Type to search

नंदुरबार

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीस अटक

Share

नंदुरबार | पोलीसांच्या हातावर तूरी देवून जिल्हा रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील हैदरगढ येथून अटक केली आहे. या कामगिरीबद्दल पथकाला विशेष बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

तळोदा पोलीस स्टेशनमध्ये अटकेतील आरोपी देवीदास उर्फ शशिकांत अवधप्रसाद दिक्षीत हा जिल्हा कारागृहात बंदी असतांना त्यास औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमीट करण्यात आले होते. दि.१० जून २०१९ रोजी १२.१५ वाजता पहार्‍यावर असलेल्या पोलीसांची नजर चुकवून त्यांना गुंगारा देवून पलायन केले होते. त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपी पसार होवून जवळपास अडीच महिने होवून देखील आरोपीचा कोणताही सुगावा लागत नव्हता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी सदर आरोपीची सखोल महिती घेतली असता तो एम.कॉम, एमफिल असा उच्चशिक्षीत असून तळोदा येथील कॉलेजमध्ये तासीका बेसीसवर प्राध्यापकाची नोकरी करत होता व कॉमर्सचे क्लासेस घेत असल्याची महिती मिळाली. त्याने स्वत:च्या पत्नीचा व लहान मुलीचा गळा आवळून खुन केला होता व त्यांनी स्व:ताच गळफास घेवून आत्महत्या केली असा बनाव केला होता. सदर केस सध्या चालू असून ती निकालाच्या अंतीम टप्प्यात आहे.

सदर आरोपीने अतिशय थंड डोक्याने सदर गुन्हा केला असून बंदीस्त असतांना पोलीसांची सहानुभुती मिळवण्यासाठी तो फार आजारी आहे व मनोरुग्ण झाला आहे असे भासवून वेळ साधून पळून जाण्याचा त्याने बेत आखला होता. पोलीसांनी सदर आरोपीची सर्व नातेवाईकांची इत्यंभूत माहिती काढून तो कुठे कुठे जावु शकतो याची शक्यता पडताळून तसेच याकाळात त्याचे घरावर स्थागुअशाखेचे कर्मचारी साध्यावेषात पाळत ठेवून होते. दि.२० ऑगस्ट रोजी आरोपीबाबत खात्रीशीर महिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या पोलीस निरीक्षक किशोर नवले, हेकॉ योगेश सोनवणे, दिपक गोरे, पोना विकास अजगे, पोकॉं विजय ढिवरे, आनंदा मराठे यांचे विशेष पथक तयार करुन उत्तर प्रदेश येथे रवाना केले. आरोपीस सुमारे १२०० कि.मी.अंतराहून उत्तरप्रदेश येथील हैदरगढ येथून ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपीवर न्यायालयात सुनावणी अंतीम टप्प्यात असतांना पलायन केल्याने तसेच आरोपी हा मनोरुग्ण आहे असा सर्वांचा समज झाल्याने त्यास पकडणे पोलीसांसमोर एक आव्हानच होते. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी ते स्विकारुन आरोपीस पुन्हा अटक केल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्तबगार पथकास विशेष बक्षीस जाहीर केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!