प्रियांका चोप्रासाठी आसाम सरकारने खर्च केले २.३७ कोटी

0

आसाम सरकारने प्रियांका चोप्राच्या केवळ एका भेटीसाठी २.३७ कोटी रूपये मोजल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पर्यटनमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी ही माहिती दिली.

‘एआययूडीएफ’चे आमदार मामुन चौधरी यांनी विधानसभेत यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना हेमंत बिस्व सर्मा यांनी सांगितले की, प्रियांका चोप्रा ही गेल्या दोन वर्षांपासून आसाम सरकारची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. मात्र, यासाठी तिचे मानधन वार्षिक तत्त्वावर निश्चित करण्यात आलेले नव्हते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आसाम राज्याच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसिडरपदासाठी नकार दिल्यानंतर देसी गर्ल प्रियांकाची वर्णी लागली होती. गेल्यावर्षी २४ डिसेंबरला प्रियांकाने आसामला भेट दिली होती. यावेळी प्रियांका चोप्रासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील पर्यटनमंत्र्यांनी जाहीर केला.

प्रियाकांच्या या भेटीदरम्यान विविध गोष्टींसाठी एकूण २,३७,४५,५२० रूपयांचा खर्च झाला. यापैकी आसामधील पर्यटन क्षेत्राची प्रसिद्धी करण्यासाठी ‘पर्पल पेबल एन्टरटेन्मेंट’ला १.६१ कोटी रूपये देण्यात आले होते. तर या भेटीवेळी प्रियांकासोबत असणाऱ्या टीममधील सदस्यांसाठी २२,७०,२५० रूपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय, विमानाच्या तिकीटासाठी ११,९१,६८८ आणि प्रवासाच्या अन्य खर्चासाठी ९,९४,३२५ रूपयांचा खर्च झाला. तसेच आसाम सरकारने प्रियांकाच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेलच्या भाड्यासाठी ९,८८,८३२ रूपये खर्च केल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*