प्रतिभावंत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची गरज – डॉ.गोसावी

0

पंचवटी : आदिवासी भागातील शाळा शंभर टक्के निकाल देणार्‍या आहेत. आदिवासी भागातील मुले देखील प्रतिभावंत आहे. केवळ त्यांना गरज आहे थोडी संधी देण्याची. प्रत्येक माणसात कारागीर दडलेला आहे. त्याला योग्य प्रशिक्षित करण्याची गरज असल्याचे मत गोखले एज्युकेशन सोसायटी चे सचिव डॉ.मो.स.गोसावी यांनी व्यक्त केले.

पंचवटीतील दिंडोरी रोडवरील नाथकृपा लॉन्स येथे डांग सेवा मंडळाच्या वतीने रविवार (दि.19) रोजी कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती अभिवादन व आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मो.स.गोसावी उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, नरेंद्र पवार, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, सचिव डॉ.विजय बिडकर, अण्णासाहेब मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षिय भाषणात डॉ.गोसावी म्हणाले, स्वातंत्र्य पूर्व काळात दादासाहेब बिडकर यांनी डांग सेवा समितीची स्थापना केली. संस्थेचे कार्य केवळ आदिवासी भागासाठी सुरु करण्यात आले, आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. मानवतेचे दर्शन दादासाहेबांच्या कामातून घडत असून, नाशिकमधल्या नामवंत व्यक्तींमध्ये दादासाहेबांचे नाव अग्रणी असल्याचे डॉ. गोसावी यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच संस्थेची धान्य कोठार योजना आदिवासी भागासाठी अत्यंत लाभदायी असल्याचे डॉ.गोसावी यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमा प्रसंगी ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ खासदार हरीचंद्र चव्हाण यांना डॉ.गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी खा.चव्हाण यांनी माझा राजकीय प्रवास 39 वर्षांचा असून, आदिवासी भागात काम करताना दादासाहेबांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच या भागातील जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला कायम देत असल्याचे खा.हरीचंद्र चव्हाण यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. दरम्यान पुरस्काराची रोख रक्कम खा.चव्हाण यांनी संस्थेस परत केली.

पुढील वर्षी दहावीत प्रथम येणार्‍या संस्थेच्या विद्यार्थ्यास देण्यात यावी असे खा. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र माधवराव पाटील (पेठ), संजय वंजी चिंचोरे (आंबेगण), दिलीप दत्तू सावकार (अभोणा), देविदास दाजी सूर्यवंशी (मुल्हेर), श्रीमती जिजाबाई घनःशाम सूर्यवंशी (उंबरठाण) यांना संस्थेचा आदर्श सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच संस्थेच्या वतीने आठ व्यक्तींचा विशेष सत्कार व संस्थेच्या बारा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण झाल्यानंतर ‘रसिकहो तुमच्या साठी’ हा मनोरंजनपर कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅॅड.मृणाल जोशी, संजय जगताप, लक्ष्मण ठाकरे, कमलेश शेलार आदींनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.किरण सूर्यवंशी यांनी केले.

LEAVE A REPLY

*