पुजाराचे शानदार शतक

0

साऊदम्पटन। भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज दुसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 6 धावा केल्या. त्याआधी भारताच्या चेतेश्वर पुजाराने झुंजार शतकी खेळी केली. पुजाराचे हे कसोटी कारकीर्दीतील 15वे शतक ठरले. भारतीय कसोटी संघाचा कणा म्हणून ओळख असलेल्या पुजाराच्या या खणखणीत शतकी खेळीमुळे भारताचा कोलमडणारा डाव सावरला.

चेतेश्वर पुजाराचे हे इंग्लंडच्या धर्तिवर पहिलेच तर इंग्लंडविरुद्ध 5वे शतक होते. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज धडपडत असताना चेतेश्वर पुजाराने मैदानावर शड्डू ठोकून दमदार फलंदाजी करत भारताच्या डावाला आकार दिला. पुजाराच्या या शतकी खेळीत 13 चौकारांचा समावेश आहे. भारताचा डाव 84.5 षटकात 273 धावांवर संपला. चेतेश्वर पुजाराने (132) शेवटपर्यंत खिंड लढविली. भारताचा शेवटचा गडी जसप्रीत बुमराहच्या रूपात बाद झाला. बुमराहने 24 चेंडूत 6 धावा केल्या. पहिल्या डावाच्या खेळानंतर भारताकडे आता 27 धावांची किरकोळ आघाडी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशी चहापानापर्यंत भारताने 5 बाद 181 अशी मजल मारली. काल पहिल्या दिवसअखेर भारताने बिनबाद 19 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने आज पहिल्या सत्रात दोन गडी गमावले. शिखर धवन (23) आणि लोकेश राहुल (19) हे दोघेही ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरला. पण दुसर्‍या सत्रात ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजाने फोडली. कोहली 46 धावांवर बाद झाला. पाठोपाठ उपकर्णधार अजिंक्य रहाणे 11 धावांवर माघारी परतला. नवोदित ऋषभ पंतकडून भारताला अपेक्षा होत्या. पण तो 29 चेंडूत 0 धावा करून बाद झाला.

मोईन अलीने त्याला बाद केला. त्यामुळे चहापानापर्यंत भारताची अवस्ठा 5 बाद 181 अशी झाली. तिसर्‍या सत्रातही फिरकीपटू मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली. त्याने हार्दिक पांड्या (4), अश्विन (1) आणि मोहम्मद शमी (0) यांना तंबूत धाडले. त्याआधी काल इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 246 धावा केल्या आहेत.

या सामन्यात संधी मिळालेल्या सॅम कुरानने आपली निवड सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 136 चेंडूंत 78 धावांची झुंजार खेळी केली. त्याला मोईन अलीने चांगली साथ दिली. पहिल्या डावात भारताकडून बुमराहने 3, इशांत शर्मा, मोदम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी 2 आणि पांड्याने 1 बळी टिपला.

LEAVE A REPLY

*