमच्या सरकारचे ठोस धोरण आहे. मोदी यांनी सांगितले, अनौपचारिक चर्चेने दोन्ही देशांमध्ये एका नवीन सहकार्य पर्वाची सुरुवात झाली आहे.नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात मैत्री असली तरी चीनवर विश्वास ठेवावा, अशी स्थिती नाही.

अमेरिकेबरोबरच्या व्यापारयुद्धामुळे चीनला भारताची गरज आहे. एकीकडे पाकिस्तानला अंकित राष्ट्र करायचे, दुसरीकडे भारताशी मैत्रीपर्व वाढवायचे अशी व्यूहनीती चीन वापरत आहे. त्यामुळेच चीनशी मैत्री वाढवताना व्यापारातली तूट कमी करण्यावर भर द्यायला हवा, परंतु दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या ताज्या भेटीत त्यादृष्टीने फार काही झाले नाही.
– प्रा. विजयकुमार पोटे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!