पीकविमा योजनेसाठी जिल्ह्यातून १९ हजार अर्ज

शेतकर्‍यांची माहिती १४ ऑक्टोबरपर्यंत अपलोड करावी

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी – खरीप हंगाम २०१७ साठीच्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत महाराष्ट्रातील सुमारे ७५ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील १९ हजार ३५४ शेतकर्‍यांनी यासाठी अर्ज केले आहेत. नगर जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सहभागी शेतकर्‍यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर १४ ऑक्टोबर अपलोड करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सदर संकेतस्थळ हे १४ ऑक्टोबरपर्यंतच सुरू राहणार असून त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरली जाणार आहे. याबाबत बँकाकडून दिरंगाई झाल्यास व शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसान भरपाई देय झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी बँकेची राहणार आहे.

याच अनुषंगाने कृषी विमा पोर्टलवर अपलोड केलेली यादी बँकांनी विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींच्या सहाय्याने शेतकर्‍यांचे माहितीसाठी प्रदर्शित करावी जेणेकरुन शेतकर्‍यांना यादीमध्ये नावाची खात्री करता येईल. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटांमुळे होणार्‍या आर्थिक नुकसानीपासून बचाव करू शकणार आहेत. सध्या भारतामधील केवळ २३ टक्के पिकांचे विमे उतरवले जात असून या योजनेअंतर्गत हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण व आर्थिक आधार देणे. नवीन व आधुनिक शेतीपद्धतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करणे. शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकर्‍यांचे उत्पन्न स्थिर करणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत.

LEAVE A REPLY

*