‘पुणे तेथे काय उणे?’

0
पेट्रोलचोरी प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन पोलीस अधिकारी, तीन पोलीस व आणखी तीन जणांना अटक केली आहे. लोहगाव परिसरातील हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईपलाईन फोडून तब्बल ५ हजार लिटर पेट्रोलचोरी या टोळीने केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सोलापूरमध्ये इंधनाचा दाब कमी येत असल्याने पाईपलाईनमध्ये गळती असल्याचा संशय होता.

तपासणी केली गेली त्यावेळी पेट्रोलचोरीचा हा प्रकार उघड झाला. ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरण्याचा हा प्रकार नवा नाही. आता-आतापर्यंत महाराष्ट्राचे धुरीण पुरोगामित्वाचे आणि सुधारणावादाचे ढोल पिटत स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात मग्न होते.

बिहार, उत्तर प्रदेश व राजस्थानातील वाढत्या गुन्हेगारीवर दुगाण्या झाडण्यात सारे राजकारणी आघाडीवर होते. या राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र प्रगतिपथावर असल्याचे उच्चरवात सांगितले जात होते; पण आता महाराष्ट्राने याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवण्याचा निर्धार केला असावा. त्यामुळे जे इतर राज्यांत घडत होते ते आता महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात घडू लागले आहे.

‘पुणे तेथे काय उणे?’ या वाक्प्रचाराने पुण्याची ओळख सांगितली जात असे. तथापि ते पुणे गुन्हेगारीत बरेच मागासलेले आहे, अशी भावना पुणेकरांच्या मनात बळावली असेल का? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दायित्व ज्यांच्यावर आहे ते पोलीसच सराईत गुन्हेगारांचे साथीदार बनून गुन्ह्यांची नवी-नवी तंत्रे आत्मसात का करू लागले असावेत? एकटे पुणेच नव्हे तर महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांत गुन्हेगारीची होत असलेली वाढ सुसंस्कृत महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप बनवत आहे.

नागपूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरेदेखील त्या स्पर्धेत सामील का असावीत? सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पोलिसांनीच एका सराफाचे अपहरण करून त्याला मारूनच टाकले. तर ठाण्यातील एका पोलीस निरीक्षकाने तक्रारकर्त्यालाच गोळी घातली. खुलदाबादच्या पोलिसाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. कोल्हापूर पोलिसांनी पाच कोटींच्या खंडणीत तीन कोटी हडप केल्याची घटना काय सांगते?

या प्रगत राज्यात आता रक्षकांनीच भक्षकाची भूमिका का स्वीकारली असावी? गृहखाते इतके ढिसाळ कसे बनले? गेल्या तीन-चार दशकांत राजकारणात गुन्हेगारांचे प्राबल्य वाढले. विधिमंडळांमध्ये अनेक नामांकित गुन्हेगार सन्मानपूर्वक जाऊन बसले. महाराष्ट्र विधिमंडळात तर पोलीस अधिकार्‍यालाच लाथाबुक्क्यांचा प्रसाद खावा लागला. पोलिसांची प्रतिमा उजळ करण्यासाठी नाशिक शहरात काही उपक्रम होत आहेत; पण ते खूपच तोकडे आहेत. कुंपणच शेताचा फन्ना पाडणार असेल तर जनतेने सुरक्षेसाठी ‘रामभरोसे’ राहावे हेच बरे!

LEAVE A REPLY

*