पिलोनायडल सायनस- एक विचित्र आजार व आधुनिक उपचार

0

माकड हाडाच्या सर्वात शेवटच्या टोकाजवळ किंवा दोन नितंबांच्या मधल्या फटीत होणारा आजार. ज्यात वारंवार पुरळ येऊन फुटणे, पस (पू) येणे, खूप जास्त वेदना होणे, बसायला त्रास होणे असे लक्षण आढळतात.

केसाळ व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. ज्यात त्या भागातील केसाचे तोंड पुन्हा त्याच्या मुळाशी घुसून आतल्या दिशेने वाढ होते व इन्फेक्शनची सुरुवात होते. वरच्यावर साधा दिसणारा हा आजार कालांतराने आत पसरत जातो.

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हजारो सैनिकांना हा आजार झाल्याचे आढळून आले होते, ज्यात त्यांना तासन्तास जीपमध्ये बसून प्रवास करावा लागायचा. त्यामुळे ह्या आजाराला जीप बॉटम किंवा जीप डिसीज असेही संबोधले जायचे. तसेच पस (पू) झाल्यास याला पिलोनायडल अ‍ॅबसेस म्हणतात. ह्या आजारात त्वचेच्या खाली खोेलवर केसांचे जाळे व त्यात पू झालेला असतो व एक किंवा जास्त छोट्या छोट्या छिद्रांतून वारंवार घाण किंवा पू येते. तोंडावाटे औषधोपचारांनी तात्पुरते इन्फेक्शन कमी होऊ शकते, परंतु आजार मुळापासून जात नाही. लवकर रोगनिदान किंवा खात्रीशीर इलाज नाही झाल्यास हा आजार अधिक किचकट होत जातो.

पूर्वी ह्या आजारावर चीरा मारून घाण साफ करणे, तिथला मांसल भाग काढून टाकणे, तसेच फ्लॅप सर्जरी (प्लास्टिक सर्जरी), क्षारसूत्र असे अनेक उपचार होते, त्यातील बरेच आजही प्रचलित आहेत. परंतु या सर्व उपचार पद्धतीत आजार पुन्हा उद्भवण्याची दाट शक्यता असते.

गेल्या काही वर्षांतील संशोधनानुसार लेझर पद्धतीने हा आजार कायमचा व पूर्णपणे बरा करता येतो. ज्यात चिरफाड न करता तसेच छोट्या छोट्या ड्रेसिंग करून एक किंवा दोन सेटिंगमध्ये ह्या आजारापासून पूर्णपणे मुक्त होता येऊ शकते. लेझर व्यतिरिक्त दुसरी खात्रीशीर पद्धत म्हणजे तेथील संपूर्ण भाग (साधारण चिकुच्या आकाराचा) ऑपरेशन करून काढून टाकणे व रोज ड्रेसिंग करत हळूहळू त्या भागाची जखम भरू देणे. दुसर्‍या पद्धतीत जखम भरायला 2-3 महिने लागतात.

रिकरंट म्हणजे आधीच्या ऑपरेशन किंवा उपचारानंतर पुन्हा उद्भवणार्‍या आजारांना लेझर हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
तसेच हा आजार जुनाट किंवा वारंवार झालेला असेल तर एमआरआाय करणे फायद्याचे ठरते. ह्या आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्या भागातील केसांचा नायनाट करण्याचा सल्ला दिला जातो. वेळीच निदान व अचूक उपचार केल्यास ह्या विचित्र आजारापासून कायमची सुटका करून घेता येते.
डॉ. सचिन देवरे

LEAVE A REPLY

*