प्रगतीचा वेग कायम ठेवून जिल्हा ‘नंबर वन’ बनविणार – जिल्हाधिकारी

0

जळगाव |  प्रतिनिधी : माजी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाची धुरा उत्कृष्टपणे सांभाळली. आता ही धुरा माझ्याकडे आली आहे. सर्व अधिकारी- कर्मचार्‍यांच्या सहकार्याने हा प्रगतीचा वेग कायम ठेवून जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणणार असा विश्वास जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला.

महसुल विभागातर्फे शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थानच्या पाहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचा निरोप समारंभ व जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा स्वागत समारंभ आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. या निरोप आणि सत्कार सोहळ्यास जिल्हा परिषदेचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, मनिषा खत्री, सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या अत्यंत हृद्य सत्कार सोहळ्यात श्रीमती रुबल अग्रवाल यांना निरोप देण्यात आला. यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, मी मुळचा ग्रामीण भागातील असल्याने मला जळगाव जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली याचा नक्कीच आनंद आहे. श्रीमती अग्रवाल यांना ज्या पद्धतीने सर्व अधिकारी कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाले त्या पद्धतीने ते मलाही मिळेल आणि आपल्या सार्‍यांच्या सहकार्याने उत्कृष्ट काम आपण करु शकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

SNS_6772

अधिकारी व चांगल्या  सहकार्यामुळेच उत्कृष्ट काम

माजी जिल्हाधिकारी अग्रवाल म्हणाल्या की, जिल्ह्यात उत्तम सहकार्‍यांमुळे चांगले काम करता आले. प्रत्येक आयएएस अधिकार्‍याच्या कारकीर्दीत जिल्हाधिकारी पदाचा कार्यकाळ हा खूप महत्त्वाचा असतो. महत्त्वाचा कार्यकाळ जळगाव मध्ये गेला, ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे. माझ्या कारकीर्दीत निवडणूका, महसूल वसुली, शासकीय योजनांची अंमलबजावणी या सर्व कामांमध्ये चांगले अनुभव आले.

शेवटी शासनाचे काम उत्तम पद्धतीने व्हावे, हेच उद्दिष्ट ठेवून आपण काम केले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केली.

यावेळी अधिक्षक अभियंता बी.एस. पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांच्यासह विभागप्रमुख व यंत्रणाप्रमुखांनी दोन्ही अधिकार्‍यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी तर आभारप्रदर्शन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

*