प्रवेशाला बहिष्काराचा ‘डाग’; आगरकर गट तटस्थ

0

डागवालेंमुळे गांधींना एकाकी पाडण्याचा डाव  

अहमदनगर (प्रतिनिधी)– ज्येष्ठ नगरसेवक किशोर डागवाले यांचा आज सायंकाळी भाजपात प्रवेश होत आहे. या सोहळ्याची जंगी तयारी करण्यात आली आहे. मात्र, डागवाले यांच्या प्रवेशालाच पक्षांतर्गत गटबाजीमुळे बट्टा लागला आहे. शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधींचे पक्षातील पारंपरिक विरोधक  माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यासह  समर्थकांनी डागवाले यांच्या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पालकमंत्री राम शिंदे गट अगोदरच फटकून आहे. आता आगरकर यांच्या तटस्थ भूमिकेमुळे गांधी एकाकी पडले आहेत.

मूळ शिवसेनेचे मात्र नंतर अपक्ष व मनसेच्या तंबूत जाऊन आलेले किशोर डागवाले हे आता भाजपवासी होणार आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी यांच्यासह सुमारे 25 मंडळांचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. डागवाले यांच्या प्रवेश सोहळ्यास दानवेंनी उपस्थित राहावे, यासाठी खासदार गांधी यांना महिनाभर ‘श्रम’ करावे लागले. तेव्हा कुठे डागवाले यांच्या प्रवेशाचा मुहूर्त मिळाला. पक्षाचा विस्तार झाला पाहिजे याबद्दल दुमत नाही, मात्र कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा याचाही विचार झाला पाहिजे. उगाच ‘आयराम गयारामां’ना प्रवेश देऊन पक्ष वाढणार नाही. पक्षवाढीपेक्षा बदनामी होईल अशी भूमिका घेत गांधी विरोधक (आगरकर समर्थक) थेट मुख्यमंत्र्यांनाही भेटले. तेथेही डागवाले यांचा पूर्व इतिहास पठण करण्यात आला. मात्र दिलीप गांधी हे डागवाले यांच्या भाजप प्रवेशावर ठाम राहिले.
प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत डागवाले, कुलकर्णी यांचा भाजप प्रवेश सोहळा आगरकर गटाला फारसा रुचलेला नाही. त्यामुळे एकही आगरकर समर्थक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. पक्षाशी एकनिष्ठ राहतील अशांना प्रवेश दिला तर हरकत नाही, असे आगरकर समर्थकांचे मत आहे. पक्षात राहूनही पक्षविरोधात कारवाया केल्याचा डागवाले यांचा इतिहास आहे. त्यामुळेच डागवाले किती दिवस भाजपाच्या तंबूत राहतील असा सवाल आगरकर समर्थक करीत आहेत.

पालकमंत्र्यांनीही फिरविली पाठ
दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डागवाले यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दानवे येणार असले तरी पालकमंत्री राम शिंदे यांनाही डागवाले यांचा भाजप प्रवेश फारसा पसंत नाही. त्यांनी अगोदरच कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

जाजूंनीही मारला कट?
जिल्ह्याचे सुपूत्र व भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनाही या कार्यक्रमासाठी खासदार दिलीप गांधी यांनी आर्वजून निमंत्रीत केले आहे. मात्र, पक्षांतर्गत धूसफूस पाहता जाजू यांनीही या कार्यक्रमास येण्यास असमर्थता दर्शविली आहे, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

मांडवली का बादशाह..
किशोर डागवाले यांचे आजपर्यंतचे राजकारण नेहमीच ‘तडजोडी’चे राहिले आहे. त्यामुळेच शहरात कुठलीही निवडणूक असो डागवाले नेहमीच चर्चेत राहतात. देशासह राज्यात भाजपची लाट आहे. या लाटेवर स्वार होत डागवालेंनी भाजपाची वाट धरली आहे, मात्र त्यांना आगमनालाच घडाभर तेल जाळावे लागले आहे. गटबाजीने ते पक्षप्रवेशाच्या प्रारंभीच हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय मनिषा पूर्ण होते की नाही हे औस्तुक्याचे ठरेल.

भाजप देशात नंबर एकची पार्टी झाल्याने अनेक व्यावसायिक राजकीय मंडळी पक्षात येण्यास उत्सुक आहेत. स्वार्थासाठी राजकीय तडजोडी करणार्‍यांना पक्ष प्रवेश दिल्यास जनतेत असंतोष निर्माण होईल. खुर्चीकरीता कोणाशीही घरोबा करणार्‍यांना प्रवेश देण्यापेक्षा नवीन फळीतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
– अ‍ॅड. अभय आगरकर.

LEAVE A REPLY

*