प्लास्टिक बाटल्यांपासून बनविला २१ मीटरचा विक्रमी मनोरा

0

इगतपुरी । दि १८ प्रतिनिधी : वर्षानुवर्षे नष्ट न होणाऱ्या प्लास्टिकच्या दुष्परिणामामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाला निमंत्रण मिळत आहे.

अशा स्थितीत १ लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्यांचे इगतपुरी आणि परिसरातून संकलन करीत महिंद्रा आणि महिंद्रा या कारखान्याने पर्यावरणाशी नाते जोडीत जगासमोर आदर्श ठेवला आहे.

या निरुपयोगी प्लास्टिक बाटल्यांचा २१ मीटर गगनचुंबी मनोरा बनवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लवकरच होणार आहे.

यापूर्वी १६ मीटर उंचीचा ४६ हजार प्लास्टिक बाटल्यांचा विश्वविक्रम मोडीत काढून इगतपुरीच्या महिंद्रा कंपनीने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत इगतपुरी येथील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत १ लाख प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेला २१ मीटर उंच गगनचुंबी मनोरा खुला करण्यात आला.

महिंद्राच्या इगतपुरी येथील कंपनीतील अधिकारी, कामगार यांनी काही महिन्यांपासून इगतपुरी शहरासह परिसरातील भागात मोठ्या प्रमाणावर पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचे प्रचंड संकलन केले.

त्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची जोड देऊन मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबवले. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्लास्टिक बंदीसाठी उत्साहाने सक्रिय सहभागी होऊन उपक्रमात भाग घेतला.

प्लास्टिकच्या बाटल्या १ लाखांपेक्षा जास्त संकलित झाल्या. सद्यस्थितीत या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक वापराला स्वखुशीने प्रतिबंध करण्यात आलेला असल्याने ही कंपनी प्लॅस्टिकमुक्त कंपनी ठरली आहे.

LEAVE A REPLY

*