पिके सुकू लागली; विहिरींनीही गाठला तळ

0
उत्तरेकडून वाहणार्‍या उष्म वार्‍यामुळे जिल्ह्यातही उन्हाची तीव्रता वाढत असून नाशिक तालुक्यात कधी नव्हे एवढे ४१ अंश तापमान पोहोचल्याने मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात भाजीपाल्याची पिके सुकू लागली असून विहिरींनीही तळ गाठला आहे.

चालू वर्षी तापमानात उच्चांकी वाढ होत असताना व संपूर्ण परिसरात उष्णतेची लाट पसरलेली असताना त्याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बसत आहे. ज्यांच्याकडे विहिरी आहेत व मे महिन्यातही त्यात पाणी टिकून असायचे, असे शेतकरी नगदी पिके म्हणून टोमॅटो, कोथंबिर, मेथी, शेपू, कांदापात, काकडी, भेंडी, दोडके, भोपळा, गिलके, ढोबळी मिरची, कोबी, फ्लावर आदींची लागवड करतात. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान गव्हाची सोंगणी झाल्यानंतर पावसाळ्यापुर्वी असे नगदी पिके घेण्याचे नियोजन शेतकर्‍यांचे असते.

त्यासाठी रात्रीचा दिवस करताना पहाटे पाणी भरण्यासाठी जागरण करणारे शेतकरी वाढलेल्या उष्णतेने घायाळ होत आहे. शेतात कसेबसे पाणी दिल्यानंतर ३ ते ४ तासांतच ते सुकत असल्याने पाणी कसे व किती वेळा द्यायचे, हा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा राहत आहे.
तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील मखमलाबाद ते गिरणारे या भागात टोमॅटोचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच द्राक्षाचे पिकही याच भागात सर्वाधीक प्रमाणात आहे. प्रत्येक महिन्यात होणार्‍या बिगर मोसमी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे अगोदरच मोडले असताना उन्हाळ्या झळांनी ते अधिक घायाळ होत आहे. तालुक्यात पाच धरणे असूनही तालुका संपुर्णपणे बागायती झाला नाही.

नदीकाठच्या गावांना काही प्रमाणात पाणी मिळत असताना भारनियमनामुळे इच्छा असूनही पाणी देता येत नाही ही शोकांतिका आहे. पुर्व भागातील विहिरींना फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत पाणी टिकून असते. मात्र मे महिन्यात ते कमी होण्याचे प्रमाण सुरू होते. चालू वर्षी या विहिरींच्या पाण्याची क्षमता झपाट्याने कमी झाल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

उन्हाळ्यात हमखास भाव मिळेल या उद्देशाने काही भागातील शेतकर्‍यांनी कपड्याचा मांडव तयार करून उन्हापासून शेतमालाचा बचाव करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. परंतु आता अशा मांडवांनाही उष्णता सहन होत नसल्याने या मांडवाखालील पिके गळत आहेत.

शेतीमालाला भाव मिळणे ही ओरड प्रती वर्षी बळीराजाकडून केली जाते. परंतु ज्या वेळी शेतकर्‍याचा माल संपतो व साठवणूक करणार्‍या व्यापार्‍यांचा माल बाजारात येतो त्यावेळी अशा मालाची किंमत वाढलेली असते. शहरातील मध्यमवर्गीय मात्र शेतमालाचे भाव वाढले म्हणून ‘महिन्याचे बजेट कोलमडले’ असा कांगावा करीत असतात. परंतु शेतकर्‍यांची खरी व्यथा ते समजून घेत नाहीत.

LEAVE A REPLY

*