प्रेसमधील सहा कर्मचारी निलंबित

0

नाशिकरोड | दि. ३ प्रतिनिधी- येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमधील एक वर्षापूर्वी झालेल्या प्रिंटिंग विभागात करण्यात आलेल्या भरतीतील सहा कर्मचार्‍यांना निलंबित केल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या वर्षी आयएसपीमध्ये प्रिंटिंग विभागात प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या २० जागा तसेच सिव्हिल व मॅकेनिकल इंजिनियरच्या जागा भरण्यात आल्या होत्या.

या जागा रितसर जाहिरातीनुसार भरण्यात आल्या होत्या. ही सर्व भरती प्रक्रिया मुंबई येथे झाली होती. छपाई क्षेत्रातील पदविका, पदवीधारक उमेदवार भरणे अत्यावश्यक असताना सिव्हिल व मॅकेनिकल इंजिनियरच्या जागा भरण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात सदरचे काम छपाई विभागाचे होते.

भरती झालेल्या या सर्व उमेदवारांनी सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून काम केले. परंतु या उमेदवारांच्या चीफ विजीलंस अधिकार्‍यांकडे तक्रारी गेल्या. त्यात प्रेसमधील काही अधिकार्‍यांची मुले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तक्रारींची विजीलंसने चौकशी केली असता प्रेस व्यवस्थापनाचा गलथानपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले.

या सहा कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यात जंगले, पॉल, खेलुकर, घोलप, शेंडे, पाल अशी कर्मचार्‍यांची नावे असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*