फाटेलेले ओठ

0

जन्मत:च ओठ फाटलेला असणे ही बर्‍याच मुलांमध्ये आढळणारी समस्या आहे. सहसा एक किंवा दोन्ही ओठ फाटलेले असतात. पाचशे ते अडीच हजार मुलांमागे असे एक मूल जन्माला येऊ शकते. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. आधुनिक सौंदर्य शल्यचिकित्सेच्या सहाय्याने (प्लॅस्टिक सर्जरी) हा दोष पूर्णत: काढून टाकणे शक्य आहे.

विकृती असलेले मूल वाढवण्यात मानसिक दु:खाचा समावेश तर असतोच. परंतु, सुरुवातीला अशा ओठ फाटलेल्या मुलाला स्तनपान देण्यापासूनच अडचणी येऊ लागतात. बाळ गुदमरू लागते. त्याच्या नाकातून दूध बाहेर पडू लागते. बोलण्याचा विकास आणि दात येणे या दोन्ही गोष्टीतही मोठाच त्रास होतो. या मुलांना कानाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. कारण प्यायलेले दूध कर्णनलिकेत जाऊन संसर्ग होतो.

फक्त ओठ फाटलेला असेल, म्हणजेच क्लेफ्ट लिपचा त्रास असेल आणि टाळा फाटलेला (क्लेफ्ट पॅलेट) नसेल तर स्तनपान देताना सहसा त्रास होत नाही. स्तनपान देताना आईने स्तनाग्र आणि स्तनाचा काळसर तपकिरी भाग मुलाच्या तोंडात ठेवावा लागतो. त्यामुळे बाळाचा ओठ झाकला जातो आणि ते व्यवस्थितपणे स्तनपान करू शकते.

मुलाला जास्तीत जास्त उभे धरून स्तनपान देणे ही एक चांगली कल्पना आहे. आईने पलंगावर बसून मुलाला आपल्या छातीशी उभे धरावे, असा सल्ला बहुतेक बालरोगतज्ञ देतात. बाळाचे पाय तिच्या दोन्ही बाजुंना असतात आणि पावले पाठीच्या बाजुला असतात. आता एका हाताने मुलाच्या पाठीला आधार देऊन दुसर्‍या हाताने त्याचे डोके स्तनाजवळ नेऊन ती त्याला पाजू शकते. मोठ्या प्रमाणात ओठ फाटला असेल, तर थेट स्तनपान करणे शक्य नसते. अशावेळी खास बाटल्या आणि त्यांची बुचे बाजारात मिळतात. त्यांच्या सहाय्याने स्तनपान देता येते किंवा स्तनातून दूध काढून घेऊन ते मुलाला ड्रॉपरने किंवा नळीच्या सहाय्याने पाजावे लागते. मूल तीन महिन्यांचे झाल्यावर शस्त्रक्रिया करून मुलाचे ओठ चांगले करता येतात. यावेळी मुलाची वाढ व्यवस्थित असावी लागते. तरीही एक ते दोन वर्षाच्या दरम्यान ही शस्त्रक्रिया करावी लागते. भरवताना बाळ गुदमरू नये, त्याला नीट बोलता यावे आणि अर्थातच त्याच्या शारीरिक सौंदर्यात बाधा येऊ नये यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. कोणत्याही कारणाने या शस्त्रक्रियेला विलंब झाला तर प्रोस्थेसिसची (दोष झाकण्यासाठी वापरले जाणारे साधन) गरज भासते.

शस्त्रक्रियेनंतर ओठ चांगले झाल्यावर बोलण्यास शिकवणार्‍या तज्ञांची (स्पीच थेरपिस्ट) आणि जबडा व दात यांच्यातील अनियमितताविषयक तज्ञांची (ऑर्थोडोंन्टिस्ट्स) मदत घेणे सुज्ञपणाचे ठरते. त्यामुळे मुलाचे पुनर्वसन चांगल्या प्रकारे होते. हे सारे नेहमीच बालरोगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केले जावे.
डॉ. योगिता पाटील

LEAVE A REPLY

*