Type to search

आरोग्यदूत

पुढे पाठ मागे सपाट

Share
कंबरदुखीचा आजार काही उपायांनी आटोक्यात येतो, पण तो पुन्हा उद्भवू नये, यासाठी व ज्यांना जुनाट कंबरदुखी आहे त्यांनी पुढील काळजी घेतल्यास फायदा आहे.

पतली कमर हवी, मोठा कमरा नको वजन जास्त असल्यास पोटाचा घेर वाढून पाठीला बाक येतो. त्यावर उपचार म्हणून नेमका ठरवलेला आहार व व्यायामाने वजन आटोक्या आणा. म्हणजे कमरेचा ‘कमरा’ होऊ देऊ नका. अमिताभचा ‘शान’ आणि अमिताभची ‘शान’ ताठ उभे राहण्याची, चालण्याची व बसण्याची सवय करा. आपण ताठ व बरोबर उभे राहतो की नाही, हे तपासण्यासाठी एक साधी परीक्षा आहे. आरशासमोर आपण समोरून अनेक वेळा पाहतो; पण तसे उभे न राहता आपली ‘बाजू’ आरशासमोर येईल, असे उभे रहा.

बांधकामात गवंडी सरळ रेषेसाठी ओळंबा धरतो. आरशात पाहताना असाच ओळंबा मनाने ठरवू या. त्याची सुरुवात कानामागून खाली करू. असा ओळंबा कानामागून मान व पाठीला खेटून, पण गुडघ्याच्या पुढून, तळापर्यंत जातो का? तसे असेल, तर तुमची उभे राहण्याची सवय बरोबर आहे. तसे नसेल, तर तुमची उभे राहण्याची ढब चुकीची आहे असे समजा. त्यात सुधारणा होण्यासाठी छाती पुढे काढून, खांदे किंचित मागे व खाली झुकवून व कमरेचा बाक कमी करून उभे रहा. ही स्थिती उत्तम आहे. रात्री दूरदर्शनवर ‘शान’ सिनेमा पाहताना असे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर आले, ते म्हणजे अमिताभ बच्चनचे, उभे राहताना, चालताना, बसताना, त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. काही जणांना बराच वेळ खुर्चीवर बसणे भाग पडते. अशावेळी गुडघे खुब्यापेक्षा अर्धा एक इंच वर उचलावेत. यासाठी पायाखाली चौरंग उंचीएवढे स्टुल ठेवण्याने काम भागेल. अधूनमधून एक पाय दुसर्‍या पायावर ठेवत राहावे. 1-2 तासाने उठून थोडे फिरून परत बसावे. उंच टाचांची पादत्राणे टाळा.

थुलथुलीत गाद्या व शरीर, दोन्ही नको झोपण्यासाठी जास्त जाड, थुलथुलीत गाद्या नको. सपाट, पातळ व ताठ गादी बिछान्यासाठी चांगली. मनुष्य झोपेतही तास दोन तासांनी कूस बदलत असतो. त्याने सर्व स्नायू आळीपाळीने शिथिल होण्यास मदत होते. कधीही पालथे झोपू नये. उभे राहून जमिनीवरील वस्तू उचलताना कमरेत वाकणे टाळा. त्याऐवजी गुडघ्यात वाकून खालील वस्तू उचलावी. योग्य व्यायामाने पाठीच्या व पोटाच्या स्नायूंचा तोल वाढवल्यास कंबरदुखी होणार नाही. सायकल चालवणे, चालणे, पोहणे यापैकी एक वा शक्य असल्यास तिन्ही व्यायाम करा.

पुढे ‘पाठ’ मागे ‘सपाट’ कुठल्याही आजारपणात बिछान्यात विश्रांती घ्यावी लागल्यास, ती कमीत कमी घ्यावी. कारण जास्त काळ बिछान्यात पडून राहण्याने मणक्यातील कॅल्शियम कमी होऊन मणके ठिसूळ होतात. आजकाल यामुळेच कुठल्याही ऑपरेशननंतर रुग्णास लवकर हालचाल करण्यास डॉक्टर प्रवृत्त करतात. पाण्याने भरलेली बादली हातात नेण्यापेक्षा, निम्म्या भरलेल्या दोन बादल्या दोन्ही हातात नेणे कमी त्रासदायक ठरते. पाठीवर लक्ष ठेवून पाठीचे व्यायाम करून ती ‘सपाट’ ठेवा. त्याचबरोबर पोटाचे व्यायाम करून तेही पाठीसारखेच सपाट ठेवा.

शेवटी थोडी गंमत एक डॉक्टर कमीत कमी वेळ बिछान्यात विश्रांती घ्यावी या विचाराचे पुरस्कर्ते असतात. एका रुग्णावर त्यांना शस्त्रक्रिया करायची असते. ते त्याला म्हणतात, “हे बघ ऑपरेशन झाल्यानंतर चार तासांनी मी तुम्हाला चहा पिण्यास सांगेन. आठ तासांनी उभे करून चालायला लावेन. 16 तासांनी बागेत फिरायला सांगेन. 20 तासांनी…”
त्यावर तो रुग्ण मध्येच म्हणतो, “पण डॉक्टर माझ्यावर ऑपरेशन करतेवेळी तरी मला आडवे पडू देणार आहात की नाही?”

डॉ. विकास गोगटे 

Tags:
Previous Article
Next Article

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!