पोलीसपुत्रांसाठी रविवारी नगरमध्ये जॉबफेअर

0

पावणेदोनशे पाल्यांची नोंदणी

अहमदनगर (प्रतिनिधी)-उच्च शिक्षण घेतले मात्र नोकरी मिळाली नाही अशा पोलीस पुत्रांसाठी रविवारी पोलीस मुख्यालयात नोकरी मेळाव्याचे (जॉब फेअर) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. या मेळाव्यात वीस नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी इंटरव्यूह घेणार असून नोकरीसाठी पोलीस पुत्रांची निवड केली जाणार आहे. शर्मा यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात पोलीस पुत्रांच्या नोकरीसाठीचा पहिलाच उपक्रम होत आहे.
पोलीस कर्मचार्‍यांना हवी तेथे बदली दिल्यानंतर पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अवैध धंदे बंद झाल्याने तसेच एखादी ‘टीप’ दिल्यानंतर लगेचच कारवाई होत असल्याने सामान्य जनतेतही शर्मा यांच्याबद्दल चांगले मत निर्माण झाले आहे. शर्मा यांनी बेरोजगार असलेल्या पोलीस पुत्रांच्या नोकरीसाठी पुढचे पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यांच्या बेरोजगार मुलांची माहिती शर्मा यांनी संकलीत करण्याचे आदेश बिनतारी संदेश यंत्रणेवर गत आठवड्यात दिला. नोकरी मेळावा आयोजित केला जाणार असून त्यासाठी नावनोंदणी करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्ह्यातील 173 पोलीस पुत्रांनी नोकरीसाठी पोलीस कल्याण केंद्राकडे नावनोंदणी केली आहे. पोलीस पुत्रांचे बायोडाटाही या विभागाने संकलीत केले आहेत.

नाशिक, नागपुर, पुणे, मुंबई, सोलापूर येथे पोलीस पूत्रांच्या नोकरीसाठी जॉब फेअर झाले आहेत. त्याचधर्तीवर नगरलाही रविवारी जॉब फेअर होत आहे. नगर, सुपा, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.हॉटेल मॅनेजमेंट, कंपनी व्यावस्थापक, इंजिनिअर, लेबर, सुपरवायझर, वाहन चालक, सुरक्षा रक्षक, कर्मचारी अशी शिक्षण निहाय अनेक पदे भरली जाणार आहेत. धींना त्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.

काही वर्षापूर्वी मोटारसायकल चोरी, चेनस्नॅचिंगच्या प्रकरणात पोलीस पुत्रांची नावे समोर आल्यानंतर पोलिसांकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टीकोन बदलला होता. पोलीस पुत्रांची बेकारी मोडीत काढण्यासाठी शर्मा यांच्या पुढाकारातून होणार्‍या नोकरी मेळाव्यातून त्यांना दिशा मिळणार आहे. त्यातून पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणार आहे. मुलाच्या नोकरीसाठी पोलीस अधीक्षकांनीच पुढाकार घेतल्याने पोलीस कर्मचार्‍यांतही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

LEAVE A REPLY

*