प्रेम प्रकरणातून युवकाचा खून ? ; तोरंगण – चिखलपाडा गावांत पेटला वाद

0

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलपाडा गावाजवळील एका विहिरीत तोरंगण येथील एका युवकाचा मृतदेह आज दुपारी आढळून आला. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप करत तोरंगणवासीयांनी चिखलपाडा गावात जावून वाद घातला यामुळे दोन्ही गावांमध्ये वाद पेटला असून स्थिती तणावपुर्ण आहे.

विष्णु काशिनाथ चौधरी (25, रा. तोरंगण ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी याचे चिखलपाडा येथील एका युवतीबरोबर प्रेमसबंध होते. परंतु त्यांच्या कुटुंबियांना हे माहित झाल्यानंतर काही दिवसांपुर्वीच दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले होते. या नंतर सदर युवतीने हरसूल पोलीस ठाण्यात या युवकाने आपणास व कुटुंबियांस मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान या घटनेनंतर 21 मार्च रोजी विष्णु चौधरी हा आपल्या प्रियकर युवतीस भेटण्यासाठी पुन्हा चिखलपाडा येथे गेला होता. परंतु यानंतर तो बेपत्ता झाला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. युवकाच्या नातेवाईकांनी चिखलपाडा येथे चौकशी केली होती. मात्र तो आढळून आला नव्हता. परंतु आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह चिखलपाडा जवळील एका विहिरीत आढळून आल्याची माहिती हरसूल पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेऊन पाहणी केली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या चौधरी या युवकाचाच असल्याचे त्याचे कपडे व इतर साहित्यावरून निश्चित झाले. त्याच्या कुटुंबियांकडून त्याची ओळख पटविण्यात आली.

सदर मृतदेहाच्या कंबरेला मोठी जाळी व जाळीमध्ये त्याच्या वजनाइतके दगड बांधल्याचे आढळून आले. या घटनेने संतप्त झालेल्या युवकाचे नातेवाईक व तोरंगणच्या नागरीकांनी सदर युवतीच्या घराकडे धाव घेत तीच्या कुटुंबियांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचविण्यासाठी चिखलपाडाचे इतर ग्रामस्त मध्ये पडल्याने दोन गावातील गावकर्‍यांमध्येच वाद सुरू झाला. यामुळे प्रकरण अधिक चिघळले. पोलीसांनी मध्यस्थी करत दोन्ही ग्रामस्थांची समजूत घालून संशयीतांवर योग्य ती कारवाई करण्याचे अश्वासन दिल्याने वातावण शांत झाले परंतु दोन्ही गावांत सायंकाळपर्यत मोठा तणाव होता.

दरम्यान सदर युवकाचे शवच्छिेदन जिल्हा रूग्णालयात करण्यात आले असून वैद्यकीय सुत्रांनी सदर युवकाने विषारी औषधही सेवन केल्याचे स्पष्ट केले आहे. कंबरेला वजन बांधल्याचेही दिसून येत आहे. यामुळे ही आत्महत्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिक तपास हरूसुल पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

*