प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू -जळगावला ममता हॉस्पिटलची तोडफोड

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मेहरुण मधील एका महिलेची प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. महिलेच्या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी संबधीत डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ममता हॉस्पीटलची तोडफोड केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हुमेरा शेख हे मयत महिलेचे नाव आहे. मेहरुण परिसरातील मलिकनगरमध्ये मोहीम शेख ईस्माईल पिंजारी(रा. बाम्बे बेकरीजवळ) हे पत्नी उमेरा शेख (वय २७) यांच्यासह मोनीस व उमेद (वय ७) या जुळ्या मुलांसह आयान (वय ३) यांच्यासोबत राहतात. उमेरा शेख ही गर्भवती असल्याने त्यांच्यावर मास्टर कॉलनी परिसरातील ममता हॉस्पीटलचे डॉ. शाहीद खान व डॉ. रुक्साना खान यांच्याकडे उपचार सुरु होते.

सकाळी १० वाजेच्या सुमारास हुमेरा यांची नॉर्मल प्रसुती झाली. एका गोंडस मुलाला त्यांनी जन्म दिला. यानंतर काहीवेळा त्यांची प्रकृती खालाविली. रक्तस्त्राव होत असल्याने डॉ. खान दाम्पत्यांनी उमेरा यांचे नातेवाईक हमीदा निसार पिंजारी, जाबीर शेख पिंजारी, शरीफ शेख यांना घटनेबाबत माहीती दिली.

यावेळी रक्तस्त्राव का होत आहे याचे निदान करता येत नसल्याने ऍपेक्स हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला डॉ. खान यांनी महिलेच्या नातेवाईकांना दिल्याचे महिलेचे मामा जाबीर पिंजारी यांनी सांगितले. ऍपेक्स हॉस्पीटल येथे हुमेरा यांना पाच रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्यात. मात्र त्यांचा उपचारादरम्यान दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे दीड तासानंतर मृत्यू बाबत माहितीची दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हद्दीच्या वादामूळे तक्रारदाराची पायपीठ

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने न्याय मिळविण्यासाठी महिलेचे मामा जाबीर पिंजारी हे रामानंदनगर, जिल्हापेठ यानंतर एमआयडीसी अशी पायपीठ करावी लागली.

सोनोग्राफीतही निदान कळाले नाही

प्रसुतीनंतर डॉ.रुक्साना खान यांनी हुमेरा हीची सोनोग्राफी करण्यास सांगितले होते. सोनोग्राफी केल्यानंतरही रक्तस्त्राव कशामुळे होत असल्याचे कारण समजले नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

नस कापल्याचा नातेवाईकांचा आरोप

हुमेरा यांची प्रसुती नॉर्मल झाली. बाळही व्यवस्थीत आहे. मात्र हुमेराचे रक्त थांबत नाही. त्यामूळे डॉक्टरांनी प्रसुतीदरम्यान एखादी नस कापली असेल आणि उपचारासाठी हलगर्जीपणा करीत दीड तासाने हुमेरा मृत्यू झाल्याची माहीती दिली. हा सर्व प्रकार संशयास्पद असुन ममता हॉस्पीटलवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे मामा जाबीर शेख पिंजारी यांनी केली.

ममता हॉस्पीटलची तोडफोड

हुमेराच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास काट्याफाईल परिसरातील काही जणांनी रिक्षाने येवुन ममता हॉस्पीटलवर दगडफेक करीत तोडफोड केली. यात पल्लवी समाधान पाटील ही रुग्ण महिला जखमी झाली. कॉम्युटरसह वाहनांच्या काचा असे सुमारे ८० हजारांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले. यामूळे परिसरात तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.

नातेवाईकांनी मागितले तीन लाख

हुमेरा शेख ह्यांच्या उपचाराबाबत नातेवाईकांना माहिती दिली होती. उपचारादरम्यान हुमेरा मयत झाल्याचेही वेळेवर सांगितले. यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. यानंतर प्रकरण तडजोडीसाठी तीन लाखाची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्याने तोडफोड करण्यात आली. असे ममता हॉस्पीटलचे संचालक डॉ.शाहीद खान यांनी सांगितले.

हल्ला करणारे सीसीटीव्हीमध्ये कैद

ममता हॉस्पीटलवर हल्ले करणारे मारेकरी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाले आहेत. या फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे एमआयडीसी पोलीस सुत्रांनी सांगितले.

आयएमचे पदाधिकारी घटनास्थळी

ममता हॉस्पीटलवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनीटात आयएमएचे डॉ.विश्‍वेश अग्रवाल, डॉ. राजेश पाटील, डॉ. अनिल पाटील यांच्यासह आयएमएचे आजी-माजी पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. ममता हॉस्पीटलच्या हल्याचे निषेध करीत आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे आयएमएचे सचिव डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*