पोलीस करणार लग्नपूर्व समुपदेशन

0

नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- तरूण विवाहितांमधील वाढत्या घटस्फोटांमुळे समाजातील कौटुंबिक घडी विस्कटत असल्याने विवाह ठरलेल्या युवक व युवतींचे लग्नपूर्व समुपदेशन करण्याचा अनोखा उपक्रम ग्रामीण पोलीस प्रशासनाने हाती घेतला आहे. आठ दिवसांत सर्व पोलीस ठाण्यांत हा उपक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कौटुंबिक वादांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. दिवसेंदिवस लग्न मोडण्याचे तसेच छळ व इतर कौटुंबिक प्रकरणांची संख्या वाढत आहे. यातून पुढील पर्याय हा घटस्फोट ठरत आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार घटस्फोटांचे अर्ज न्यायालयात दाखल आहेत. यात सर्वाधिक प्रमाण ३५ वर्षाआतील आहे.

बदलती जीवनपद्धती, एकत्र कौटुंबिक पद्धतींचा होत चाललेला र्‍हास, सासू-सासर्‍यांप्रती कारण नसताना बाळगण्यात येणारा दुजाभाव तसेच आता सासू-सासरे मुलींना नकोच असतात. यातून एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघत आहे. मुलाच्या संसारात आई-वडिलांनी हस्तक्षेप केल्यास पती पत्नीत भांडणे होत आहेत. तर अधिक भांडण होताच सर्व कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली जात आहे. एकदा पोलिसांचा हस्तक्षेप संसारात झाला की, मने दुखावली जात असल्याने पुढचे पाऊल घटस्फोटाकडे वळत आहे.

अनेकदा अशी भांडणे अगर तक्रारी होण्यात लग्नापूर्वी दडवलेल्या गोष्टी अधिक कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. यात मुलाचा किंवा मुलीचा आजार लपवणे, काही गुण-दोष असतील त्याची माहिती अगोदर न देणे, मुलामुलींच्या यापूर्वी झालेल्या चुका अगर प्रेम प्रकरणे यातून लग्नानंतर लगेच वाद, पळून जाणे अगर घटस्फोट, आत्महत्या असे प्रकार वाढत आहेत.

असे प्रकार कमी व्हावेत म्हणून लग्नापूर्वीच दोघांचा संवाद घडवून त्यांच्या मनातील संशय अगर काही लपवलेल्या गोष्टी याबाबत एकमेकांना अगोदरच माहिती व्हावी. त्यामुळे लग्नानंतर त्या कारणांवरून वाद होणार नाहीत. तसेच घर, संसार, कुटुंबपद्धती, ज्येष्ठांचा आदर व नातीगोती सांभाळणे याबाबत मुलगा तसेच मुलगी या दोघांचेही समुपदेशन करण्यात येणार आहे.

यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कक्षात हा समुपदेशन कक्ष सुरू करण्यात येणार आहे. एकाच तारखेला एका भागातील अनेक लग्न असतील तर अशा सर्व युवक-युवतींना एकाच वेळी बोलवून सामूहिक समुपदेशन अथवा तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाद कमी करण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात किरकोळ कारणातून कौटुंबिक वाद वाढत जाऊन घटस्फोटासारखे प्रकार घडत आहेत. अथवा दोन कुटुंबांत वाद, मारामार्‍या होऊन पोलीस ठाणी व कोर्ट कचेर्‍यांमध्ये धावाधाव केली जाते. प्रसंगी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्यांसारखे प्रकारही घडत आहेत. यासाठी किरकोळ कारणे आहेत. याबाबत युवक व युवतींचे लग्नापूर्वीच योग्य पद्धतीने समुपदेशन झाल्यास असे प्रकार वेळीच रोखता येतील. यासाठी आता आम्हीच पुढाकार घेतला समुपदेशनातून कौटुंबिक वाद कमी करण्याचा प्रयत्न आहे.
– अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक

LEAVE A REPLY

*