पुणे-नाशिक महामार्ग झाला ‘बोडखा’

0

संगमनेर (प्रतिनिधी)ः- Aपुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक ही मोठी शहर एकमेकांना जोडली गेली. ‘सुवर्णमध्य’ ठरले ते संगमनेर. मात्र ज्या तालुक्यामध्ये दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून झाडे लावण्याचा संदेश गावोगावी पोहचवला त्याच तालुक्यात महामार्गाच्या रुंदीकरणासाठी झाडांची झालेली कत्तल ही नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास करणारी आहे. निसर्ग संपत्तीचा कोणताही विचार न करता ज्या कंपनीने पुणे-नाशिक या महामार्गालगतची झाडे, डोंगर जमिनदोस्त केली त्यांनी पुन्हा नव्याने किती झाडे लावली याचा थांगपत्ताही महसूल व वन विभागाच्या अधिकार्‍यांना नाही ही मोठी शोकांतिका आहे.

 
कार्यक्रमानिमित्ताने झाडे लावयाचे फोटोशेषन करणार्‍या उच्चभ्रू सामाजिक संस्था आणि वृक्षप्रेमी म्हणून स्वतःला मिरवणारे आता कुठे गेले? दंडकारण्य अभियानातील सैनिकही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. महामार्गाचे रुंदीकरण करतांना ठेकेदार कंपनीने सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून घाटातील डोंगरांची वारेमाप केलेली तोडफोड आणि हिरव्या वनराईचा केलेला नाश लक्षात घेवून तालुक्यातील काही जागरुक कार्यकर्ते हरित लवादाकडे तक्रार करण्याच्या तयारीत असून याबाबतची कागदपत्रेही त्यांनी जमविली आहे.

 
पुणे-नाशिक महामार्गालगत रस्त्याच्याकडेला पुर्वी मोठमोठी झाडे होती. महामार्गाचे काम सुरु झाले तशी या झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे महामार्गाचे वैभवच गेल्यासारखे वाटत आहे. आता नव्याने जी झाडे लावण्यात आली ती काही प्रमाणातच आहे. त्यांनाही आता उन्हाचा फटका बसल्याने ती जळून गेली आहे. त्यामुळे पुन्हा झाडे लावण्याची वेळ येणार आहे. असे असले तरी महामार्ग रुंदीकरणात मोठी किती झाडे तोडली गेली? नव्याने किती झाडे लावण्यात आली. आणि ती कुठे लावली याची माहिती मात्र महसूल व वन विभागाने घेणे अपेक्षित असल्याचे मत वृक्षप्रेमींचे आहे.

 

तामकड्याच्या निसर्ग सुखाला तालुका मुकणार
निसर्ग संपत्तीचा अद्भूत नमुना म्हणजे चंदनापुरी घाटातील तामकडा. या तामकड्याचे पावसाळ्यातील वैभव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. मात्र महामार्ग रुंदीकरणाच्या निमित्ताने या तामकड्याला घरघर लागली. आणि निसर्ग देणगी लाभलेला तामकडा नामशेष झाला. तामकड्याचे सुख पावसाळ्यात अनुभवण्यासाठी अबालवृद्ध चंदनापुरीच्या घाटात जात होते. यंदा मात्र तामकड्याचे सुख तालुक्यातील निसर्गप्रेमींना अनुभवता येणार नाही.

LEAVE A REPLY

*