पेरू व चिकू उत्पादक शेतकरी पीक विमा रकमेपासून वंचित

0

नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ

 

राहाता (वार्ताहर)- प्रधानमंत्री पीक विमा हवामान योजनेअंतर्गत सन 2016 ते 2017 या सालातील राहाता तालुक्यातील 1 हजार 282 पेरू व चिकू उत्पादक शेतकरी पीक विमा रकमेपासून वंचित राहिले असून मुदत संपूनही या शेतकर्‍यांना सुमारे 4 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

 
मोठा गाजावाजा करून हवामान अधारीत पीक विमा उतरावयास शेतकर्‍यांना भाग पाडणार्‍या व मुदत संपूनही विम्याची संरक्षीत रक्कम न देणार्‍या विमा कंपन्या व सरकारी अधिकार्‍यांविरोधात शेतकरी वर्गात तिव्र नाराजी पसरली असून सदर विम्याची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करत आहे. सन 2016 ते 17 या सालाकरीता राहाता तालुक्यातील 574 पेरू उत्पादक शेतकर्‍यांनी 431 हेक्टर क्षेत्राचा पिक विमा तर 78 शेतकर्‍यांनी 65 हेक्टर क्षेत्राचा दोन्ही मिळून मृगबहाराचा विमा उतरविला होता. त्यासाठी त्यांनी 14 लाख रुपये विमा रक्कम भरली होती. या विम्यापोटी या शेतकर्‍यांना पंचेचाळीस दिवसानंतर सुमारे 4 कोटी रुपये विमा संरक्षीत रक्कम मिळणे गरजेचे होते.

 
मात्र ते वर्ष संपले व दुसरे वर्ष लागले तरीही ही रक्कम शेतकर्‍यांना न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. विमा कंपन्यांवर कुणाचाही वचक न राहिल्याने त्या शेतकर्‍यांच्या आयुष्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

 
गेल्या वर्षी राहाता तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला, पेरू बागा फुलल्याच नाहीत, वर्ष वाया गेले. घरातील व उसनवारी करून भरलेला पीक विमाही कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे अद्यापही शेतकर्‍यांना मिळाला नाही.
अगोदरच दुष्काळामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी या पीक विमा रकमेपासूनही वंचित राहताना दिसून येत आहे.

 

या पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जून महिन्यापूर्वी जमा करावी, म्हणजे पुढील वर्षाची मशागत तरी या पैशातून करता येईल, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, व राज्याचे विरोधी पक्षनेते यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

डाळिंब पीक विमा देताना पुणतांबा परिसरातील 189 शेतकरी वंचीत
नुकताच राहाता तालुक्यातील डाळिंब उत्पादकांना पीक विम्याची रक्कम मिळाली. मात्र यातून पुणतांबा महसूल मंडलातील 189 लाभार्थींनी 114 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरला होता, त्यांना यातून वगळले. या शेतकर्‍यांना 5 कोटी 70 लाख रुपये रक्कम अद्याप मिळाली नाही.

LEAVE A REPLY

*